गुप्त समेवर - भाग १





               माधवगड बंगला, एका उच्चभ्रू सोसायटी मध्ये दिमाखात उभा डॉ. माधव नेनेंचा बंगला.

धड्डाम्...बंगल्याच्या मागच्या बाजूस आवाज आला. रिया भिंतीवरून उडी मारून बंगल्याच्या आवारात शिरली. आपण हे करतोय ते योग्य आहे की नाही या गोंधळात भिंतीवरच थांबलेल्या मुग्धाला तिने दबक्या आवाजात ओरडले, “ मिनू, जास्त विचार करू नको. आपल्या मिशन साठी आजसारखी संधि परत मिळणार नाही आपल्याला. कम ऑन डियर, जंप.”

         गोंधळ दूर सारून मुग्धाने पण उडी मारली अन दोघी मांजरीच्या पावलाने बंगल्याच्या दारासमोर आल्या. आता पुढील काम आणखी कठीण होते. त्यांनी आणलेल्या डुप्लिकेट चावीने जर दाराचे लॉक उघडले नाही तर इतक्या दिवसांची बंगल्यात शिरण्यासाठी केलेली मेहनत पाण्यात जाणार होती.

“मनू, लवकर दे चावी, वॉचमन पानटपरीवरून येईल दोन मिनिटात. त्याआधी आपण आत जायला हव नाही तर आपली खैर नाही.”

“हे घे.” चाव्यांचा जुडगा रियाकडे देत मुग्धा म्हणाली.

“ ओह शीट यार... तिन्ही चाव्या लागल्या नाहीत. आता लास्ट ट्राय करते. त्या की मेकऱने काही घोळ तर नाही केला नं?”

“शुभ बोल गं बाई, इतक्या शिताफीने मी त्या चाव्या मिळवल्या आणि डुप्लीकेट पण केल्या, ही चावी नक्की लागेल.”  इतका वेळ शांत असलेली मुग्धा रियावर वैतागली.

शेवटची चावी दाराच्या लॉक ला लावून रिया  हळूच पुटपुटली,” खूल जा सिम सिम…” आणि बंगल्याचे लॉक उघडले. दोघींनी आनंदाने एकमेकींना मिठी मारली. मुग्धाने रियाला परत एकदा समजाऊन पाहिलं, 

“ माझ्यासाठी तू नको तुझा जीव धोक्यात घालू, इथून पुढे मी इकटी आत जाते. तू माघारी फिर.”

“अरे यार, कितनी बार बोलू तुझे, ये दोस्ती हम नही तोडेंगे , तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे” तिच्या या फिल्मी उत्तराने मुग्धाचा ताण कमी झाला आणि ती म्हणाली, 

“ही तुझी नौटंकी पण ना..., चल आत.” दोघी हसत बंगल्यात शिरल्या.

हॉल विविध देशी आणि विदेशी दुर्मिळ ऊंची वस्तूंनी सजवलेला असला तरी तिथे मुग्धाला जरा अस्वस्थ वाटलं, विशेषत: तिच्या कपाळावरील व्रण जरा ठणकत आहे आस तिला जाणवलं. घर एखाद्या इतिहास प्रेमिने कलात्मक रित्या सजवलेले असावे, असे लगेच लक्षात येई. हॉल च्या बाजूला एक खोली आणि त्यानंतर किचन होते. पण मुग्धाची नजर जिन्याच्या बाजूला असलेल्या भिंतीवरील चित्रांकडे गेली. नकळत तिची पाऊले तिकडे खेचली गेली. एखाद्या प्राचीन लेण्यांतील कोरलेली भित्तिचित्रे असावी ती. ही चित्रे या आधी पण कुठे तरी पाहिली असावी अस तिला वाटलं, पण नक्की कुठे ते काही आठवेना.

रिया मात्र लहान मुलीसारखी हॉल मधल्या दुर्मिळ वस्तु न्याहाळत होती. अचानक तिने वर टांगलेल झगमगत झुंबर पहिलं अन् स्वत:भोवती गिरकी घेत ती म्हणाली,

 “ वाह!!! किती भारी आहे सगळं, मला तर जुन्या काळातील एखाद्या महालात आल्यासारख वाटते यार” 

मुग्धाची काहीच रिएक्शन न आल्याने रिया मुग्धाला शोधू लागली तेव्हढ्यात तिला स्वत:च्याच तंद्रित जिन्यावर असलेली मुग्धा दिसली. पळत जाऊन तिने मुग्धाला हलवत म्हटलं,

“अशी झपाटल्यासारखी एकटीच वर का आली?”

         थोड भानावर येत मुग्धा बोलली, “ ही पेंटिंग्स किती छान आहेत नं, ते पाहता पाहता कधी वर आले ते कळलच नाही बघ”

         “बर चल आता, अजून उशीर नको. तू पटापट त्या बाजूच्या खोल्या पहा आणि मी या बाजूच्या खोल्या पाहते. काही तरी सापडेल आपल्याला आणि इतके दिवस तुला छळणार्‍या रहस्याचा भेद होईल.” फास्टर्फेणेचा आव आणत रियाने सूचना दिली आणि तडक दोघी दोन दिशेने गेल्या.

         पहिल्या खोलीत मुग्धाला एक बेड, ड्रेसिंग टेबल आणि कपाट इतकच सामान दिसले ते पण वापरात नसलेल, त्यावरून ही गेस्टरूम असावी असा विचार करून मुग्धा ती खोली बंद करून दूसर्‍या खोलीत गेली. ती एक सुसज्ज अशी स्टडी रूम होती. पुस्तकांनी भरलेली दोन बुकशेल्फ, जुन्या बनावटीचा परंतु उत्तम दिसणारा सागवानी टेबल, त्यावर सुबक टेबल लॅम्प आणि किमती शाईचे पेन ठेवलेले पेन स्टँड...

“अहाहा!!! याहून सुंदर ठिकाण कोणतेच नाही” वाचन लेखनाची प्रचंड आवड असणारी मुग्धा स्वत:शी पुटपुटली. ती खोली न्याहाळत असताना अचानक तीच लक्ष भिंतीवरील एका फोटोकडे गेल आणि ती जागीच खिळली. तो माणूस तिला आठवेना पण त्याचे डोळे मात्र ती आयुष्यात कधीच विसरू शकत नव्हती. तेवढ्यात तिला रियाची किंकाळी ऐकू आली.

   धावतच रिया गेली होती त्या खोलीत मुग्धा आली समोर बेशुद्ध पडलेली रिया पाहून तिच्या अंगतील सारे त्राण जाऊन ती मटकन् खाली बसली. ती रियाला उठवायला समोर झुकली इतक्यात मागून तिला कुणी तरी पकडले आणि  तिच्या नाकापुढे उग्र दर्प असलेला रुमाल धरला. त्या माणसच्या तावडीतून सुटण्यासाठी धडपड करताना मुग्धा मागे वळली आणि पुन्हा गर्भगळीत झाली कारण तिला दिसले होते तेच भीतीदायक दोन डोळे, जे कित्येक दिवस तिचा पिच्छा पुरवत होते. त्यासोबत तिच्या नजरेसमोर उभा राहिला तिने रियासोबत केलेला गेल्या सहा महिन्यातील रोलर कोस्टर सारखा थरारक प्रवास!      

to be continued...

गुप्त  समेवर -भाग  २
















Comments

Unknown said…
खुपच छान अगदी वाचता वाचता डोल्यांसमोर सर्व चित्र हुबेहुब ऊभे राहीले 😊😌
Gauri said…
धन्यवाद...
KiranK said…
छान लिहतीयेस.. Keep it up!
Gauri said…
Thank you very much

लोकप्रिय

नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची- १. देवी शैलपुत्री

नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची- २. देवी ब्रम्हचारिणी

गुप्त समेवर- भाग १७

नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची -३. देवी चंद्रघंटा