नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची - ८.देवी महागौरी
८.देवी महागौरी
"नवरात्रीतील अष्टमीच्या दिवशी महागौरीची उपासना करतात.भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी देवी पार्वतीने अरण्यात हजारो वर्षे उग्र तप केले. अरण्यातील ऊन, वारा पाऊस सहन करून हजारो वर्षे देवीने कडक उपवास केले. देवी पार्वतीन्च्या घोर तप:श्चर्येने शंकर प्रसन्न होऊन विवाहास तयार झाले. त्यांना देवी पार्वती ह्याच पूर्व जन्मीच्या देवी सती आहेत ही ओळख पटली. परंतु उग्र तप, अरण्यातील निवास, कडक उपवास यांमुळे देवीचे मूळचे तेजस्वी रूप काळवंडले होते, भगवान शंकरांनी देवी पार्वतींवर त्यांच्या जटेतील गंगेचा जलाभिषेक केला, गंगेच्या पवित्र जलाने देवी पार्वतीचे रूप उजळून निघाले. त्यांच्या या अत्यंत तेजस्वी रूपालाच आपण महागौरी म्हणून ओळखतो.
गौ चा अर्थ आहे ज्ञान, गमन, प्राप्ती आणि मोक्ष तर री म्हणजे देणारी! सामान्यज्ञान तर आपण सगळेच मिळवतो पण शाश्वत निरंतन ज्ञान ग्रहण करणे आवश्यक आहे. गमन म्हणजे गती, आयुष्य नेहमी प्रवाही असावं, थांबला तो संपला! प्राप्ती म्हणजे आपल्याला नक्की काय मिळवायच आहे स्पष्ट असावं, श्रेयश गोष्टी प्राप्त करण्याचं उद्दीष्ट असावं आणि मोक्ष म्हणजे मुक्ती,मृत्यूनंतर मोक्ष मिळवणे अस नाही तर जे आहे त्यात समाधानी राहण...आपल्याच अपेक्षांपासून मुक्ती मिळवल्यास निरंतन समाधानी राहू आपण. या गोष्टी आचरणात आणल्या तर नक्कीच आपले आयुष्य आंतरिक तेजाने उजळून जाईल."
खूप सारे कॅमेरे भराभर फ्लॅश होत होते. आज प्रथमच सगळ्या न्यूज चॅनलच्या कॅमेरामनला श्रीमती दुर्गा साठे यांची छबी टिपण्याची संधी मिळाली होती. गेले सात- आठ दिवस त्यांचे जुने फोटोज आणि अफाट कार्य हे प्रत्येक चॅनलद्वारे दाखविण्यात आले होते, त्यामुळे महाराष्ट्रातील घराघरात दुर्गा साठे आणि त्यांचे कार्य पोहोचले होते. सर्व स्तरातून त्या लवकर सापडाव्या म्हणून सदिच्छा व्यक्त केल्या जात होत्या. यापूर्वी कधीच आपण या महान व्यक्तीमत्वाची दखल घेतली नाही, याची खंत सगळ्या न्यूज रीपोर्टरना वाटत होती. आज सकाळी बारा वाजेच्या सुमारास दुर्गा साठे यांचा शोध घेण्यात पोलिसांना यश मिळाल्याची बातमी सगळीकडे वार्यासारखी पसरली. असंख्य सामान्य जनता आणि न्यूज रीपोर्टर यांचे ताफे दुर्गा साठे यांच्या बंगल्याबाहेर जमू लागले. इतर कोणत्याही अफवा पसरण्यापूर्वी अजय साठे यांनी आणि पोलिस यांनी तातडीने प्रेस कॉन्फरन्स बोलावली. त्यानिमित्त्याने दुर्गा साठे यांना प्रत्यक्ष कॅमेरात साठवण्याचा, त्यांची मुलाखत घेण्याचा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या अचानक बेपत्ता होण्याचे कारण जाणण्याचा योग आला होता. साधीच परंतु परिट्घडीची शुभ्र सूती साडी, चंदेरी छटा असलेल्या केसांची वेणी, कपाळावर बॅंडेडची स्ट्रिप, लंकेच्या पार्वतीपरी अंगावर एकही दागिना नसला तरी चेहर्यावर ओसंडून वाहणारे सात्विकतेचे तेज आणि देहबोलीतून जाणवणारा कमालीचा आत्मविश्वास यांमुळे त्या सगळ्यान्चे लक्ष वेधून घेत होत्या. शेजारील खुर्चीवर इंस्पेक्टर सिद्धि आणि पुढे कमिशनर बसले. होते.सर्व रिपोर्टरना उद्देशून कमिशनर बोलू लागले,
"आपणा सर्वांना कळले आहेच की इंस्पेक्टर सिद्धि यांनी दुर्गा साठे यांचा शोध लावण्यात यश मिळवले आहे. ही खूपच गुंता गुंतीची केस सोडवल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. या शोधा दरम्यान त्यांनी अनेक गैर उद्योगांचा आणि त्यामागे असलेल्या राजकीय नेत्यांचा पर्दाफाश केला तसेच कुख्यात गुंड राजू आणि त्याच्या टोळीला यमसदनी धाडले. इंस्पेक्टर सिद्धि यांच्या या कार्याची दखल नक्कीच घेतली जाईल असे मी आश्वासन देतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. श्रीमती दुर्गा साठे यांचा शोध कसं घेतला गेला याचा वृत्तान्त इंस्पेक्टर सिद्धीच स्पष्ट करतील."
कमिशनर सरांना धन्यवाद देऊन इंस्पेक्टर सिद्धि बोलू लागल्या,
"मीडियाला तर सगळ्याच गोष्टींची माहिती असते, मी काय सांगू?"
सिद्धिच्या या वाक्यावर मोठ्ठा हशा पिकला. त्या पुढे सांगू लागल्या,
"श्रीमती दुर्गा साठे यांच्या आयुष्यातील प्रत्येक घटना अर्थपूर्ण आणि क्रांतिकारक आहे, अगदी त्यांचे बेपत्ता होण देखील! ही केस माझ्याकडे आली तेव्हा सर्वात आधी मी दुर्गा साठे यांची इत्तंभूत माहिती मिळवली, त्यांच्या उत्तुंग कार्यामुळे मी भारावले गेले होते. अश्या कर्तृत्ववान परंतु साध्वी वृत्तीच्या व्यक्तीचे कुणाशी वैर असणे जरा अशक्य होते, तशीच माहिती त्यांच्या आप्तस्वकीयांकडून देखील मिळाली होती (हे बोलताना सिद्धिने अजय साठेकडे पाहिले). पण माझ्या सहकार्यांच्या प्रयत्नांमुळे अजिंक्य राठोडचे साठे उद्योग समूहाला नामोहरम करण्याचे प्रयत्न आणि त्यामागचे कारण म्हणजेच जेके'ज फूड आणि साठे उद्योग यांच्यातील १५ वर्षांपूर्वीचे वितुष्ट या गोष्टी समोर आल्या. अजिंक्य राठोडची चौकशी करण्यासाठी त्याच्याविरोधात ठोस पुरावे गोळा करताना अनेक धक्कादायक सत्य समोर आले. माझ्या वरिष्ठ अधिकार्यांच्या सहकार्यामुळे मी या सगळ्या राजकीय नेत्यांना तसेच कुख्यात गुंडांना योगी ते शासन करू शकले. या सगळ्या गदारोळत श्रीमती दुर्गा साठे यांचा शोध लागलाच नव्हता, पोलिस खाते दुसरीकडेच व्यस्त झाल्याच्या बातम्या देखील पसरल्या. परंतु तसे काहीच नव्हते. एकीकडे दुर्गा बाईंचा शोध घेणे सुरूच होते. त्या बेपत्ता होण्यापूर्वी आधी त्यांच्या आश्रमात गेल्या होत्या हे तुम्हाला माहिती आहेच. आम्ही संस्थेतील एक मुक मुलगा विशालच्या मदतीने उमाताईंसोबत गेल्या होत्या हे शोधून काढले. उमाताई ह्या बाजूच्या खेड्यातील एक निवृत्त शिक्षिका असून त्या संस्थेतील अभागी स्त्रीयांचे पुनर्वसन करण्याचे काम करत. प्रसंगी संस्थेत राहून महिलांना मार्गदर्शन करीत. गेल्या आठवड्यात एका अभागी महिलेला संस्थेत दाखल करण्यासाठी त्या संस्थेत आल्या होत्या. उमाताईंचा पत्ता संस्थेतून मिळाला, त्यांच्या खेड्यात जाऊन चौकशी केली परंतु त्यादोघी तिथे आल्याच नसल्याचे समजले. याचा अर्थ एकच होता की दुर्गाताई आणि उमाताई या खेड्याकडे जाणार्या रस्त्यात कुठे तरी हरवल्या होत्या. म्हणून आम्ही त्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या जंगलात शोध घेतला आणि आम्हाला दुर्गा बाईंना शोधून काढण्यात यश आले. त्या तिथे कश्या पोहोचल्या याची माहिती त्यांनी आम्हाला दिली ती अशी,
दुर्गाबाई त्यादिवशी सकाळीच संस्थेत काही कामानिमित्त गेल्या होत्या परंतु त्यांना संस्थेतील आवारात उमाताई घाईगडबडीत निघताना दिसल्या.त्यांची चौकशी केल्यावर दुर्गा बाईना समजले की उमाताईंचा मुलगा आजारी असल्याचा फोन आल्याने त्या तातडीने निघाल्या आहेत. त्यांना गाडीत बसवून दुर्गाबाई स्वता: उमाताईंना सोडायला निघाल्या. रस्त्यात काही लुटारूंनी हल्ला करून त्यांना बाजूच्या जंगलात एका झाडाला डांबून ठेवले आणि त्यांची गाडी पळवली. दुसर्या दिवशी जंगलातील काही आदिवाशी लोकांना बेशुद्ध अवस्थेतील या दोघी सापडल्या. त्या लोकांनी दोघींना पाडयावर नेऊन त्यांच्यावर उपचार केले. प्रचंड थकवा आल्याने त्या दोघी दोन दिवस ग्लानीत होत्या. त्या शुद्धीवर आल्यानंतर सगळ्यात मोठी अडचण भाषेची आली, त्यामुळे दुर्गाबाई आणि उमाताईंना त्यादोघी नक्की कुठे आहेत आणि आजूबाजूची माणसे नक्की कशी आहेत हेच समजले नाही. त्या पूर्ण बर्या होतात तोपर्यंत त्यांचा शोध घेत आमचे सबइंस्पेक्टर भावे आणि हवालदार मोरे तिथे पोहोचले आणि त्यांना सुखरूप परत आणले. माझ्यासोबत माझ्या सहकार्यांचा खूप मोठा वाटा या कार्यात आहे, त्या सर्वांना खूप धन्यवाद!!!"
इंस्पेक्टर सिद्धि सर्वांना अभिवादन करून खाली बसताच टाळ्यांचा कडकडाट झाला. एक पत्रकार उभा राहिला आणि इंस्पेक्टर सिद्धिचे अभिनंदन करून तो पुढे म्हणाला,
"दुर्गा साठे त्यादिवशी सकाळी संस्थेत गेल्या होत्या हे तुम्हाला कस कळलं???"
क्रमश:
पुढील भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची - ९. देवी सिद्धीदात्री

Comments