नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची

आज खूप दिवसांनी अस निवांतपणे सोफ्यावर पाय पसरून सकाळची कोवळी किरण अंगावर घेत, पक्ष्यांचे मधुर कुंजन ऐकत चहाचा एकेक घोट घेताना सिद्धि एक वेगळीच प्रसन्नता अनुभवत होती. गेल्या दोन महिन्यात कामाचा व्याप अति होता. एक दिवस पण तिला शांतपणे घालवता आला नव्हता, म्हणून आजपासून सलग चार दिवसांची सुट्टी घेतली होती तिने. आता या सुट्टीत काय काय करायच हे ती ठरवत होती. टुथपेस्ट संपली म्हणून बेडरूम मधून बाहेर आलेला नीरज सिद्धिच्या त्या मनस्वी रूपाकडे पहातच राहिला. मस्त मोकळे सोडलेले काळेभोर केस, मध्येच गालावर येणारी एखादी चुकार बट, मनाचा ठाव घेणारे टपोरे डोळे, नाजुक ओठ आणि जिवणी, जन्मत: लाभलेला नितळ गोरा रंग कामाच्या दगदगीत रापला गेला तरी झळाळणारी कांती आणि पस्तीशी ओलांडली तरी एकदम सुडौल बांधा! त्यातून आजची सुरुवात मनासारखी झाल्याने सिद्धीच्या मनाची प्रसन्नता चेहर्यावर उतरली होती, जात्याच सुंदर असणारी सिद्धि अजून मोहक वाटत होती, एका अनामिक ओढीने नीरज सिद्धीजवळ गेला आणि तिला कवेत घेतले. दोघे एकमेकांच्या मिठीत हरवलेले असताना शांतातेचा भंग करत सिद्धीचा मोबाइल वाजू लागला, त्या आवाजाने आत झोपलेली परी उठू नये म्हणून सिद्धि लगबगीने नीरजच्या मिठीतून बाजूला झाली आणि टीपोयवर पडलेला मोबाइल हातात घेतला, स्क्रीनवर झळकणारे नाव पाहून सिद्धिने स्वता:ला सावरले आणि नीरजपासून बाजूला जात एकदम ताठ उभी राहून अत्यंत दक्षतेने ती बोलू लागली. तिच्या कपाळावर पडलेली सूक्ष्म अढी आणि बदलेला पवित्रा यावरून पलीकडून फोनवर कोण काय बोलल असेल याचा अंदाज नीरजला आला. नीरज बेडरूम मध्ये आला आणि फोनच्या आवाजाने झोपमोड झालेल्या छोट्या परीला कुशीत घेऊन थोपटू लागला. बाहेर सिद्धिने ' यस सर, विल जॉइन यू वीदिन 30 मिनीट्स' म्हणत फोन कट केल्याचे त्याने ऐकले. सिद्धिने हताशपणे एकदा नीरजकडे पाहिले, त्याच्याजवळ जाऊन खाली मान घालून उभी राहिली आणि हलकेच पुटपुटली,
' आय हॅव टु गो! सॉरी, खूप इच्छा असून पण मी...'
निराजने तिचा चेहरा दोन्ही हातात पकडून तिच्या डोळ्यात जमा झालेले पाणी पुसले आणि म्हणाला,
'हा जॉब तुझ्यासाठी फक्त जॉब नसून तुझ जगण्याच ध्येय आहे आणि त्यासाठी काही तडजोड करावीच लागेल आपल्याला. हो न?'
'तू आहेस माझ्यासोबत म्हणून तर मी...'
पुढे काहीच न बोलता सिद्धि नीरजच्या मिठीत विसावली. बर्याचदा शब्दांपेक्षा स्पर्शच जास्त बोलून जातात. मन शांत झाल्यावर सिद्धि पटापट तयारी करू लागली. पुढच्या वीस मिनिटात कडक इस्त्री केलेल्या गणवेशात समोर उभी ठाकलेली रुबाबदार इंस्पेक्टर सिद्धि पाहून नीरज म्हणाला,
'वीस मिनिटात एका सुंदर गृहिणीची एकदम लेडी सिंघम झाली माझी बायको! कस जमत ग तुला हे?'
त्याला हसून प्रतिसाद देत पायात शूज घालत सिद्धि म्हणाली,
'प्रत्येक स्त्रीमध्ये असत हे स्किल, योग्य त्यावेळी योग्य ते रूप धारण करण्याचं!'
नीरज तिच्यापुढे हात जोडत म्हणाला,
'हो माते, ह्या तुमच्या भक्तावर पण तुमची कृपादृष्टी राहू द्या... अगं आत्ता आठवलं, आजपासून नवरात्र सुरू होतय न? काल रात्री आई म्हणाली होती.'
'अरे हो न. त्यासाठी तर सुट्टी काढली होती मी. तू प्लीज आई देवळातून आल्या की त्यांना आणि परीला समजावं, मला खूप महत्त्वाची केस आल्याने सुट्टी कॅन्सल करावी लागली ते!'
अस म्हणत सिद्धि दारातून बाहेर पडली, तिला बाय करून दरवाजा लावून घेताना नीरजने विचारलं,
'अग पण कोणती केस आहे?'
'टीव्ही लाव सगळ्या न्यूज चॅनलवर तीच बातमी आहे अस मगाशी सर म्हणत होते.'
'आमच्या सिंघमबाई कोणती केस सोडवणार आता' अस म्हणत नीरजने टीव्ही सुरू केला आणि न्यूज चॅनल लावले, त्यावर मोठ्या अक्षरात एकच बातमी झळकत होती,
"सुप्रसिद्ध उद्योजक श्री.अजय साठे यांच्या मातोश्री बेपत्ता- अपहरण? खून? की अजून काही?"
क्रमश:
पुढील भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची- १. देवी शैलपुत्री
(नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर त्या आदिशक्ती ला वंदन करून, नवदुर्गा - गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची ही कथामालिका घेऊन येत आहे.
आदिशक्तीची विविध दैवी रूपे आणि प्रतक्ष्य आयुष्यात दिसणारी ती यांची सांगड घालून एक ही कथा विणली आहे. रोज तिच्या विविध रूपांची ओळख कथेतून उलगडत जाईल.
सुरुवात कशी वाटली ते जरूर कळवा.
लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.)
पुढील भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची -१. देवी शैलपुत्री
Comments