गुप्त समेवर - भाग ३

“ खा गं मिनू, किती बारीक झाली आहेस! अजून एका परठ्याने काही जाड होत नाही तू!”
खूप दिवसानी घरी आलेल्या मुग्धाचे आईकडून भारी लाड सुरू होते.
“ आई खरच बास झाल आता, इतक्या दिवसांचा कोटा आजच पूर्ण करायचा आहे अस खाऊ घालते आहेस! बाबा तू तरी सांग ना आईला.”
“ तुम्ही मायलेकी काय ते पहा... मला नका ओढू मध्ये... माझी महत्त्वाची मीटिंग आहे, निघतो मी. आणि हो मिन्या, माझ्या वाटचा पराठा पण तुझाच हं! बाय ...”
मिनुला चिडवत तिचा बाबा म्हणजे श्रीकांत साठे हसतच घराबाहेर पडले.
“बाबा तू पण...”
लटक्या रागात मुग्धा ओरडली! एखाद्या मस्त रंगलेल्या मैफिलीत अचानक स्पीकर फाटून चिरका स्वर आल्याने तिचा बेरंग व्हावा त्याप्रमाणे डायनिंग टेबल वर मायलेकींच्या गोड गप्पा सुरू असताना अचानक देवघरातून बाहेर येत सुलू आजी खेकसली,
“ चालू द्या तुमचे भिक्कार लाड! माझ्या मेलीकडे बघायला वेळ कुणाला आहे या घरात?”
सुलू आजी म्हणजे सुलोचना साठे, श्रीकांतची आई. वयाने साधारण ८० वर्षांची असाली तरी एकदम ठणठणीत! श्रीकांतचे वडील गेल्यापासून गेली १६ वर्षे ती गावी एकटीच राहत होती. मागच्या वर्षी श्रीकांतने बळेच तिला मुंबईला आणले होते. इतरांसाठी ती तशी प्रेमळ असली तरी मुग्धाच्या वाट्याला नेहमी तिरस्कार येई. मागच्या वर्षी आजी मुंबईत येण्याआधीच मुग्धा पी.जी. च्या निमित्ताने पुण्याला राहायच ठरवलं, घरात तिची घुसमट होऊ नये म्हणून आई बाबांनी पण तिचा निर्णय लगेच मान्य केला होता. आता मुग्धा घरी आल्यावर तिचे होणारे लाड पाहून आजीने तिच्यावर आगपाखड सुरू केली.
“ अहो आई अस काय म्हणता! तुम्ही बसा मी मस्तपैकी आल्याचा चहा करून आणते.”
आजीचा रुद्रवातर शांत करण्याचा नि:ष्फळ प्रयत्न करत यशोदा किचनकडे पळाली आणि मुग्धाने पाण्याचा ग्लास आजीला दिला,
“एकदा शेवटचं पाणी पाज आम्हाला. काळ्या पायाची कुठली! आधी माझा नवरा खाल्ला आता आम्हाला पण गीळ!”
आजीच्या तोंडाचा पट्टा सुरू होता, अन् त्यातील एक एक शब्द मुग्धाच्या जिव्हारी लागत होता. हिरमुसून ती तिच्या खोलीत जाऊ लागली इतक्यात तिच्या कानावर आजीचे आग ओकणारे शब्द आदळले,
“या म्हातारीच न ऐकता तुम्ही या रस्त्यावरच्या पोरीला घरी आणल….”
हे ऐकून घायाळ झालेली मुग्धा जागीच थबकली. तेव्हढ्यात यशोदा किचन मधून धावतच बाहेर आली आणि काकुळतीला येत म्हणाली,
“आई, कृपा करून थांबवा हा विषय, शांत व्हा आता... मी पाया पडते तुमच्या.!”
“ कस शांत होऊ? तेव्हा तुम्ही माझ काही ऐकल नाही, या पोरीला घरात घेतलं. माझ्या महाराजांचं भाकीत कधीच खोट नाही होत, या अनाथ पोरीपायी आपण एखाद्या मोठ्या संकटात सापडलो न मग पटेल माझ बोलणं तुला!...”
एका दमात एव्हढ बोलल्याने आजीला धाप लागली होती. एका जागी खिळून उभी असलेली मुग्धा आईकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागली, आजीचा “अनाथ पोरी पायी ” हा शब्द तिच्या कानात घुमत होता. गेली १६ वर्षे कसोशीने मुग्धापासून जे सत्य लपवलेल, ते अशाप्रकारे तिच्या समोर आल्याने यशोदा एकदम हतबल झाली, आता मुग्धापासून अजून तीच सत्य लपविण्याचे यशोदेत नव्हते. तिला सगळं खर सांगावं या उद्देशाने यशोदा मुग्धाजवळ गेली, आणि म्हणाली,
“ बाळा, तुझ्यापासून अजून सत्य लपवायची हिम्मत नाही माझी, आजी म्हणतेय ते खर आहे, आम्ही तुझे जन्मदाते आईबाबा नाहीत.
“आई???...” एकदम केविलवाणी झालेली मुग्धा इतकाच बोलू शकली.
“हो बाळा...१६ वर्षांपूर्वी आम्ही तुला दत्तक घेतलं होत.” यशोदाच हे वाक्य ऐकून मुग्धाच्या पायाखालची जमीन हलली.
“पण?? ... मग??... माझ??” अस काही अस्पष्ट पुटपुटत मुग्धा भोवळ येऊन पडली.
जाग आली तेव्हा मुग्धा दवाखान्यात होती. तिच्या एका हाताला सलाईन सुरू होत, दूसरा हात तिच्या उशाशी बसलेल्या यशोदेच्या हातात होता. अत्यंत प्रेमाने आणि काळजीने यशोदा तिच्या डोक्यावरुन हात फिरवत बसली होती. तिला शुद्ध आलेली पाहून यशोदा जरा आनंदी झाली आणि म्हणाली,
“ किती त्रास करून घेतला मिनू! आता काहीच विचार करू नको. शांतपणे पडून रहा. डॉक्टरांनी आराम करायला सांगितले आहे.”
यशोदेच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करुन, एकदम तुटकपणे मुग्धाने तिच्या हातातून स्वता:चा हात काढून घेतला आणि तोंड फिरवून झोपी गेली. मुग्धाच्या अश्या तुटक वागण्याने यशोदेच्या काळजाच पाणी पाणी झाल! दवाखान्यातून घरी आल्यावर पण मुग्धा श्रीकांत आणि यशोदाशी काहीच बोलत नव्हती.पूर्ण दिवस ती तिच्या खोलीत एकटी बसून विचार करत होती. नक्की कोण आहे मी? गेली कित्येक वर्ष मुग्धा श्रीकांत साठे म्हणून जगतेय मी, पण हे माझ अस्तित्व नाही. कोण आहेत माझे आईबाबा? त्यांनी का सोडून दिल असेल मला?....अशा असंख्य प्रश्नांनी तिच्या डोक्यात थैमान घातले होते. औषधांमुळे ग्लानी आली की थोडावेळ ती झोपी जाई. खूप दयनीय अवस्था झाली होती तिची! इकडे श्रीकांत आणि यशोदाची पण तीच अवस्था होती.
दुसर्या दिवशी सकाळीच श्रीकांत मुग्धाच्या खोलीत आला. स्वता:ला जगापासून तोडून, खिडक्या, पडदे लावून मुग्धा शून्यात नजर लावून बसली होती. आल्या आल्या श्रीकांतने पडदे बाजूला केले, खोलीत सूर्याची कोवळी किरणे पसरली, वातावरणात जरा उत्साह आला. मुग्धाच्या बेडजवळ बीन बॅग सरकवून त्यावर बसत श्रीकांत नेहमीच्या खेळकर स्वरात म्हणाला,
“ अजी जाने दो...अब छोड़ो भी...इतना भी क्या चुप चुप रहना, कुछ अपनी कहो, कुछ मेरी सुनो.”
श्रीकांतचा हा उपाय कामी आला. लहान असल्यापासून मुग्धाचा रुसवा काढण्यासाठी तो हेच गाण म्हणून तिला हसवत असे. या गाण्यासोबतच मुग्धाला यशोदा आणि श्रीकांतने तिला किती प्रेमात, लाडात वाढवल याची आठवण झाली. ते आईबाप म्हणून कुठेच कमी पडले नव्हते. आता पण आपण इतके विचित्र वागूनही यांचं आपल्यावरील प्रेम तसूभरही कमी झाल नाही, याची जाणीव झाल्याने मुग्धा रडू लागली. तिला हलकेच थोपटत श्रीकांत म्हणाला,
“ मिनूड्या, तुला आम्ही जन्म दिला नसला तरीसुद्धा तू आमच्या काळजाचा तुकडा आहेस बाळा! तू जर इतका त्रास करून घेतला तर आमचं कस होईल? ती बघ यशू, कालपासून तुला दुरून पाहतेय अन् तळमळतेय!” मुग्धाने दारात उभ्या यशोदे कडे पाहिले आणि कवेत घ्यावं म्हणून आसुसलेल्या लहान मुलीसारख ती म्हणाली,
“ आई...”
दोन दिवसांनंतर मुग्धाच्या तोंडून आई ही हाक ऐकून, यशोदा धावतच तिच्याजवळ आली आणि तिला कुशीत घेऊन रडू लागली. डोळ्यांतून ओघळणारे अश्रू सावरत श्रीकांतने त्या दोघींना आपल्या कवेत घेतले. भावनेचा भर ओसरल्यावर मुग्धा त्या दोघांचा हात हातात घेत म्हणाली,
“माझ चुकलं आई बाबा... माफ करा मला! दोन दिवस मी खूप वाईट वागले तुमच्याशी.” यावर यशोदा काही बोलणार इतक्यात तिला थांबवत श्रीकांत म्हणाला,
“ मिनू आणि यशू , माझ्या या दोन पर्या मला आधीसारख्या हसर्या हव्यात. झाल ते सगळं विसरून आपण पुन्हा पूर्वीसारखं आनंदात जगूया. Come on, Promise me now !” वचन घेण्यासाठी श्रीकांतने दोघींसमोर हात पुढे केला. दोघींनी पण हसत त्याच्या हातावर हात दिला. आयुष्य उध्वस्त करणार्या ह्या वादळात कोलमडून न जाता, एकमेकांना सावरून घेत तिघांचं हे घरटं पुन्हा एकदा आनंदात न्हाऊन गेल!
( मुग्धाचे खरे अस्तित्व आणि बरीच रहस्य उलगडतील पुढच्या भागात ! )
Comments