नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची -५. देवी स्कंदमाता

 
मागील भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 

५. देवी स्कंदमाता
" सुप्रभात मंडळी!!!
 मी आरजे  चंद्रिका , आपण  ऐकत आहात  मॉर्निंग  मंत्रा शो  आपल्या आवडत्या माय मराठी एफएम वर...  त्या आदिमातेची कृपा  आपणा सर्वांवर राहो . चला तर मग  सुरू करूया  नवरात्री स्पेशल सेग्मेंट- 'नवदुर्गा'!!! आज  नवरात्र पंचमी , या दिवशी  देवी स्कंदमातेची उपासना केली जाते .  स्कंद  म्हणजेच कार्तिकेय  हे देवी पार्वती आणि भगवान शंकर यांचे पुत्र , अगदी लहान वयात त्यांनी  देवतांचे सेनापती होऊन  तारकासुराचा  वध केला. देवी पार्वतीना  स्कंदमाता  म्हणजेच  कुमार कार्तिके  यांची  माता हे नाव मिळाले!!  देवी  स्कंदमातेच्या मांडीवर  सहामुख असलेले  कुमार कार्तिकेय  विराजमान  आहेत. त्यामुळे  स्कंद मातेच्या पूजनाने मातेसोबत कार्तिकेय स्वामींचे आशीर्वाद प्राप्त होतात.

 आता स्कंद म्हणजे कार्तिकेय म्हणजेच शौर्याचे प्रतीक तर माता म्हणजे वात्सल्य आणि प्रेमाचे प्रतीक ! म्हणजेच देवी स्कंदमाता ही शौर्य आणि वात्सल्य  या दोन्हीचा  संगम  साधण्याचे शिकवते आहे. स्कंद यांची सहा मुखे वेदांची सहा अंगे  तर माता ही ज्ञान देणारी  म्हणून स्कंदमाता ही  आपल्याला सर्व प्रकारचे ज्ञान / शक्ती प्राप्त  करावे असा संदेश देते ."

आज इंस्पेक्टर सिद्धि साठे उद्योग समुहाच्या ऑफिस मध्ये आली होती.  विशाल शिवाय इतर कुणीच दुर्गा साठे यांना त्यादिवशी पाहिले नव्हते त्यामुळे अजून तरी त्यादिवशी दुर्गा साठे यांच्यासोबत  गाडीत बसून कोण व्यक्ती गेली याचा तपास लागला नव्हता. परंतु एक नवीनच माहिती समोर आली होती. संस्थेमधील कागदपत्रे पाहिल्यावर सबइंस्पेक्टर भावेनी संस्थेची सध्याची आर्थिक परिस्थिति अत्यंत बिकट असून गेल्या वर्षी पैशांच्या व्यवस्थेसाठी संस्थेची इमारत गहाण ठेऊन कर्ज काढण्यात आले होते.  अजून धक्कादायक गोष्ट म्हणजे सध्या साठे उद्योग समूह सुद्धा कर्जाच्या डोंगराखाली होता. याच्या मागचे कारण काय असावे हे सिद्धिच्या माणसांनी  शोधले होते पण अजय साठे कडून सार्‍या गोष्टींचा खुलासा करून घेण्यासाठी सिद्धि स्वता: त्यांच्या ऑफिस मध्ये आली होती. रिकेप्शनिस्ट कडून इंस्पेक्टर सिद्धि आल्याचे कळताच अजय साठे  त्यांच्या मॅनेजर सोबत सुरू असलेली  मीटिंग थांबवून इंस्पेक्टर सिद्धि यांना त्यांच्या केबिन मध्ये येऊ देण्यास सांगितले. काही क्षणातच इंस्पेक्टर सिद्धि अजय साठेच्या केबिन मध्ये दाखल झाली, साधारण पन्नाशी ओलांडलेले परंतु एकदम फिट असणारे मॅनेजर शिर्के केबिन बाहेर जाण्यासा निघताच सिद्धिने त्यांना तिथेच थांबण्यास सांगितले. खर तर गेल्या चार दिवसांपासून पोलिस आणि प्रेस यांच्या सततच्या भेटी आणि आज तर इंस्पेक्टर सिद्धिने अस अचानक ऑफिसला येऊन कामात व्यत्यय आणल्याची नाराजी अजय साठेच्या चेहर्‍यावर दिसत होती. ते पाहून सिद्धि  म्हणाली,

"मी काही तुम्हाला त्रास देण्याच्या उद्देशाने इथे आले नाहीये मिस्टर साठे."

"सॉरी इंस्पेक्टर! पण अजून आईचा काहीच तपास लागला नाही आणि सध्या मीडिया वले पण खूप त्रास देताय घरी आणि ऑफिस मध्ये पण..."

"आम्ही आमच्याबाजुने सगळे प्रयत्न तर करतच आहोत, पण तुम्ही मात्र बर्‍याच गोष्टी लपवून आमचे काम अवघड करत आहात..."

"मला समजले नाही तुम्ही कश्याबद्दल बोलत आहात ते."

अजय साठेने गोंधळून विचारले. 

"साठे उद्योग समूहाची तसेच दुर्गा साठे यांच्या सामाजिक संस्थेची मोडकळीस आलेली आर्थिक परिस्थिति तसेच १५ वर्षांपूर्वी साठे उद्योग समूह आणि जेके'ज फूड यांमध्ये झालेला बेबनाव आणि तुटलेले व्यावसायिक संबंध ..."

"पण या गोष्टींचा आई बेपत्ता होण्याशी काहीच संबंध नाही..."

"तुम्हाला मी आधीच सांगितलं आहे की संबंध आहे की नाही ते आम्ही शोधून काढू...तुम्ही फक्त खर काय ते सांगा. काय मिस्टर शिर्के तुम्ही पण तुमची चौकशी झाली तेव्हा या गोष्टींचा काहीच उल्लेख केला नाहीत."

इंस्पेक्टर सिद्धिच्या ठोक प्रश्नावर शिर्के काहीच बोलले नाहीत. परिस्थिति सावरून घेत अजय साठे बोलू लागला,

"गेले दोन वर्ष साठे समुहाच्या खाद्य पदार्थांची विक्री झपाट्याने कमी होत आहे तसेच कामगार संघटनेचे संप आणि मागण्या यांमुळे आर्थिक परिस्थिति डबघाईला आली आहे. मार्केट मध्ये आमच्या शेअर्स चे भाव सातत्याने खाली येत आहेत, आईच्या सामाजिक संस्थेचा पसारा खूप वाढला असून सध्या कंपनी तोट्यात जात असल्याने साठे उद्योग समहातून जाणारी आर्थिक मदत करता येत नाहीये. त्यामुळेच संस्थेची इमारत गहाण ठेऊन तात्पुरती पैश्यांची सोय करण्यात आली आहे."

अजय साठेने एका दमात सारी खरी हकीकत सांगून टाकली. ते ऐकून घेतल्यावर इंस्पेक्टर सिद्धि म्हणाली,

"आणि जेके'ज फूड बद्दल काय सांगाल?"

"खर तर तेव्हा मी नुकताच शिक्षण पूर्ण करून साठे उद्योग समूहात ट्रेनी म्हणून जॉइन झालो होतो. आईच सारा कारभार पहात होती. मी सगळ्या कर्मचार्‍यांसोबत कामाचे धडे घेत होतो. जेके'ज फूड कंपनी सोबत भागीदारीत आम्ही एक कॉंट्रॅक्ट करत होतो, तेव्हा त्यांच्या काही खाद्य पदार्थांमध्ये भेसळ तसेच निषिद्ध घटक असल्याचे आमच्या काही कर्मचार्‍यांच्या लक्षात आले. यांमुळे पदार्थांचा खप वाढत असला तरी खणार्‍याला हानिकारक होता. आम्ही ही गोष्ट बाहेर जाऊ न देता आमचा फायदा करून घेण्याचे आमिष जेके'ज फूड कंपनीच्या मालकाने आम्हाला देऊ केले. आई तेव्हा काही कामानिमित्त परदेशात होती, म्हणून तात्पुरते सर्व अधिकार माझ्याकडे होते. माझे आणि आईचे याबाबत बोलणे झाल्यावर आईने तातडीने मला त्या सार्‍या गैर प्रकाराचा विरोध करून  कोणतीही भीडभाड न बाळगता जेके'ज फूड कंपनीसोबत भागीदारीत सुरू असणारे कॉंट्रॅक्ट रद्द करायला लावले होते. इतकेच नाही तर जेके'ज फूड कंपनी विरुद्ध आम्ही न्यायालयात केस पण दाखल केली होती. अनेक प्रकारे येणार्‍या धमक्यांना न घाबरता जवळ जवळ दोन वर्ष ती केस लढून आम्ही जेके'ज फूड कंपनीला दोषी सिद्ध केले होते, त्यामुळे त्यांचे फूड लायसन्स रद्द करण्यात आले होते. बरोबर न शिर्के?"

अजय साठेने अत्यंत अभिमानाने सारी हकीकत सांगितली आणि मॅनेजर शिर्केंकडे पहात त्यांना बरोबर आहे की नाही ते  विचारले.

"होय मॅडम... त्यावेळी जेके'ज फूड कंपनी ही एक प्रतिष्ठित कंपनी होती, त्यांच्या विरोधात जाणे आमच्यासारख्या नुकताच जम बसलेल्या कंपनीला खर तर धोकादायक होते. शिवाय दुर्गा मॅडम पण इथे नव्हत्या, अजय सर तसे अनुभवाने अगदीच नवखे होते तरी पण त्यांनी दुर्गा मॅडमच्या मार्गदर्शनाने ती लढाई यशस्वीपणे पार पाडली."

" हो...ते खर असलं तरी त्यावेळी जेके'ज फूड कंपनी विरोधात तुम्ही जिंका असला तरी आता मात्र...."

 इंस्पेक्टर सिद्धीचा मोबाइल वाजू लागल्याने ती बोलयेचे थांबली.

क्रमश:

 पुढील भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 

Comments

लोकप्रिय

गुप्त समेवर - भाग १

नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची- १. देवी शैलपुत्री

नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची- २. देवी ब्रम्हचारिणी

गुप्त समेवर- भाग १७

नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची -३. देवी चंद्रघंटा