नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची- १. देवी शैलपुत्री


मागील भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 

 नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची -प्रस्तावना

 १. देवी शैलपुत्री

" सुप्रभात मंडळी!!!

 मी आरजे  चंद्रिका , आपण  ऐकत आहात  मॉर्निंग  मंत्रा शो  आपल्या आवडत्या माय मराठी एफएम वर... आजपासून  सुरू झालेल्या नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप  शुभेच्छा, माय  माऊलीची  कृपा  आपणा सर्वांवर राहो . चला तर मग  सुरू करूया  नवरात्री स्पेशल सेग्मेंट- 'नवदुर्गा'!!! आज  नवरात्रीचा प्रथम दिन , या दिवशी  देवी शैल पुत्रीची उपासना केली जाते . शैलपुत्री म्हणजेच हिमालय  कन्या . त्या  पूर्वजन्मि च्या  भगवान  शंकर याची पत्नी देवी  सती  होत्या.  आपल्या पित्याने  म्हणजे दक्ष राजाने  पती शंकर  यांची  अवहेलना  केल्याने  अति  क्रोधित होऊन  देवी  सतीने योग अग्निद्वारा  स्वता:ला  भस्म  केले  आणि  पुढील  आयुष्यात  शैलराज यांच्या  कन्येच्या रूपात  जन्म  घेतला आणि  शैलपुत्री  या नावाने  प्रसिद्ध झाल्या.

 ही झाली शैलपुत्री या अवताराची पौराणिक कथा. आता शैलपुत्री या नावाचा अर्थ जाणून घेऊ. शैल म्हणजे शिखर! चेतनेचे सर्वोचत्तम शिखर...इथे शिखर याचा अर्थ आपल्या समृद्ध अनुभव किंवा भावनांचे अत्त्युच्च स्थान. ऊर्जा/ चेतना जेव्हा सर्वोच्च टोक गाठते, तेव्हाच आपण ती अनुभवतो किंवा त्यातून मुक्त होऊ शकतो. जड वाटतय का? साध उदाहरण देते, आपण एखादेवेळी रागवतो पण तो राग फार नसतो आपण तो व्यक्त करत नाही, तरी पण आत कुठे तरी धुसपूस सुरूच असते. अस होत राहत आणि आपली तगमग वाढत जाते, तो राग आतून आपल्याला कुरतडत असतो. एखाद्यावेळी रागाचा अत्त्युच्च बिन्दु गाठला जातो आणि तो सगळा राग बाहेर पडतो, त्यानंतर मात्र सगळ शांत होत. आपण त्यातून बाहेर पडतो. लहान मुले नेहमी आनंदी का असतात?? कारण ते जे करतात त्यात त्यांचे १००% देतात, मग ते नाचण, हसणं किंवा रडण असो! म्हणून तर ते सगळ्याचा आनंद घेतात आणि त्यातून पटकन बाहेर पण पडतात. मग आजपासून जे कराल ते १००% करा, शैलपुत्रीच्या आशीर्वादाने यशाचे शिखर नक्कीच..."

 इंस्पेक्टर सिद्धिने गाडीतील एफ.एम. बंद केला आणि गाडी पार्क करून ती दमदार पाऊले टाकत पोलिस ठाण्यात तिच्या खुर्चीत बसली. सबइंस्पेक्टर भावेनी तिला  सल्युट करून विश केले. सिद्धि कमिशनर कडून आणलेली फाइल उघडून बसली होती, भावेला हातानेच बसायला सांगून ती बोलू लागली,

'गुड मॉर्निंग भावे. काल दुपारीच मिस्टर साठे यांनी श्रीमती दुर्गा साठे बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती, त्यांच्या भागातील इंस्पेक्टर इतके अनुभवी नसल्याने कमिशनर सरांनी अत्यंत विश्वासाने ही केस आणि त्यासंदर्भातील तक्रार आणि इतर माहिती असलेली ही फाइल आपल्याला सोपवली. श्रीमती दुर्गा साठे या प्रसिद्ध उद्योजक  अजय साठे यांच्या आई तर आहेतच तसेच त्या स्वता: ज्येष्ठ समाजसेविका पण आहेत त्यामुळे  लवकरात लवकर ही केस सोडवण्याचे वरून खूप प्रेशर आहे  आणि आता ही गोष्ट मीडिया पर्यन्त पोहोचल्याने  आपल्यालावरचा ताण खूप वाढला आहे. दोन कॉंस्टेबल पाठवून  दुर्गा साठे आणि कुटुंबाविषयी शक्य ती सगळी माहिती तातडीने मिळवा.'

'यस मॅडम! मी लगेच कॉंस्टेबल मोरे आणि  काळेला सगळी माहिती काढायला पाठवतो.'

'गुड. मी थोड्यावेळात साठे कुटुंबीयांच्या चौकशी साठी त्यांच्या पत्त्यावर जाणार आहे, तुम्ही पण चला तोपर्यंत त्या केसच्या  फाइलची कॉपी देते ती स्टडी करा.'

'यस मॅडम' 

     इंस्पेक्टर सिद्धीकडून फाइल घेऊन तिला कडक सल्युट ठोकून सबइंस्पेक्टर भावे निघाला. हा मान सिद्धिने स्वत:च्या कर्तृत्वाने संपादित केला होता. आजपर्यंत स्त्री म्हणून कोणतीच सवलत न घेता कठोर मेहनत, प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वासाच्या जोरावर ती या पदावर पोहोचली होती. त्यामुळे एक स्त्री असून पण सगळ्या डिपार्टमेंट मध्ये तिला पुरुषांकडून पण योग्य तो मान दिला जात असे. कमिशनर ऑफिस मधून बाहेर पडताच सिद्धीने तिच्या खबर्‍यांना या केसची सगळी पाळमुळ खणून काढण्याच्या सूचना दिल्या होत्या.

 साठे कुटुंबाला भेट देण्यापूर्वी  त्यांची माहिती मिळवण्यासाठी सिद्धीने कमिशनर सरांकडून आणलेली फाइल काढून वाचू लागली.  त्यात दिलेल्या महितीनुसार दुर्गा साठे दोन दिवसांपूर्वी त्यांची  गाडी घेऊन बाहेर पडल्या, त्यांच्यासोबत ड्रायवर नव्हता शिवाय त्यांचा मोबाइल पण घरीच राहिला होता त्यांचा... बाकी इतर पण बरेच  तपशील होते... पूर्ण फाइल वाचून झाल्यावर सिद्धीला एक गोष्ट मात्र खटकली, दुर्गा साठे यांच्या माहेरचा- नातेवाईकांचा काहीच उल्लेख त्यात नव्हता. बाकी साधारण सगळ्या साठे कुटुंबिय आणि नातेवाईकांची थोडक्यात माहिती त्यात होती.

सबइंस्पेक्टर भावे आणि इंस्पेक्टर सिद्धि अजय साठेच्या बंगल्यावर पोहोचताच कोणताही बडेजाव न दाखवता स्वता: अजय साठे तातडीने त्यांना भेटायला आला आणि केस संदर्भातील प्राथमिक सगळी माहिती दिली.  पण त्यातून कोणतेच धागेदोरे हाती न लागल्याने  सिद्धीने तिला फाइल वाचताना जी गोष्ट खटकली होती त्याविषयी विचारलं, त्यावर मात्र अजय जरा शांत बसला. सिद्धि तिचा मुद्दा स्पष्ट करत बोलू लागली,

'हे पहा मिस्टर साठे, तुम्ही आत्तापर्यंत दिलेल्या महितीतून काहीच निष्पन्न होत नाहीये, तुमच किंवा श्रीमती दुर्गाबाईंच कुणाशी काही वैर नाही, कुठे त्यांचा अपघात झाल्याचं रेकॉर्ड नाही, त्यांनी नेलेली गाडी पण कुठे सापडली किंवा कुणी पाहिल्याचा पुरावा नाही,  मोबाइल नसल्याने बाकी लोकेशन स्ट्रेस कारण शक्य नाही. तपासाची दिशाच नाहीये आम्हाला! तुम्ही हवी ती माहिती दिलीत तरच आम्ही त्यांना शोधून काढू शकू.'

'पण आईच्या माहेरचा काहीच संबंध नाहीये याच्याशी. ते तर..' 

अजय साठे बोलता बोलता मध्येच थांबला.

'संबंध आहे की नाही ते आम्ही ठरवू. तुम्ही फक्त आमच्यापासून काहीच लपवू नका.'

इंस्पेक्टर सिद्धीचा पोलिसी खाक्यातील आवाज आणि डोळ्यातील जरब पाहून अजय साठे बोलू लागला.

'मला कळू लागल्यापासून मामा किंवा आजोळ हे कधी मी अनुभवलं नाही म्हणून मी अनेकदा आईला त्यांच्याविषयी विचारे.  पण आईने ती अनाथ असल्याच मला एकदा सांगितलं आणि त्यानंतर तो विषय मी आईपुढे कधीच काढला नाही.'

'पण हे खर नाहीये आणि तुम्हाला खर काय ते माहितीये. ते तुम्हीच सांगितलं तर बर होईल, नाही तर मी ते शोधून काढेन आणि त्यात अजून वेळ जाईल, सो...'

इंस्पेक्टर सिद्धिच ठोक बोलणं ऐकून अजय साठेने तिच्याकडे चमकून पाहिल, ही बाई आपल्या आईला शोधू शकेल की नाही याबद्दल आधी त्याला शंका वाटत होती पण आता मात्र त्याला तिच्याबद्दल विश्वास आणि आदर वाटू लागल्याने तो बोलू लागला,

'आईने मला आधी सांगितलं तेच सांगितलं होत पण मला ते पटल नव्हतं. मी पुन्हा पुन्हा आईला तिच्या माहेरविषयी विचारून त्रास देऊ नये म्हणून माझ्या आजीने म्हणजे वडिलांच्या आईने मला एकदा ही गोष्ट सांगितली होती,  माझ्या आईबाबांचा प्रेमविवाह होता, त्याला आईच्या घरून विरोध होता. कारण त्यावेळी माझे वडील सदाशिव साठे याची परिस्थिति हालाखीची तर आईचे माहेर गर्भश्रीमंत होते. लग्नानंतर एका सभारंभाला आई तिच्या माहेरी गेली असता तिथे तिला त्यांच्या परिस्थितिवरून हिणवण्यात आल, आई तो अपमान सहन करू शकली नाही आणि त्याक्षणी तिने तिच्या माहेरचे सारे नाते- बांध तोडून टाकले, अगदी तीच माहेर्च नाव पण तिने त्यागल! बस्स त्यानंतर आज पर्यन्त ते संबंध कधीच जुळले नाही की आम्हाला कुणाला त्यांची काहीच माहिती नाही. मला अजूनही आईच्या माहेरच नाव किंवा कुणा नातेवाईकाची काही माहिती नाही.'

सबइंस्पेक्टर भावे आणि इंस्पेक्टर सिद्धि अजय साठेशी थोडसं जुजबी बोलून परत निघाले. भावे पुन्हा एकदा त्याच्या मॅडम माणसाच्या हालचालीवरून किती बिनचूक तो खर बोलतोय की नाही ते  ओळखतात तस आपल्याला कधी जमेल या विचारात होता तर  सिद्धिच्या मनात मात्र  सकाळी एफएम वर देवी सती आणि आत्ता ऐकलेली दुर्गा साठे यांची तुलना होत होती.

क्रमश:

पुढील भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 

 नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची -२. देवी ब्रम्हचारिणी 


  

Comments

लोकप्रिय

गुप्त समेवर - भाग १

नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची- २. देवी ब्रम्हचारिणी

गुप्त समेवर- भाग १७

नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची -३. देवी चंद्रघंटा