गुप्त समेवर- भाग २

मागील भाग लिंक- गुप्त समेवर- भाग १
सहा महिन्यांपूर्वी,
सोसाट्याचा वारा, धो धो बरसणारा पाऊस, भयाण काळोखी रात्र आणि सूनसान घाटातून जोरात धावणारी एक कार... मागच्या सीटवर घाबरून बसलेली बाई तिच्या जवळील मुलीला काहीतरी समजावतेय अन् अचानक गाडी चालवणार्याचा गाडीवरचा ताबा सुटतो. गाडी मेन रोड सोडून बाजूला भरकटते, आणि शेवटी खोल दरीत कोसळते. आणि त्याचवेळी त्या छोट्या मुलीचा भेदरलेला चेहरा दिसतो... स्वत:ला तिच्या जागी पाहून मुग्धा जोराने ओरडते,
"आई S S S…..
भीतीने थरथरणारी मुग्धा बेडवर उठून बसते. आजूबाजू पाहिल्यावर तिच्या लक्षात येत की नेहमी प्रमाणेच आजही हे एक स्वप्न होत!
मुग्धा...नावाप्रमाणेच समोरच्याला मुग्ध करणारी... दरीतून हळुवारपणे वाहणार्या झर्यासारखी निर्मळ… चारचौघीत उठून दिसेल अशी तेवीस वर्षांची एक साधी, सालस मुलगी ! निळसर छटा असलेले काळे कुरळे केस, रुंद कपाळ, बसकं नाक आणि समोरच्याच्या मनाचा ठाव घेणारे, पाणीदार पण करारी डोळे!
मुग्धाच्या आवाजाने उठलेल्या रियाने हलकेच तिला थोपटले आणि तिला लहान बाळासारखं समजाउ लागली,
" शांत हो मिनू... काहीही झालं नाही हं! सगळं ठीक आहे. जरा पाणी पी बरं !”
गेल्या वर्षीपासून एकत्र राहत असल्याने मुग्धाचं असं दचकून उठणे रीयाला आता सवयीचं झालं होतं. रीयाच्या समजावण्याने मुग्धा जरा शांत झाली आणि दोघी थोड्या वेळात झोपी गेल्या.
दोघींच्या कुटुंबात खूप जवळचे संबंध असल्याने त्या दोघी लहानपणापासून घट्ट मैत्रिणी होत्या, अगदी सख्ख्या बहिणी सारखा जिव्हाळा होता दोघींत! मुंबई मध्ये दोघींनी B.A. पर्यंत शिक्षण सोबतच केल आणि आता वर्षापूर्वी मुग्धाने पुण्याच्या महाविद्यालयात M.A. Archaeology करायच ठरवल्यावर रीया पण तिच्यासोबत पुण्यात आली होती. पुण्यात मुग्धाच्या बाबांचा फ्लॅट होता, तिथेच या दोघी राहू लागल्या. १६ वर्षांपूर्वी मुग्धा आई बाबासोबत इथेच राहायची, पण तिच्या बाबाच प्रमोशन झाल्याने ते मुंबईला स्थायिक झाले, अस मुग्धाला आईने सांगितलं होत. बालपणीचे सात एक वर्षे येथे राहून पण हा फ्लॅट मुग्धाला एकदम अनोळखी वाटे, येथे रहायला आल्यापासून तिला याच खूप आश्चर्य वाटत होत.
“ ८ वाजले, आता तरी उठ लेडी कुंभकर्ण !” रियाला हलवत मुग्धा उठवत होती.
“ बापरे! मिनू, ८ वाजून गेले ! मला आधी का उठवल नाही तू? स्वत: मात्र आंघोळ करून तयार पण झाली. जा तू एकटीच, असही लेक्चर बुडेल त्यापेक्षा मी झोपते अजून..”
“ तास झाल तुला उठवते आहे, आता जास्त नाटकं करू नको. आज लेक्चर नाहीये काही, today is last day of this sem...आणि हो आज वसुंधरा मॅम सब्मीशन साठी आहेत हे विसरू नको.”
वसुंधरा मॅमच नाव ऐकताच आळशी रिया ताडकन उठली आणि भराभर आवरू लागली. नेहमी बिनधास्त असणार्या रियाची अशी धांदल उडालेली पाहून मुग्धाला हसू आवरेना.
“मिनटले... बघून घेईन तुला!” हसणार्या मुग्धाला पाहून रिया तिच्यावर ओरडली.
“ बघ बघ! पण आधी मॅमना कस सामोरं जायचं, याचा विचार कर” मुग्धा तिला अजून चिडवत होती.
“वो तो मेरे बाए हाथ का खेल है मिनू. तुम बस देखती जाओ.” रियाने मुग्धाला बेधडक उत्तर दिल. पण मॅमने दिलेल्या चुका दुरुस्त न करताच आपण काल झोपून गेलो आणि आता ते करायला वेळ पण नाही, रियाला खर तर काळजी वाटू लागली. मॅडम सगळ्यांसमोर चांगली खरडपट्टी तर काढतीलच शिवाय पेपर सबमिशन नाही झाल तर... स्वत:च्या विचारात गुंग झालेली रियाला मुग्धाच्या बोलण्याने विचलित झाली,
“बरं मिस नौटंकी ! चला आता.” रीयापुढे दोन्ही हात जोडत मुग्धा म्हणाली.
दोघी कॉलेज मध्ये पोहचल्या तेव्हा ९ वाजून गेले होते. प्राध्यापिका वसुंधरा एकदम शिस्तप्रिय आणि वक्तशीर होत्या. त्या कुणालाच कधी सूट देत नसत त्यामुळे उशीर झाल्याने घाबरलेली मुग्धा रियाला रागावली,
“आता काही खर नाही आपल! वसुंधरा मॅम आत घेणार नाहीत आणि आजच सब्मीशन नाही झाल तर...” तिला मधेच तोडत रियाने जमिनीकडे हात दाखवत पीजे मारला,
“ ती नाही तर ही धरा नक्कीच आपल्याला आसरा देईल बालिके!”
“You are just impossible!” मुग्धा रियाकडे पाठ फिरवून पळतच क्लासरूम कडे गेली, रिया पण हसत तिच्या मागे पळाली. त्यांचं नशीब आज खूपच चांगलं होत, वसुंधरा मॅम अजून आल्या नव्हत्या. दोघी जणी त्यांच्या बाकीच्या मैत्रिणींजवळ जाऊन बसल्या. यावर्षभरात शर्मिली, रेहा, हर्षदा आणि या दोघी असा पाच जणींचा मस्त ग्रुप झाला होता. त्यापैकी मुग्धा आणि रेहा एकदम शांत व अभ्यासू, शर्मिली आणि हर्षदा साधारण तर रिया एकदम मस्तीखोर, बिनधास्त होती.
“आज चंद्र पश्चिमेला कसा उगवला?” इति रिया.
“ चंद्र नाही येडू, सूर्य!” हर्षदाने रियाला करेक्ट केल.
“ भावनाओं को समझो मेरी जान !”
रिया अजून काही फालतू बोलणार तेवढ्यात क्लास एकदम शांत झाला, वसुंधरा मॅम दारातून आत येत होत्या.
“Extremely sorry for late ! विद्यापीठात काही महत्वाच काम राहील होत, ते करत उशीर झाला. असो, रोल नंबर नुसार पेपर सबमिट करा आता, सगळ्यांनी चुका सुधारल्या असतीलच! ज्यांच्या बाकी असतील ते बाहेर जाऊ शकता पुढल्या वर्षी करा सबमिट!” वसुंधरा मॅम आल्या आल्या गरजल्या.
इतका वेळ मजा करणारी रिया आता जरा शांत झाली. ती रात्री करेक्शन करता करता कधी झोपली ते तिला कळलंच नाही. वसुंधरा मॅडम समोर काय कारण सांगावे याचा विचार करत असतानाच मुग्धाने तिच्याकडे एक फाइल सरकवली. रियाने फाइल पाहिली तर ती फाइल रियाच्याच पेपरची होती ते पण सगळ्या चुका दुरुस्त केलेली. अत्यानंदाने रिया काही बोलणार तेवढ्यात वसुंधरा मॅमनी तीचा रोल नंबर पुकारला. रिया शहाण्या विद्यार्थिनी सारखी पुढे गेली आणि वसुंधरा मॅडम कडे तिची (मुग्धाने दिलेली ) फाइल सोपवली, वसुंधरा मॅडमनी रियाला निरखून पाहिले, फाइल व्यवस्थित तपासली, कुठेही चूक नाही याची खात्री करून त्यांनी सही केली आणि पुढचा नंबर पुकारला... रियाचा जीव भांड्यात पडला. वसुंधरा मॅम बाहेर पडल्या पडल्या रियाने मुग्धाला कडकडून मिठी मारली अन् म्हणाली,
“ तूच गं तूच ...”
“चल आता, बाबा घ्यायला येतील थोड्या वेळात. आपल्याला अजून पॅकिंग करायच आहे, घरी जायच आहे ना येडू!” रीयाच्या डोक्यावर टपली मारत मुग्धा हसली.
“ काय यार... तुम्ही दोघी लगेच का जाता, आत्ता कुठे परीक्षा वगैरे सगळं झाल, आज जरा धमाल केली असती आपण” शर्मिली मुग्धा आणि रियाकडे पाहत म्हणाली.
“ सुट्ट्या संपल्यावर परत आलो की करू खूप सारी मस्ती, पुढच्या वर्षी तर लेक्चर पण नसतील, फक्त प्रोजेक्ट आणि धमाल.” नेहमीच्या पद्धतीने रियाने सगळ्यांना हसवल आणि दोघी घाईतच कॉलेज बाहेर पडल्या.
मुंबईला घरी भूतकाळातील एक कटू सत्य मुग्धाची वाट पाहत होत. स्वतःच्याच भूत आणि भविष्याबद्दल अनभिज्ञ असलेली मुग्धा घरी जाण्याच्या ओढीने भराभर पॅकिंग करु लागली.
क्रमश:
Comments