नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची- २. देवी ब्रम्हचारिणी
नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची -१.देवी शैलपुत्र
२. देवी ब्रम्हचारिणी
"मी आरजे चंद्रिका , आपण ऐकत आहात मॉर्निंग मंत्रा शो आपल्या आवडत्या माय मराठी एफएम वर... चला तर मग सुरू करूया नवरात्री स्पेशल सेग्मेंट- 'नवदुर्गा'!!! आज नवरात्रीचा दूसरा दिवस , या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची उपासना केली जाते . भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी देवी पार्वतींनी हजारो वर्षे कठोर तप केले . सुरूवातीचे काही वर्षे अरण्यातील फळे त्यानन्तर नुसती बिल्वपत्रे तर शेवटची हजार वर्ष कडकडीत उपास करून भगवान शंकरांची आराधना केली. देवीचे हे कुमारिका तपस्विनीचे रूप ब्रह्मचारिणी म्हणजेच ब्रह्मचर्याचे आचरण करणारी म्हणून ओळखले जाते.ब्रह्म म्हणजे इन्फिनिटी- अनंत! जे स्थिर असून पण गतिमान आहे. गोंधळलात का? आपल स्पेस- अवकाश पहा, अनंत आहे आणि स्थिर सुद्धा पण त्यातील अनेक ग्रह, तारका नेहमी गतिमान असतात. समुद्राच उदाहरण घ्या, तो अफाट आहे, तो कायमस्वरूपी एकाच जागी आहे, त्यातील लाटा मात्र प्रवाही असतात. आपण असच स्वतावर ठाम विश्वास ठेऊन एक ध्येय निश्चित करून त्यामार्गाने प्रवाही राहावं. आपली मूलतत्व न विसरता नवीन कौशल्य आत्मसात करावीत. प्रवाहासोबत जरूर पोहाव, पण वाहवत जाऊ नये. देवी ब्रह्म चारिणी कुमारिकेचे रूप आहे. याचा अर्थ म्हणजे शुद्धता- पावित्र्य! आपले आंतरिक पावित्र्य अबाधित राखण्याची काळजी आपण स्वता:च घायची असते...."
एफएम वरील मॉर्निंग मंत्रा शो ऐकत गाडी चालवत असलेल्या इंस्पेक्टर सिद्धीचा मोबाइल वाजला. तिचा खबर्या नेहमीच्या ठिकाणी साठे उद्योग समूह आणि साठे कुटुंबिय यांची सारी माहिती घेऊन पोहोचला होता, सिद्धिने गाडी सुरू केली आणि एका चहाच्या टपरिसमोर थांबली इंस्पेक्टर सिद्धि गाडीतून उतरली , त्या टपरीवर चहा देणारा पोर्या धावतच एक कटिंग घेऊन आला आणि बाकावर बसलेल्या सिद्धिच्या हातात त्याने तो वाफाळत्या चहाचा ग्लास दिला, त्याची थोडी विचारपूस करून चहा घेऊन त्याच्या हातावर १०० ची नोट टेकवून सिद्धि पुन्हा गाडीत जाऊन बसली. आता तिच्या हातात एक बंद लिफाफा होता जो त्या बाकावर तिच्या खबर्याने ती येताच बाकावर ठेऊन निघून गेला होता. सिद्धिने नेहमीसारखे सराईतपणे खबर्याकडून त्याने गोळा केलेली माहिती कुणालाही काहीच न कळता काढून घेतली होती. त्याला अजून पण दुर्गा साठे यांच्या लग्नापूर्वीची काही माहिती मिळाली नव्हती म्हणून पुन्हा त्याला फोन करून लवकरात लवकर दुर्गा साठे यांचे लग्ना आधीचे नाव आणि त्यांचे माहेरचे नातेवाईक याबद्दल माहिती काढायच्या सूचना दिल्या होत्या.
पोलिस स्टेशन मध्ये गेल्यावर साठे यांच्या बंगल्यातील दोन नोकर आणि ड्रायवर जे काल भेटले नव्हते त्यांची उलट तपासणी करण्यात सिद्धीचा बराच वेळ गेला पण त्यातून काहीच निष्पन्न झाल नाही. सिद्धिने शहरातील हॉस्पिटल्स, इतर पोलिस स्टेशन आणि शवगृह यांकडे दुर्गा साठे यांचे फोटो कालच पाठवले होते, तसेच दुर्गा साठे घरातून बाहेर पडताना जी गाडी घेऊन गेल्या होत्या तिचा नंबर आणि फोटो आरटीओ आणि संबंधित तपास यंत्रणेकडे दिले होते. सबइंस्पेक्टर भावेला सगळी कडे पुन्हा चौकशी करण्याची सूचना दिली आणि इंस्पेक्टर सिद्धि तिच्या खुर्चीत जाऊन बसली. तिच्या टेबलवर दुर्गा साठे यांच्या विषयीची हवालदार काळे आणि मोरे यांनी जमा केलेल्या माहितीची फाइल होती. फाइल उघडून पाहताच त्यात दुर्गा साठे यांची लग्नानंतरची सारी माहिती आणि फोटो होते. केसांवर आलेली चंदेरी छटा आणि थोड्याफार सुरकुत्या सोडल्या तर साठीनंतर पण दुर्गा साठे तितक्याच तेजस्वी दिसत होत्या. दुर्गा साठे यांच्या चेहर्यावरील आत्मविश्वास आणि तेज काही कमी झाले नव्हते उलट वाढलेच होते. एकदम साध राहणीमान असल तरी गौरवर्ण, उंच कपाळ, रेखीव भुवया, मधोमध भांग पाडून केसांची मागे घातलेली वेणी, तरतरीत नाक, करारी पण प्रेमळ डोळे आणि चेहर्यावरील सात्विक भाव यांमुळे त्यांचं एकूण व्यक्तिमत्व प्रभावी वाटत होत. लग्नानंतर अत्यंत कठोर परिश्रम घेऊन नवर्याला भक्कम साथ देत भाड्याच्या खोलीत सुरू केलेल्या छोट्याश्या खादय व्यवसायच रूपांतर काही वर्षात मोठ्या उद्योग समूहात केल. यश आणि पैसा हाताशी येऊन थोडेसे सुखाचे दिवस येताच काळाने त्यांच्यापासून प्राणप्रिय नवर्यालाअल्पश्या आजाराच्या निमित्ताने हिरावून घेतलं. पदरातील छोटासा अजय, सासू सासरे आणि नुकतच नावारूपास आलेला व्यवसाय या सार्यांना सावरण्यासाठी स्वत:च दुख बाजूला सारून दुर्गा साठे खंबीरपणे उभ्या राहिल्या. मध्यंतरी सासर्यांच देखील निधन झाल. तरी पण न डगमगता कौटुंबिक आणि व्यावसायिक दोन्ही जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडल्या. इतकी कर्तृत्ववान आणि यशस्वी स्त्री असून देखील त्यांच्या एकाही फोटोत कुठेच बडेजाव किंवा दागिन्यांचा लखलखाट दिसत नव्हता. इतका मोठा डोलारा एकहाती सांभाळणारी याच त्या असतील अस कुणाला सांगून पण पटल नसत.
मुलगा सक्षम झाल्यावर एखाद्या योगिनीपरी त्याच्यावर व्यवसायाची सारी जबाबदारी सोपवून त्या निवृत्त झाल्या आणि स्वता:ला समाजकार्यासाठी झोकून दिल. गेली बारा वर्षे श्रीमती दुर्गा साठे कोणताही गाजावाजा न करता स्वता: लक्ष घालून आणि मेहनत घेऊन त्यांच्या सामाजिक संस्थेमार्फत अनेक गरजू आणि पीडितांची मदत करत होत्या. अश्या या सात्विक, शुद्ध मनाच्या तपस्विनीचे असे अचानक गायब होण्यामागचे कारण काय असावे या विचारात असतानाच सिद्धिला तिच्या खबर्याचा फोन आला, त्याचा नंबर पाहताच त्याने दिलेला लिफाफा तसाच पाडून आहे हे तिच्या लक्षात आल.
क्रमश:
नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची -३. देवी चंद्रघंटा

Comments