कुत्र चावल तर...

 आपण मोठे स्वतःला शहाणं समजून लहान मुलांना काही शिकवायला जावं आणि मुलांच्या डोकेबाज पणापुढे निष्प्रभ व्हावं!!! दिसायला इतकुसे असले तरी यांची डोकी खूप भारी आणि विचार एकदम स्पष्ट आणि पक्के असतात. आता म्हणाल, मधूनच अस काय झालं आणि मला ही उपरती झाली. तीच  धमाल सांगायला हा लेखनप्रपंच!

हि घटना आहे प्राचीन काळातील म्हणजे कोरोनारूपी राक्षसाच्या आगमनापूर्वीची! जेव्हा सर्व काही सुरळीत चालू होत, घरातील छोटे शैतान खऱ्याखुऱ्या शाळेत जाऊन माझ्या सारख्या बिचाऱ्या आयांना  काही तास मनःशांती द्यायचे. गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी... आता ऑनलाईन शाळेने पालकांची जी काही वाट लावली आहे, असो!( तो एक वेगळाच किस्सा आहे, परत  कधी तरी सविस्तर लिहीन!) 

त्याच असं झालं, माझी  कन्याश्री ( जस मातोश्री , पिताश्री यानुसार तिने स्वता:ला कन्याश्री ही पदवी बहाल केली आहे.😃 बरोब्बर ओळखलंत, मागील लॉकडाउन मधील रामायणाचे परिणाम!!) म्हणजे स्पृहा नुकतीच शाळेत जाऊ लागली होती. शाळेत जाणार म्हणून एक आठवडा आधी पोरीने जोमाने सगळी खरेदी केली, त्यापूर्वी आम्ही जवळपास सहा महिने ८-१० शाळा पालथ्या घालून सगळा अभ्यास करून ठेवलेला आणि एक दोन  शाळा निश्चित केल्या  परंतु शेवटी कन्याश्रीला पसंत पडलेल्या वेगळ्याच शाळेत ( जिथे खूप मोठं garden, घसरगुंडी आणि झोका होता.)  प्रवेश घेतला .  बाबाने पण पोरीच्या शाळेच्या पहिला दिवस म्हणून (कधी नव्हे ती) सुट्टी काढलेली, नवीन ड्रेस घालून, नुसता टिफिन असणारी सॅक पाठीवर लटकावून, गळ्यात वॉटरबॅग अडकवून एकदम उत्साहाने कन्याश्री जायला तयार झाल्या. प्रथेनुसार घरातून निघताना सेल्फी वगैरे काढून झाले, आधी शाळेत सोडू आणि मग छानसं कॅप्शन लिहून फोटू पोष्टवू असा विचार करून स्कूल चले हम... शेजारीपाजारी सगळ्यांकडून कौतुक करून घेत, 'मी  शालेत  जातेय, टाटा ' म्हणून  स्पृहाची  गाडी खुशीत निघाली. पहिल्यांदाच पोरीला लांब सोडतेय म्हणून माझी घालमेल होत होती, पण ती आनंदात आहे म्हणून मी स्वतःला सावरलं. जस शाळेच्या गेटजवळ आलो, तस चित्र एकदम पालटून गेलं. इतका वेळ आनंदाने फुललेला चेहरा भीती, दुःख याने झाकोळून गेला आणि स्पृहाने जोरात भोकाड पसरला... पठ्ठी शाळेत जायलाच तयार नाही!! तिला शाळेत रुळवण्यासाठी आम्हाला अगदी ' भगीरथ प्रयत्न करणे म्हणजे काय' याचा प्रत्यय आला होता. पहिले ३-४ महिने पोरगी तिच्या क्लास मध्ये गेलीच नाही,  शाळेच्या आवारातच आजूबाजूला थांबून तिला तासाभराने घ्यायला गेले कि  कधी पोर्च, कधी गार्डन, कधी ऑफिस आणि कहर म्हणजे प्रिंसिपल मॅडमची केबिन आणि चेअरमन यांच्या केबिन मध्ये  असायची. अगदी लहान वयातच  तिची पोहोच खूप मोठ्यांपर्यंत गेली, आख्खी शाळा स्पृहाला ओळखू लागली, आणि मला पण!!!( बहुतेक इतक्या दिव्य पोरीला मी कसं  सांभाळत असेल, यामुळे ते सगळे माझी किव करत असणार) 

कसबसं सहा महिन्यांनी कन्याश्री हसतमुखाने शाळेत जाऊ लागली आणि आल्यावर एकेक किस्से सांगून माझं मनोरंजन  करू लागली. असच एकदा  मिसने केलेलं कौतुक सांगताना कन्याश्रीचा ऊर आनंदाने भरून गेला होता. आता हे पुराण  नुसतच  ऐकत बसले तर आमचे खायचे वांदे व्हायचे, म्हणून मी स्वयंपाक करायला घेतला. काही जणी स्वयंपाक करताना करमणूक म्हणून सिरीयल बघतात, रेडिओ ऐकतात पण मला कधी याची गरज भासत नाही. स्पृहा नावाचं चालत फिरत चॅनेल आमच्याकडे नेहमी सुरूच असत!! कुकर लावून  भाजीला फोडणी वगैरे देऊन झाली आणि कन्याश्रीच चॅनेल एकदम म्यूट झालं. पोळ्या करण्यासाठी पोळपाट-लाटणं यांची जमवाजमव  करताना एकदम स्पृहाला स्कॅन करून घेतलं ( अशी शांतता म्हणजे नक्कीच येणाऱ्या वादळापूर्वीची किंवा कुठला तरी उपद्व्याप सुरु असण्याची असते हो!) ती माझ्या शेजारी डब्यावर उभं राहून कढईत शिजणाऱ्या भाजीकडे बघत होती आणि  तिच्या चेहऱ्यावरील  बदलत जाणाऱ्या भावांवरून  तिच्या डोकयात नक्की काय शिजतंय याच मला टेन्शन आलं. तेवढ्यात तक्रारीच्या सुरात  स्पृहा म्हणाली,

"आई, सिद्धी आणि काव्याला आता मी काहीच देणार नाही. मी नेहमी त्यांना पेन्सिल, शार्पनर देते, पण त्या मला काहीच देत नाहीत. "

तीच म्हणणं पटलं तरी  पालकत्वाची अनेक पुस्तक कोळून प्यायल्याने आपल्या लेकीला आदर्श नागरिक बनवण्याची माझी जबाबदारी घेत मी तिला समजावलं,

"अगं जाऊ दे, आपण नेहमी इतरांना मदत करावी, त्यांनी कसही  वागो, आपण चांगलंच वागावं!"

"असं कसं? त्यांनी वाईट वागलं, तरी मीच का चांगलं वागू?"

तव्यावरची पोळी भाजत, पोळपाटावर पोळी लाटत असताना हिला आता कसं समजवावं याचा विचार करत  होते, इतक्यात मला माझ्या आईच ठेवणीतलं वाक्य आठवलं, ( मी असंच जेव्हा आईला विचारी तेव्हा मला समजावताना शेवटी आई असं बोलली कि मी गपगुमान तीच ऐकून घेई.) आता तेच वाक्य मी ढापलं,

"हे बघ बाळा, तू चांगली आहेस म्हणून तू नेहमी चांगलं वागायचं! कुत्र आपल्याला चावलं म्हणून आपण कुत्र्याला चावायला जातो का? नाही न! तसंच दुसरा वाईट वागला म्हणून आपण वाईट वागू नये."

हुश्श... यावर काही उत्तर आलं नाही, खाली मान खालून कन्याश्री डब्यावरून उतरली आणि खाली पडलेली खेळणी खेळू लागली. आता आपली सुटका झाली शिवाय आपल्या लेकीला चांगुलपणा शिकवल्याच्या आनंदात मी स्वतःची पाठ थोपटली आणि दुसरी पोळी लाटायला घेतली. पण माझा हा आनंद ह्या छोट्या आनंदीबाईला बघावेत तर ना... पुढच्या क्षणी तिच्या अति सुपीक खोपडीतून आलेला विचाराने माझ्यावर प्रतिहल्ला करत ती म्हणाली,

"आई , आपण कुत्र्याला चावू  शकत नाही पण काठीने मारू शकतो ना... "

चेहऱ्यावर मिश्किल हसू आणून लढाई जिंकल्याच्या अविर्भावात स्पृहा पुन्हा एकदा डब्यावर उभी राहिली आणि इतक्य वर्षात मला का नाही हे सुचलं म्हणून मी हातातील लाटणं  स्वतःच्या डोक्यात मारून घेतलं. 

कोणत्याही वाक्याला प्रत्त्युत्तर देऊ शकणारी हि माझी कन्याश्री मोठी होऊन निष्णात वकील बनू शकेल, यातच मी समाधान मानलं!!!

©️®️ गौरी

(लेखाचे सर्व हक्क राखीव. लेखिकेच्या नावासहित शेअर करण्यास काहीच हरकत नाही.)

लेख कसा वाटला, ते नक्कीच सांगा. 

Comments

लोकप्रिय

गुप्त समेवर - भाग १

नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची- १. देवी शैलपुत्री

नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची- २. देवी ब्रम्हचारिणी

गुप्त समेवर- भाग १७

नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची -३. देवी चंद्रघंटा