जन्म बाबाचा
चंदा ने पूछा तारों से ,
तारों ने पूछा हजारोसे ,
सबसे प्यारा कौन है?
पापा मेरे पापा...
हे गाणं कानांवर आल्याने माझी झोपमोड झाली आणि मी डोळे उघडून समोर पाहताच माझी दोन्ही पाखरे हॅपी फादर'स डे म्हणत मला येऊन बिलगली. बेस्ट स्टुडण्ट ऑफ द इयर, बेस्ट एम्प्लॉयी ऑफ द इयर, इत्यादी इत्यादी किती तरी पुरस्कारांपेक्षा खूप मोठ्ठा पुरस्कार आज मला मिळाला होता. कधी कधी अत्यानंदामुळे डोळयांतून पाणी येत म्हणतात त्याचा प्रत्यय मला येत होता, नक्की कसं रिऍक्ट व्हावं तेच कळत नव्हतं मला ! माझी अवस्था ओळखून माझ्या बायकोने मुलांना बाकीची तयारी करायला बाहेर पिटाळलं आणि मला चिडवत म्हणाली
" तू करून दाखवलंस... ATM machine ते मुलांचा प्रिय बाबा कसा वाटतोय हा बदल?"
"खूप म्हणजे खूपच भारी...खरचं गं, गेल्यावर्षी याच दिवशी आपल्या छोट्याने टीचरना सांगताना मी ऐकले कि 'My Dad is like a ATM machine for me.' यापेक्षा जास्त तो काहीच बोलू शकला नाही माझ्याबद्दल!! त्यावेळी माझे डोळे खाड्कन उघडले. माझ्या मुलांच्या विश्वात माझं स्थान फक्त आणि फक्त पैसे पुरवणार यंत्र आहे, हे कळल्याने मी अंतर्बाह्य हादरून गेलो. यात खार तर त्यांची काहीच चूक नाही, माझी तरी कुठे चूक होती? वर्षानुवर्षे आपल्याकडे हेच तर होतंय आईची महती गाण्यात आपण इतके व्यस्त होतो कि बापाकडे सपशेल दुर्लक्ष करतो. आईइतकाच आपल्या अस्तित्वासाठी वडील पण महत्वाचा असतो हे कळतच नाही कुणाला. आईच्या उदरात नऊ महिने गर्भ म्हणून आपलं अस्तित्व असलं तरी 'तुम्ही बाबा होणार आहेत' हे वाक्य कानी पडताच एखादा उनाड मुलाचा जबाबदार माणूस बनतो, हे आपण विसरून जातो. बायकोकडून स्वतःचे लाड करून घेण्याऐवजी तो तिला होणाऱ्या बाळासाठी फुलासारखा जपू लागतो. आई जेव्हा बाळाच्या जन्मावेळी प्रसूतिवेदना सहन करत असते, तेव्हा त्या होणाऱ्या बापाच्या मनाची तडफड कुणीच वर्णू नाही शकत! आपल पोट भरण्यासाठी आईने चुलीपुढे केलेले कष्ट दिसतात पण महिन्याचा किराणा आणण्यासाठी बापाने बाहेर गाळलेला घाम नाही दिसत. हे करू नको, बाबा रागवतील, ते करू नको बाबा मारतील हेच ऐकत आपण मोठे होतो. आपल्या गरजांसाठी पैसे पुरवणारा आणि शिस्तीच्या नावाखाली बडवणारा म्हणूनच आपण बापाला ओळखतो. आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीने पुरुषाला प्रमुखपद बहाल करून त्याचा भावनिकरित्या व्यक्त होण्याचा हक्कच हिरावून घेतला आहे. आपण बाबा होणार हे कळल्यावर आनंदासोबत जबाबदारीच एक मोठ्ठ ओझं मनावर येत आणि मुलांना काही कमी पडू नये याचसाठी माणूस आयुष्यभर कष्ट उपासतो, परंतु हे करत असताना तो नकळतपणे मुलांपासुनच दुरावला जातो. मी पण तर तेच करत होतो.
पण गेल्यावर्षीच्या प्रसंगाने मी भानावर आलो. बाप म्हणून मुलांच्या मनात असलेली माझी प्रतिमा मला बदलायची होती. त्यासाठी मला खर तर काहीच कष्ट पडले नाहीत, उलट हे वर्ष खूप छान जगलो मी! खर तर मुलांसाठी वेळ देणं म्हणजे मुलांवर उपकार नसून माझीच एक भावनिक-मानसिक गरज होती. त्यांच्यासोबत खेळताना माझं लहानपण पुन्हा गवसलं मला! एखादी गोष्ट करू नको असं दरडावून सांगण्यापेक्षा ती का करू नये हे समजावणं इतकं काही अवघड नसत, हे कळलं मला. त्यांच कुतूहल शमवताना दमछाक होत असली तरी ते निरागस प्रश्न आणि चौकसवृत्ती यांमुळे प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन मला सापडला. माझ्या स्वभावात आमूलाग्र बदल होऊन कुठलेही प्रोफेशनल कोर्सेस न करता ऑफिस मध्ये बॉस म्हणून मी लोकप्रिय होतोय. आणि यापेक्षा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे म्हणजे मी आज माझ्या मुलांच्या मनात, त्यांच्या भावविश्वात आई इतकाच जवळचा, त्यांचा प्रिय बाबा म्हणून स्थान मिळवलं. संदीप खरेंची दमलेल्या बाबाची कहाणी काळजाला भिडते खरी, पण खरच मुलांना पैशानेच सारी सुख नाही देता येत. कुठेतरी समतोल राखण शिकायला हव. मुलानच्या भविष्याची तरतूद करताना त्यांचा बाबा त्यांच्यापासून दुरावला जाणार नाही याची मी काळजी घेईन आणि माझं बापपण एन्जॉय करेन..... हॅपी फादर'स डे !!!

Comments