गुप्त समेवर- भाग १७

   शांताक्काकडून मिळालेल्या माहितीनुसार वसुंधरा मॅमने मुग्धासाठी एक वस्तू त्यांच्या घरी म्हणजे माधवगड बंगल्यात ठेवली होती. ती वस्तू मिळवणं मुग्धासाठी खूप आवश्यक होत. पण सध्या माधवगड बंगल्यात कुणीच रहात नसल्याने ती वस्तू मिळवायची कशी? ही एक मोठी समस्या होती. मुग्धा आणि रिया घरी विचार करत होत्या इतक्यात अविकाका त्यांना भेटायला आला. मुग्धाच्या मनगटावरील त्याने गिफ्ट दिलेले स्मार्ट बॅंड पाहून त्याला आनंद झाला. त्याचा जाड भिगांचा चष्मा ठीक करत तो मुग्धाला म्हणाला,

“तुम्ही दोघी मी दिलेल गिफ्ट वापरत आहात, ते पाहून बर वाटलं.”

“आम्हाला खूप आवडलं आहे हे काका, आम्ही नेहमी वापरणार!”

मुग्धा अगदी मनापासून बोलली.  

“बाकी काय खलबतं चालू आहेत तुमची? जरा विचारात दिसताय म्हणून विचारलं.

      मुग्धा शांताक्काला भेटून आल्याच सांगणार होती इतक्यात रीया म्हणाली,

“काहीच नाही काका. प्रोजेक्टचा विचार करत होतो.”

“अच्छा! व्यवस्थित करा प्रोजेक्ट, फक्त कॉलेजचा! बाकी कोणते प्रोजेक्ट हाती घेऊ नका. तुम्ही पुन्हा माधवगड बंगला किंवा नेने यांच्याशी संपर्क ठेऊ नका. खूप मोठा धोका आहे त्यात.”

       दोघींनी माना डोलवल्या. थोड्याफार गप्पा मारून अविनाश निघून गेला.

    तो जाताच रीयाने फ्लॅटचा दरवाजा लावून घेतला आणि तिच्या डोक्यात विचारचक्र सुरू झालं.रीयाला हल्ली अविकाकाच वागणं जरा गूढ वाटत होत. मुग्धाचा भूतकाळ शोधण्याला त्याचा विरोध असण रीयाला पटत नव्हतं. त्यादिवशी तो अचानक पार्टीत आला आणि त्याने त्यादोघींना गाडीत बसवलं होत. रियाच्या बाजूला गाडीला टेकून उभा असलेल्या अविकाकाच्या हालचालीकडे रीयाच लक्ष होत. अविकाकाने पॅंटच्या एका खिशातून मोबाइल काढला आणि तो लगेच ठेऊन दिला, पुन्हा दुसर्‍या खिशातून वेगळा मोबाइल  काढला आणि त्यावरून मुग्धाच्या घरी फोन करून ते मुंबईला येत असल्याच कळवल होत. रीया जरी मॅमच्या अकस्मात मृत्यूमुळे गांगरून गेली होती तरी तिच्या लक्षात आल होत की, अविनाशने आधी जो मोबाइल काढला तो मोबाइल तिने वसुंधरा मॅमकडे पाहिला होता. अविकाका बद्दल तिच्या मनात संशय येत होता, पण हे मुग्धाला पटणार नाही म्हणून तिने मुग्धाला काहीच सांगितल नव्हत. आत्ता पुन्हा अविकाका भेटल्यावर डोक्यातील संशयाच्या भुताने मान वर काढली होती. एकदा या अविकाकाची सगळी कुंडलीच काढूया, अस मनाशी ठरवून रीया मुग्धाला म्हणाली,

“मिनू, तू इतकी भोळी काशी काय गं? शांताक्काला भेटल्याच पण सांगणार होती नं? तुला समजत नाही का, अविकाकाला आवडत नाहीये तू तुझा भूतकाळ शोधणं! तो नेहमी तुला अडवतो आहे.”

“सॉरी गं! माझ्या लक्षातच नाही आल. पण आता काय करायचं आपण? अविकाका का अडवतो नेहमी? कसला धोका आहे यात?”

“धोका असला तरी तुझ्या अस्तित्वाचा माग घेण आपण अस सोडून नाही द्यायचं. आपण काहीही करून मॅमने तुझ्यासाठी जपून ठेवलेली वस्तु माधवगड बंगल्यातून शोधून काढूया.”

“पण कस? बंगला तर बंद आहे. आर्यन सध्या यूकेला शिफ्ट झाला आहे. त्याच्या डॅडशी तर आपली साधी तोंडओळख पण नाही. ते कुठे आहेत याची काहीच कल्पना नाही, त्यांना भेटून सगळं सांगितलं असत आपण. त्यांना किंवा कुणालाच या गोष्टी फोनवर सांगून त्यावर त्यांचा विश्वास बसण आणि त्यांनी आपल्याला बंगल्यात शोधाशोध करू देण अशक्यच आहे.”

“हो ना. त्यादिवशी पार्टीत माधव नेनेंचा चेहरा पण धड पाहिला नाही आपण. आर्यन ओळख करून देण्याआधीच मॅमच तस झाल आणि…

दोघी बर्‍याचवेळ विचार करत होत्या. मुग्धाला पटत नसल तरी सध्या दूसरा कोणताच मार्ग नसल्याने तिने रीयाचा मिशन माधवगड घुसखोरी ठराव मंजूर केला.

मिशन माधवगड घुसखोरी नुसार आपण वॉचमनवर पाळत ठेऊ, त्याच्याकडील बंगल्याच्या चाव्या घेऊन ड्यूप्लिकेट चाव्या बनवून घेऊ, मागच्या बाजूने बंगल्यात प्रवेश पण करू. पण बंगल्यात मॅमची रूम शोधून तिथे जुना फोटो शोधणं सगळंच अवघड आहे.”

मुग्धाच्या सगळ्या शंका बरोबर असल्या तरी रीया सगळी रिस्क घ्यायला तयार होती. ती म्हणाली,

“डोन्ट वरी डियर, आय अॅम हियर!”

 रीयाच्या पीजेमुळे वातावरणातील ताण एकदम हलका झाला आणि दोघी हसू लागल्या.

      आठ दिवस त्यादोघींनी मिशन माधवगड घुसखोरी ची पूर्वतयारी केली आणि ते पूर्ण करायला निघाल्या. मुग्धाला यशोदा- श्रीकांतने दत्तक घेतलेली आहे हे समजून जवळ जवळ सहा महीने झाले होते. आज सहा महिन्यांनंतर या मिशनमध्ये तिला तीच खर अस्तित्व सापडणार होत.

      वॉचमन पानटपरीकडे निघलेला पाहून त्या बंगल्याच्या मागील बाजूस आल्या. रिया भिंतीवरून उडी मारून बंगाल्याच्या आवारात शिरली. आपण हे करतोय ते योग्य आहे की नाही या गोंधळात भिंतीवरच थांबलेल्या मुग्धाला तिने दबक्या आवाजात ओरडले,मिनू, जास्त विचार करू नको. आपल्या मिशन साठी आजसारखी संधि परत मिळणार नाही आपल्याला. कम ऑन डियर, जंप.”

            गोंधळ दूर सारून मुग्धाने पण उडी मारली अन दोघी मांजरीच्या पावलाने बंगल्याच्या दारासमोर आल्या. आता यापुढील काम आणखी कठिण होते. त्यांनी आणलेल्या डुप्लीकेट चावीने जर दारच लॉक उघडल नाही तर इतक्या दिवसांची बंगल्यात शिरण्यासाठी केलेली मेहनत पाण्यात जाणार होती.

“मनू, लवकर दे चावी, वॉचमन पानटपरीवरून येईल दोन मिनिटात. त्याआधी आपण आत जायला हव नाही तर आपली खैर नाही.”

“हे घे.” चाव्यांचा जुडगा रियाकडे देत मुग्धा म्हणाली.

“शट्.. तिन्ही चाव्या लागल्या नाही. आता लास्ट ट्राय करते. त्या की मेकऱने काही घोळ तर नाही केला नं?”

“शुभ बोल गं, इतक्या शिताफीने मी त्या चाव्या मिळवल्या आणि डुप्लीकेट पण केल्या लागेल ही.”  इतका वेळ शांत असलेली मुग्धा रियावर वैतागली.

शेवटची चावी दाराच्या लॉक ला लावून रिया मनातल्या मनात पुटपुटली,” खूल जा सिम सिम…” आणि बंगल्याच लॉक उघडल. दोघींनी आनंदाने एकमेकींना मिठी मारली. मुग्धाने रियाला परत एकदा समजाऊन पहिलं, माझ्यासाठी तू नको तुझा जीव धोक्यात घालू, इथून पुढे मी इकटी आत जाते. तू माघारी फिर.”

“अरे यार, कितनी बार बोलू तुझे, ये दोस्ती हम नही तोडेंगे , तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे...”

 तिच्या या फिल्मी उत्तरावर जरा रीलक्स होत मुग्धा हसून म्हणाली, ही तुझी नौटंकी पण ना..., चल आत.” दोघी हसतच बंगल्यात शिरल्या.

हॉल विविध देशी आणि विदेशी दुर्मिळ ऊंची वस्तूंनी सजवलेला असला तरी तिथे मुग्धाला जरा अस्वस्थ वाटलं, विशेषत: तिच्या कपाळावरील व्रण जरा ठणकत आहे आस तिला जाणवलं. घर एखाद्या इतिहास प्रेमिने कलात्मक रित्या सजवलेले असावे, असे लगेच लक्षात येई. हॉल च्या बाजूला एक खोली आणि त्यानंतर किचन होते. पण मुग्धाची नजर जिन्याच्या बाजूला असलेल्या भिंतीवरील चित्रांकडे गेली. नकळत तिची पाऊले तिकडे खेचली गेली. एखाद्या प्राचीन लेण्यांतील कोरलेली भित्तिचित्रे असावी ती. ही चित्रे या आधी पण कुठे तरी पाहिली असावी आस तिला वाटलं, पण नक्की कुठे ते काही आठवेना.

 रिया मात्र लहान मुलीसारखी हॉल मधल्या दुर्मिळ वस्तु न्याहाळत होती. अचानक तिने वर टांगलेल झगमगत झुंबर पहिलं अन् स्वत:भोवती गिरकी घेत ती म्हणाली,

 “वॉव किती भारी आहे सगळं, जुन्या काळातील एखाद्या महालात आल्यासारख वाटते यार ..” मुग्धाची काहीच रिएक्शन न आल्याने रिया मुग्धाला शोधू लागली तेव्हढ्यात तिला स्वत:च्याच तंद्रित जिन्यावर असलेली मुग्धा दिसली. पळत जाऊन तिने मुग्धाला हलवत म्हटलं,

“अशी झपाटल्या सारखी एकटीच वर का आली?”

            थोड भानावर येत मुग्धा बोलली, “ ही पेंटिंग्स किती छान आहेत नं, ते पाहता पाहता कधी वर आले ते कळलच नाही बघ”

            “बर चल आता, अजून उशीर नको. तू पटापट त्या बाजूच्या खोल्या पहा आणि मी याबाजूच्या खोल्या पाहते. काही तरी सापडेल आपल्याला आणि इतके दिवस तुला छळणार्‍या रहस्याचा भेद होईल.” फास्टर्फेणेचा आव आणत रियाने सूचना दिली आणि तडक दोघी दोन दिशेने गेल्या.

            पहिल्या खोलीत मुग्धाला एक बेड, ड्रेसिंग टेबल आणि कपाट इतकच सामान दिसलं ते पण वापरात नसलेल, त्यावरून ही गेस्टरूम असावी असा विचार करून मुग्धा ती खोली बंद करून दूसर्‍या खोलीत गेली. ती एक सुसज्ज अशी स्टडीरूम होती. पुस्तकांनी भरलेले दोन बूकशेल्फ, सागवानि टेबल, त्यावर सुबक टेबल लॅम्प आणि किमती पार्करचे पेन ठेवलेले पेनस्टँड...

“अहाहा!!! याहून सुंदर ठिकाण कोणतेच नाही” वाचन लेखनाची प्रचंड आवड असणारी मुग्धा स्वत:शी पुटपुटली. ती खोली न्याहाळत असताना अचानक तीच लक्ष भिंतीवरील एका फोटोकडे गेल आणि ती जागीच खिळली. तो माणूस तिला आठवेना पण त्याचे डोळे मात्र ती आयुष्यात कधीच विसरू शकत नव्हती. तेव्हाढ्यात तिला रियाची किंकाळी ऐकू आली.

      धावतच रिया गेली होती त्या खोलीत मुग्धा आली समोर बेशुद्ध पडलेली रिया पाहून तिच्या अंगतील सारे त्राण जाऊन ती मटकन् खाली बसली. ती रियाला उठवायला समोर झुकली इतक्यात मागून तिला कुणी तरी पकडले आणि  तिच्या नाकापुढे उग्र दर्प असलेला रुमाल धरला. त्या माणसच्या तावडीतून सुटण्यासाठी धडपड करताना मुग्धा मागे वळली आणि पुन्हा गर्भगळीत झाली कारण तिला परत दिसले होते तेच भीतीदायक दोन डोळे, जे कित्येक दिवस तिचा पिच्छा पुरवत होते. मुग्धा गर्भगळीत होऊन पडली, तिची शुध्द्ध हरपली गेली.

 

      मुग्धा हळूहळू शुद्धीवर येत होती. किलकिल्या डोळ्यांनी तिने आजूबाजू पाहील, तिला हातपाय बांधून बाजूला पडलेली रीया दिसली, रीयाला अस पाहून तीच्याजवळ जायला उठायची धडपड करताना मुग्धाच्या लक्षात आल की तिचे पण हातपाय बांधले गेले आहेत, तिला पण आजिबात हलता येत नव्हतं. खोलीत सर्वत्र पाहिल्यावर तिला जाणवलं की ती कदाचित वसुंधरा मॅमच्या रूममध्ये होती. ड्रेसिंग टेबलच्या  बाजूला भिंतीवर असलेल्या फोटोकडे तीच लक्ष गेल. तिला एकदम सगळ्या परिस्थितिची कल्पना आली, तिला पुन्हा ते खूनी डोळे दिसले होते, ज्याने १६ वर्षांपूर्वी असच तिला डांबून ठेवलं होत आणि तिच्या आईला धमक्या देत होता. मुग्धाच्या पुसट होत गेलेल्या स्मृति जागृत झाल्या होत्या,ज्याचा शोध घेत ती इथवर आली होती, तो भूतकाळ तिच्या स्मृतींमधून तिला दिसत होता. मुग्धाच्या तोंडून एक अस्फुट किंकाळी बाहेर पडली, त्यामुळे रीयाला पण शुद्ध आली. मुग्धा पहात असलेल्या फोटोकडे ती पाहू लागली, वसुंधरा मॅमच्या तरुणपणीचा फोटो होता तो, त्यांच्यासोबत ट्रेकिंगचा ग्रुप असावा, त्यातील एक जण रीयाला एकदम ओळखीचा वाटत होता. पण त्याची ओळख काही पटत नव्हती. मुग्धा रीयाला काही बोलणार इतक्यात रीयाने तिला डोळ्याने गप्प रहा अस खुणावले. रीया आजूबाजूचा कानोसा घेत होती, बंगल्यात खालून बरेच आवाज येत होते, कुणीतरी धाडधाड जिना चढून वर आल आणि त्या दोघी होत्या त्या रूमचा दरवाजा उघडला गेला

       डोळ्यांवरचा चश्मा एका हातात घेऊन दुसऱ्या हाताने चेहऱ्यावरील घाम निपटून घेत अविनाश आत येत होता, त्याच्या डोक्यावर कॅप नव्हती. रीयाने त्या फोटोतील व्यक्तिला ओळखलं होत...मुग्धाला पण आता अविनाशची खरी ओळख पटली होती, जिवाच्या आकांताने तिने आवाज दिला...

“वाचवा मला, सोडवा मला...बाबाSSS...”   

क्रमश:

 पुढील भाग वाचा खालील लिंकवर

गुप्त समेवर भाग 18 (अंतिम भाग)  

 

 

  

            

Comments

लोकप्रिय

गुप्त समेवर - भाग १

नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची- १. देवी शैलपुत्री

नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची- २. देवी ब्रम्हचारिणी

नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची -३. देवी चंद्रघंटा