गुप्त समेवर - रहस्यभेद भाग १

(गुप्त समेवर या कथेच्या पहिल्या पर्वात आपण पाहिले कि, मुग्धाला तिच्या भूतकाळाची उकल झाली. तिचे खरे आई वडील क्रांती ( इतिहासतज्ज्ञ) आणि  अविनाश पूर्वाश्रमीचा  यशोधन ( सॉफ्टवेअर इंजिनियर) असून तिच्या आईला म्हणजेच क्रांतीला संशोधनात काही तरी रहस्यमय गोष्टींची उकल झाली होती आणि ती माहिती मिळवण्यासाठी माधव नेने याने १६ वर्षांपूर्वी क्रांतीचा  ॲक्सिडेंट घडवून आणला होता. 

इतर पात्रे 

मुग्धा उर्फ यशोधरा - शांत , सुंदर , हुशार पण हळवी आपल्या कथेची नायिका.

रिया - आर्किओलॉजि ची विद्यार्थिनी आणि  मुग्धाची बेस्ट फ्रेंड 

अविनाश उर्फ  यशोधन - मुग्धाचे जन्मदाते वडील आणि क्रांतीचा नवरा

क्रांती - मुग्धाची जन्मदाती आई आणि ऐतिहासिक संशोधक 

वसुंधरा नेने-   इतिहासतज्ज्ञ आणि मुग्धाच्या कॉलेज मधील प्राध्यापक तसेच कीर्तीची मैत्रीण आणि  माधव नेनेची पत्नी 

माधव नेने - वसुंधचा पती आणि ऐतिहासिक वस्तूची तस्करी करणारा.

आर्यन - वसुंधरा आणि माधव नेनेचा मुलगा आणि  मुग्धाचा मित्र (अजून तरी ) 

यशोदा आणि श्रीकांत साठे - मुग्धाचे दत्तक पालक 

सुलोचना साठे -  श्रीकांतची आई 

स्वरा- मुग्धाची बालमैत्रीण आणि आर्यानची मावस बहीण  

आता या पर्वात आपण वाचणार आहोत  क्रांतीचे संशोधन आणि मुग्धाच्या आयुष्यातील इतर रोमांचकारी घडामोडी, आणि रहस्याची उकल !)

प्रिय धरा...माझी धरा! 

कशी आहेस बाळा? खूपच मोठी झाली माझी धरा! 

अगं, असं आश्चर्य वाटून घेऊ नकोस. आत्ता मी तुझ्यासोबत नसले,  तरी ज्या अर्थी तू हि डायरी वाचत आहेस, त्या अर्थी नक्कीच तुझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं असणार  आणि मी तुझ्यापासून खूप दूर गेलेली असणार.  म्हणून तर ह्या डायरीच्या रूपाने तुला भेटण्याचा प्रयत्न! प्रत्येक  आईला  तिची मुलगी म्हणजे स्वत :ची झेरॉक्स  कॉपीच वाटते, मुलीच्या जन्मासोबत  आई सुद्धा  नव्याने जन्मते. तुझ्या जन्माने मी आणि यश  इतके आनंदी  झालो होतोत  कि ,  तो आनंद शब्दात व्यक्त करू शकत नाही!  आताही तुझ्या जन्माचा  प्रसंग जसाच्या तसा  आठवतो आहे. तुझं ते  इलूस  गोजिरवाणं  रुपडं, तो लोण्याहूनही मऊ स्पर्श, जणू  एखादी   बाहुलीच! तुझी चेहरेपट्टी जरी बाबासारखी  असली , तरी तुझे डोळे मात्र हुबेहूब माझेच आहेत, एकदम टपोरे  आणि मनाचा ठाव घेणारे!  तुला कुशीत घेतलं  आणि   माझं  सारं आयुष्यच बदलून गेलं. पिटुकल्या डोळ्यांनी  माझ्याकडे  बघत  जेव्हा तू  तुझ्या  चिमुकल्या मुठीत माझं बोट पकडलं , तेव्हा आईपणाची  एक  अनोखी  जबाबदारी  पेलण्याचं  सामर्थ्य  मिळालं.   तुझ्याभोवतीच  माझं सारं  आयुष्य फिरत होत, तुझ्यासोबत  मी माझं आईपण  साजरं  करत  होते.  येणारा  प्रत्येक दिवस तुझ्या बाल लिला  अनुभवण्यात  कधी संपून जाई  ते  कळायचे नाही.  बघ असं होत माझं, डायरी लिहायला घेतली तेव्हा अनेक  वाईट विचारांनी , चिंतांनी  डोकं  बधीर  झालं होतं, पण  तुझा विषय निघाला  अन्, अनेक सुंदर  आठवणीं  डोळ्यांसमोर  झरझर  उभ्या राहिल्या. मनावरची  सारी  मरगळ  दूर  पळाली,  एक  वेगळीच उभारी  मिळाली . आता पुन्हा एकदा कोणत्याही कठीण प्रसंगाला , गरज पडल्यास  दुष्टांशी दोन हात करायला  मी  तयार झाले. तू  माझी  ताकद आहेस  धरा!     

लिहिताना मन इतक्या संमिश्र भावनांनी व्यापून गेलं आहे कि , कदाचित  वाचताना  तुझा गोंधळ उडेल . शक्याशक्यतेचा  अश्या उंबरठ्यावर मी आज उभी आहे की , माझ्या जीवाची मला शाश्वती नाही. पण या साऱ्यात मी तुला काहीही होऊ देणार नाही. आणि मला ज्ञात असलेली रहस्ये माझ्यासोबत  संपू नयेत, किंबहुना  एखाद्या लायक व्यक्तीच्या स्वाधीन करावीत, याच हेतूने  मी हि डायरी लिहिण्याचा अट्टाहास करत आहे!

तुला समजू शकत कि , ज्या अर्थी माझं आयुष्य पणाला लावून मी हे रहस्य जगापासून  लपवून ठेवलं आहे, त्या अर्थी ते  किती महत्त्वाचं आहे. ते रहस्य  समजल्यास एखादी दुष्ट  व्यक्ती स्वतःच्या स्वार्थासाठी  त्याचा वापर करून,  जगाचा  विनाश करू शकते. म्हणूनच वर्षानुवर्षे  ते रहस्य  मानवजातीपासून  लपविण्यात आलं  आहे. आणि ते समजण्यासाठी  तुमची तेव्हढी पात्रता हवी, असच कुणालाही ते समजणार नाही. 

आत्ता  या क्षणी माझी चिमुकली धरा  तिच्या खेळण्यांमध्ये दंग  होऊन गेलेली दिसतेय. या निरागस चेहऱ्यावरचं मनमोकळं हसू पाहून , तुला या जीवघेण्या रहस्याचा भाग बनवणं  मला  अगदी नकोस झालं आहे. पण माझ्या आयुष्यभराच्या संशोधनाचे रहस्य माझ्यासोबत संपून जाऊ नये, असं पण वाटत.   मला माहिती नाही , तू मोठी होऊन  कोण  होणार, इतक्या लहान वयात  तुझ्या करिअर  बद्दल कधीच  मी तुला काही बोलले नाही. तुझं बालपण मला तुझ्यापासून हिरावून घ्यायचं नाही, म्हणूनच मोठेपणी तू माझ्यासारखं  हो, हेच  कर असं कधीच मी तुला शिकवलं नाही.  पण मी  आधी म्हणाले तसं  तू मला माझी झेरॉक्स कॉपीच वाटते, का कुणास ठाऊक  मला  खात्री आहे कि तू मोठी होऊन माझं कार्य पूर्ण करशील. कदाचित मला जे जमलं  नाही , ज्याचा मी विचारसुद्धा केला नाही , असं काही तरी भव्य कार्य तुझ्याकडून घडेल. आणि म्हणूनच माझं हे रहस्य सुपूर्द करण्यासाठी जर कुणी योग्य वारस असेल , तर ती तूच! पण  थांब, ते रहस्य मी असच तुला सांगू शकत  नाही. त्यासाठी तुला स्वतःला  सिद्ध करावं लागेल , तुझ्या बुद्धीचा आणि सहनशक्तीचा कस  लागेल, अनेक प्रश्न सोडवावे लागतील, अनेक  अडथळे येतील , पण  तुला  मध्येच थांबून चालणार नाही. कदाचित  मी शरीराने तुझ्यासोबत नसेल  पण तू स्वतःवर विश्वास ठेव , माझे आशीर्वाद आणि शुभेच्छा तुझ्या  सोबत नेहमीच असतील , आणि हो वसुंधरा आणि यश आणि तुझ्या माझ्या आठवणी तुला या शोधात नक्कीच मदत करतील. हार न मानता, शेवटपर्यंत प्रयत्न करत रहा,कठीण प्रसंगांना धीराने तोंड दे. प्रयत्न करणे हेच आपल्या हाती असत धरा! गीतेत म्हटलं आहेच,

करकर्मण्येवाधिकारस्ते , मा फलेषु  कदाच न ! 

यावर विश्वस ठेव आणि  प्रयत्न कर, मला खात्री आहे  तू हे रहस्य  नक्कीच उलगडशील...

रहस्याबद्दल  जाणून घेण्याआधी  तुला माझा इथपर्यंतचा प्रवास जाणून घेणं गरजेचं आहे. मी आणि  वसू, .... 

"अरे  यान!  कब से  तुझे आवाज दे राहा हू...  इतना क्या पढ रहा  है ? कॉलेज मे  कभी पढाई कि नहीं, और अब तुझे पढना  है? "

रिषभ चा   आवाज आल्याने, आर्यन ने नाराजीने पटकन डायरी बंद केली आणि ती व्यवस्थित ड्रॉवर मध्ये ठेऊन, ड्रॉवर लॉक करून  तो रिषभ शी बोलू लागला.  

"नथिंग डूड... जस्ट  अ  टाईमपास!"

"ओह...बट, आय  थिंक यु  आर हायडींग समथींग फ्रॉम मी. कम ऑन  यान, आपुन तो अच्छे  दोस्त है यार! तू मुझसे चुपके जो तस्वीर देखता है, उसकी सारी कुंडली मैने निकाली है! जेम्स बॉण्ड मनतात मले. तू काय हाईड नई कक... क्या बोलते है मराठी मै?

"अरे रिश, उगाच मराठीची वाट लावू नको रे! मी काही लपवू शकत नाही तुझ्यापासून, मान्य  करतो यार! वेळ आली की, सगळं सांगेन तुला. आता कशाला आला ते सांग आधी."

रिषभ थोडा गंभीर होत म्हणाला, 

" पोलिस स्टेशन से फोन आया  था. तेरा फोन नही लगा, तो हॉटेल के रिसेप्शन पे आया , मैं  वही पे था तो वो मेसेज तुझे देने आ गया. हमे आज पोलीस स्टेशन  जाना होगा."

क्रमश: 

( तर  कशी वाटली नवीन पर्वाची सुरुवात? माहितीये , दुसरे पर्व लिहायला खूपच  वेळ  लागला,  त्यासाठी मी सर्व वाचकांची मनापासून माफी मागते. परंतु मला या पर्वाची कथा लिहिण्या साठी  आधी  काही  अभ्यास करणे गरजेचे होते.  व्यवस्थित माहिती गोळा करून, काही ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन मी एक  रहस्यमय  आणि उत्कंठावर्धक कथा  लिहित  आहे.  मला  खात्री  आहे कि , हि कथा तुम्हाला नक्कीच आवडेल . हा  भाग तुम्हाला  कसा वाटला , ते  जरूर कळवा..) 

Next-गुप्त समेवर - रहस्यभेद- भाग २


Comments

लोकप्रिय

गुप्त समेवर - भाग १

नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची- १. देवी शैलपुत्री

नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची- २. देवी ब्रम्हचारिणी

गुप्त समेवर- भाग १७

नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची -३. देवी चंद्रघंटा