वसुंधरा दिन
चोहोबाजूंना रंगीबेरंगी फळाफुलांनी लगडलेली हिरवीगार झाडे, त्या डौलदार झाडांवर चिवचिवणारे चिमणपाखरे, बाजूने खळखळ वाहणारी नदी, स्वच्छ निळेशार आकाश , शुद्ध हवा आणि या आल्हाददायी वातावरणात खेळण्यात दंग असलेले बालगोपाळ... अहाहा किती सुंदर दृश्य!! हि शुद्ध मोकळी हवा, डोळे दिपवणाऱ्या निसर्गाच्या अनोख्या रंगछटा, चित्त प्रसन्न करणारे झाडे-पक्षी-नदी-हवा यांचे मंजुळ ध्वनी... सार काही अत्यंत विलोभनीय आहे.
पण... पण हे काय झालं अचानक? सार काही पुसट झालं. ... कुठे आले मी ?
इथे तर मोठमोठ्या इमारती आणि लांबच लांब डांबरी रस्ते दिसताय. एक चिटपाखरू देखील नाही. एकदम गुदमरल्या सारखं का होतंय मला?? किती वेगाने जाताय सारी वाहने! वाहनांमध्ये बसलेल्या प्रत्येकाच्या पाठीवर टाकी लटकलेली आहे आणि त्यातून निघालेली नळी नाकाला जोडलेली, चेहराच दिसत नाही कुणाचा! अरे हे तर छोटे ऑक्सिजन सिलेंडर आहे. पण माझ्याकडे नाही हे, म्हणून तर ... वाचवा हो कुणी तरी...वाचावा, माझा श्वास कोंडतो आहे...
किती भीतीदायक स्वप्न होत हे! मी माझ्या घरात सुखरूप असल्याची खात्री झाल्याने जरा बरं वाटलं..उजाडलेलं होत, पण खूप मरगळ आली होती. इतक्यात बाजूला झोपलेली माझी परी दिसली आणि अचानक प्रसन्न वाटलं. आजचा दिवस खूप खास आहे आमच्यासाठी... काय म्हणून काय विचारात? अहो आज २२ एप्रिल न... माझ्या परीचा वाढदिवस! खूप दिवसांपासून तयारी सुरु असते आजच्या दिवसाची. सगळी मरगळ झटकून मी कामाला लागले.
सकाळच्या स्वप्नाचा एव्हाना मला विसर पडला होता, इतक्यात ऑनलाईन क्लास संपवून माझी लेक आली. आनंदाने नाचतच मला विचारू लागली,
"आई आज काय आहे बर?"
"आज एका मुलीचा वाढदिवस आहे आणि आत्ताच ऑनलाईन सेलिब्रेशन झालं नं?
"अगं ते तर झालंच! पण अजून काय आहे?"
"अजून काय? मला नाही माहित बुआ!!"
"आज MOTHER EARTH DAY म्हणजे वसुन्धरा दिन आहे. आज आम्हाला त्यावर निबंध लिहायचा आहे. "
मला वसुंधरा दिनाची थोडीफार माहिती असली तरी माझ्या परीला आज नक्की काय काय समजलं हे जाणून घ्यावं म्हणून मी हातातील सगळी काम सोडून तिच्याशी या विषयावर गप्पा मारू लागले.
" मग या वसुंधरा दिनाचं महत्त्व काय? आणि हा कसा बरं साजरा करायचा?"
माझी लेक तिच्या मॅमने त्यांना आज जे सांगितलं ते खूप उत्साहाने सांगू लागली,
"आज आमच्या मिसने सगळी माहिती दिली आणि मी इंटरनेट वर पण खूप काही वाचलं आहे. २२ एप्रिल १९७० पासून अमेरिकेतील गेलार्ड नेल्सन यांनी Earth Day साजरा करायला सुरुवात केली आणि आता जगभरात हा दिवस वसुंधरा दिन म्हणून साजरा केला जातो.
अगं तुम्ही मोठ्यांनी खूप सारी झाडं तोडली आणि वाहने, कारखान्यातील यंत्रे यांच्या अति वापरा मुळे आपल्या mother earth चे खूप नुकसान केलं. पाणी, हवा, जंगले या नैसर्गिक साधनसंपत्तीच्या अतिवापराने पृथ्वीचा तोल ढासळतो आहे, तसेच प्रदूषण पण खूप वाढतं आहे. हे असच सुरु राहिलं तर आम्ही आणि आमच्या नंतर च्या पिढीचं काही खरं नाही. या सगळ्याचा विचार करून लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासठी वसुंधरा दिन साजरा करतात. "
लेकीने एका दमात तिला प्राप्त झालेल्या ज्ञानाचा साक्षात्कार करवला आणि माझे डोळे खाड्कन उघडले! आज सकाळी सकाळी मला पडलेल्या स्वप्नाचा उलगडा झाला. माझी लेक पुढे सांगू लागली,
"अगं आई, अशी घाबरून जाऊ नको. आपण जर का खूप सारी झाडं लावली प्रदूषण कमी करण्याचे उपाय केले तर सगळं काही छान होईल.. मी आता निबंध लिहिते आणि संध्याकाळी माझा वाढदिवस साजरा करायचा आहे, पटापट आवरायला हवं!"
मला विचारात टाकून लेक तिच्या कामाला लागली. मी मात्र सध्याची कोरोना मुले सगळ्या मानवजातीची झालेली भयावह स्थिती, कृत्रिम ऑक्सिजन साठीची वाढती मागणी, वाढते प्रदूषण, वृक्षतोड, पर्यावरण हानी आणि आजच्या वसुंधरा दिनाचा विचार करू लागले. जर अशीच परिस्थिती राहिली तर, मला सकाळी स्वप्नात जे दुसरं भयानक दृश्य दिसलं ते भविष्यात खरं होऊ शकत. ह्या विचारासरशी माझ्या अंगावर काटा आला. मला माझ्या भावी पिढीसाठी काही तरी केलं पाहिजे, स्वप्नातील आधीच दृश्य साकार करण्यासाठी वसुंधरा दिन साजरा करायलाच हवा.
Comments