गुप्त समेवर - भाग १५

(...मागील भाग- १४)


गुप्त समेवर भाग - १५


      दोघींना वसुंधरा मॅमच्या अस अचानक जाण्याचा प्रचंड धक्का बसला होता. त्यादिवशी पार्टीच्या ठिकाणी दोघी पण डॉक्टरांच बोलणं ऐकून सुन्न झाल्या होत्या, काय कराव ते काहीच सुचत नव्हतं त्यांना.  गर्दीतून अचानक अविकाका आला आणि त्याने त्या दोघींना त्याच्या गाडीत बसवून तिथून बाहेर काढलं. दोघी निमूटपणे त्याच सगळं ऐकत होत्या, दोघींमध्ये पण त्याला काही विचारायचे त्राण नव्हते. थोड रडू ओसरल्यावर एकमेकिन्चा हात घट्ट पकडून झोपी गेल्या. दोघींना जाग आली तेव्हा मुग्धा आणि रीया गोंधळून गेल्या, अविकाकाने मुंबईला मुग्धाच्या घराबाहेर गाडी थांबवली होती! गेले आठ दिवस श्रीकांत आणि यशोदाच्या सानिध्यात मुग्धा सावरली गेली. खर तर तिला आर्यनची आठवण आली की खूप वाईट वाटायचं, त्याला फोन करायची हिम्मत मात्र होत नव्हती. पुण्याला गेल्यावर त्याला प्रत्यक्ष भेटून त्याच सांत्वन कराव अस त्यादोघींनी ठरवलं होत. शेताच काही काम असल्याने सुलू आजी सध्या गावाकडे गेली होती, त्यामुळे मुग्धाला घरी काहीच त्रास नव्हता. पण कॉलेज जास्त दिवस बुडवणे योग्य नसल्याने उद्याच ती आणि रीया पुण्याला परत जाणार होती. आज नाष्टा करताना आईबाबासोबत मुग्धा छान गप्पा मारत होती,

श्रीकांत- “तुझ्या ब्रेसलेटच्या त्या चित्रामध्ये आणि श्लोकामध्ये नक्की काय दडल आहे? फोनवर आपल बोलणं अर्धवट राहील होत. आता सगळं सविस्तर सांग बर!

मुग्धा मोबाइल वर ब्रेसलेटचे तुकडे जोडून तयार झालेल्या आयताकृती पत्र्याचे दोन्ही बाजूंचे फोटो दाखवत म्हणाली, 

(ब्रेसलेट च्या तुकड्यांपासून बनलेल्या आकाराची दुसरी बाजू)

“हा श्लोक अपूर्ण आहे. त्यामुळे त्याचा व्यवस्थित काही अर्थ लागत नव्हता. त्यातील पहिला शब्द आहे एलापूर म्हणजेच जुन्या काळातील वेरूळ’! कदाचित एलापूर च अपभ्रंश होत इंग्रजीमध्ये ELLORA हे नाव पडलं असावं, असो! मग आम्ही वेरूळच्या संबंधी ऐतिहासिक संदर्भ शोधले त्यामध्ये आम्हाला बडोद्यातील उत्खननात सापडलेल्या एका ताम्रपटावर तो पूर्ण श्लोक सापडला तो असा आहे,

एलापुराचलगताभ्दूतसन्निवेशम्

यदीक्ष्य विस्मित्विमानचरामरेन्द्रा: l

एतद्स्वयंभुशिवधाम न कृत्रिमे श्री-

र्दुष्टे दृश्यन्ति सततं बहु चर्चयन्ति l

भूयस्तथाविधकृतौ व्यवसायहाने-

रेतन्मया कथमहो कृतमित्यकस्मात् l

कर्तापि यस्य खलु विस्मयमाप शिल्पी

तन्नाम किर्त्नमकार्यत येन राज्ञा l

अर्थ- विमानातून जाताना एलापूर येथील पर्वतावर बांधलेले अद्भुत देवालय पाहून देव विस्मित झाले, ते आपल्याशीच म्हणू लागले, की हे देवालय स्वयंभू असावे कारण इतके सुंदर देवालय कृत्रिम असणे शक्यच नाही. ज्या शिल्पीकाराने हे बांधले तो तर विस्मयाने थक्क होत म्हणाला, हे परम अद्भुत आहे, हे माझ्याने कसे बांधले गेले तेच मला कळत नाही!

यशोदा- “हे देवालय म्हणजे वेरूळ येथील अद्भुत कैलास मंदिर तर नव्हे?”

मुग्धा- “बरोब्बर! आम्ही आधीच श्लोकाच्या दुसर्‍या बाजूला कोरलेले चित्र फोटो काढून शास्त्री सरांना पाठवले होते,

(ब्रेसलेट मधील आकार जोडून तयार झालेले चित्र)

त्यांना वेरूळच्या कैलास मंदिराचा संदर्भ दिला तर त्यांनी सांगितलं की, ते कोरलेले चित्र म्हणजे त्या कैलास मंदिरातील पुराणातील रावणाचे गर्व हरणाचा प्रसंग दाखवणारे एक शिल्प आहे. त्यात खाली असलेली मूर्ति म्हणजे रावण असून तो त्याच्या वीस हातांनी कैलास पर्वत हलवू पहात आहे. शंकराच्या दर्शनासाठी आलेल्या रावणाला शंकर पार्वती एकांतात असल्याने द्वारपालांनी हाकलून दिले म्हणून गर्विष्ठ रावण कैलास पर्वत हलवण्याचा प्रयत्न करू लागला. भगवान शंकर मात्र फक्त पायाचा अंगठा दाबून कैलास पर्वतास हलू न देता पार्वती आणि शिवगण यांना आश्वस्त करीत आहेत.”

यशोदा- “ही पौराणिक कथा मी ऐकली आहे. यावरून वेरूळच्या कैलास मंदिराकडे हे ब्रेसलेट निर्देश करत आहे असे दिसते. पण मग नक्की काय आहे त्या मंदिरात आणि त्याचा तुझ्या गतकाळाशी नक्की काय संबंध, मिनू?

मुग्धा-“तेच तर कळत नाहीये. पण ज्याअर्थी वसुंधरा मॅमला ब्रेसलेट मध्ये काही रहस्य दडल आहे हे माहीत होत, त्याअर्थी त्यांना माझ्याबद्दल पण बरीच माहिती असावी अस वाटत होत मला. आता त्याच नाहीत तर माझ्या भूतकाळाकडे जाणारे सगळे रस्ते बंद झालेत.”

श्रीकांत-“अस निराश होऊ नको मिनू, काही तरी मार्ग नक्कीच सापडेल.”

      या सगळ्या शोधात मुग्धाचे यशोदा आणि श्रीकांत यांच्याशी असलेल नात अजुनच घट्ट झालं होत. बर्‍याचदा रक्ताच्या नात्यापेक्षा मनापासून जोडलेल्या नात्यांत अधिक जिव्हाळा असतो!

      दुसर्‍या दिवशी मुग्धा आणि रीया पुण्याला त्यांच्या फ्लॅटवर ल्या आल्या त्या फ्रेश होऊन आर्यनला भेटायच म्हणून माधवगड बंगल्याकडे गेल्या. तिथे पोहोचल्यावर मात्र त्यांची निराशा झाली. बंगल्याच्या गेटच त्यांना वॉचमनकडून समजलं की सध्या इथे कुणीच नाहीये, वसुंधराताईच्या अचानक मृत्यूमुळे दु:खी असलेले आर्यन आणि माधव नेने कुणा नातेवाइकाकडे बाहेर गावी गेले आहे. ताईसाहेब बर्‍याचदा एकट्याच इथे रहात असल्याने आता हा बंगला बंदच राहील अशी हळहळ त्या वॉचमनने व्यक्त केली. इतक्यात शांताक्का तीच गाठोडे घेऊन गेटबाहेर आली. तिने बंगल्याची चावी वॉचमनकडे सोपवली आणि डोळ्यातील पाणी पुसत म्हणाली,

“निघते बाबा मी, इथे असलेले सगळे ऋणानुबंध संपले आता! हे घे चावी, मालकाने सांगितलं ती सारी व्यवस्था केली आहे बंगल्याची. आता माझ काही काम नाही इथे.”

“कुठे जाणारे म्हातारे? मॅडमनी खूप वर्षांपूर्वी तुझ कुणीबी न्हाय म्हणून तर तुला आश्रय दिलता न्हव?”

“आर बाबा शारदाश्रमच्या वृद्धाश्रम मध्ये, माझ्या वसुने समदि यवस्ता केली हाय. येते मी.”

      डोळे पुसत जाणार्‍या म्हातार्‍या शांताक्काची मुग्धाला दया आली. आता यापुढे माधवगड बंगल्यात कधीच येण होणार नाही अस वाटून त्या दोघी पण आल्या पावली परत निघाल्या. दुसर्‍या दिवशी कॉलेजला गेल्यावर वसुंधरा नेनेंच्या केबिनसमोरून जाताना त्यांना वसुंधरा मॅमची तीव्रतेने आठवण झाली. त्यांच्या केबिनबाहेर आता दुसर्‍या प्रोफेसरच्या  नावाची पाटी लागली होती. मॅडमच्या केबिनकडे बघून उदास झालेल्या मुग्धाला रीया एकदम गंभीरपणे समजाऊ लागली,

“जगाची ही रीतच आहे मिनू, कुणाच्या जाण्याने कधी ते थांबत नाही. वसुंधरा मॅमच्या जागी नवीन सरांची नेमणूक झालेली दिसतेय.”

“हो गं! इथे आल्यावर मला मॅम पार्टीमध्ये बोलल्या होत्या ते एकदम आठवलं. मी योग्य मार्गावर आहे अस सांगून रिजेक्ट केलेला प्रोजेक्ट त्यांनी मंजूर केला अस पण त्या म्हणाल्या होत्या. त्यांना अजून बरच काही बोलायच होत, ती फाइल शिपाई काकांकडून घेऊया आपण!”

“यस!!! कदाचित त्यामध्ये आपल्याला मॅमने मागे ठेवलेला एखादा क्ल्यु मिळेल.”

“ओये फा.फे.!! तुझ्यातला हा डिटेक्टिव्हचा किडा नेहमीच वळवळत असतो. मी ती फाइल घेऊन प्रोजेक्ट पूर्ण करावा अस म्हणत आहे. चल आता आधीच खूप लेक्चर बंक झालेत आपले. आजचे लेक्चर्स झाले की शिपाई काकांकडून घेऊया.”

अस म्हणून मुग्धा क्लासरूमकडे भरभर चालू लागली. तिच्यासोबत जात दबक्या आवाजात रीया म्हणाली,

“खर सांगू का मिनू? मला तर वसुंधरा मॅमचा मृत्यू हार्ट अटॅकने झालेला नसून कुणी तरी त्यांचा खून केला आहे, असच वाटतय. त्यांना काही तरी सांगायच होत, ते त्या व्यक्तीसाठी धोकादायक असावं म्हणून त्याने मॅमचा खून केला असेल. आणि स्वता:च्या जीवाला धोका आहे हे ओळखून मॅमने तुझ्यासाठी त्या प्रोजेक्ट फाइल मध्ये काही क्ल्यु नक्की ठेवला असेल बघ!”

“हे जरा अतिच होतय रीया!”

      मुग्धाने रीयाच बोलणं धुडकावून लावलं असल तरी कुठे तरी तिला ते पटत होत. सध्या तिच्या आयुष्यात अश्या अनेक अतर्क्य गोष्टी घडतच होत्या की! मॅमच्या पार्टीत अविकाका काय करत होता? त्याने मुग्धाला त्यांच्यापासून दूर राहायला सांगितल असलं तरी त्याच कारण काही सांगितलं नव्हतं? तिचा भूतकाळ शोधण्यासाठी त्याचा विरोध का? तो पार्टीत दिसणं आणि थोड्याच वेळात मॅमचा अचानक मृत्यू होण...काय संबंध आहे सगळ्याचा?  मुग्धाच्या डोक्यात या सार्‍या विचारांनी थैमान घातल होत, त्यामुळे एक लेक्चर संपून दुसर कधी सुरू याचा तिला काहीच पत्ता नव्हता.                 

क्रमश:

पुढील भाग
गुप्त समेवर भाग १६

Comments

Suyog Kulkarni said…
मस्त. पुढील भागाची प्रतीक्षा...
Sayali Mulay said…
Khup Chhan...👌👌 Waiting For Next Part
Gauri said…
धन्यवाद...
Gauri said…
धन्यवाद... पुढील भाग लवकरच पोस्ट करेन

लोकप्रिय

गुप्त समेवर - भाग १

नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची- १. देवी शैलपुत्री

नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची- २. देवी ब्रम्हचारिणी

गुप्त समेवर- भाग १७

नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची -३. देवी चंद्रघंटा