गुप्त समेवर -भाग ४



“येते गं मी आठ दिवसात! तोपर्यंत काळजी घे. इ. इ...”

   खूप सार्‍या सूचना देऊन सुलूआजी तिच्या भजनीमंडळातील बायकांसोबत देवदर्शनाला निघाली. तिला निरोप देऊन यशोदा तिच्या खोलीत  आली, अजून नीट उजाडल देखील नव्हतं. यशोदाने मस्त चहा करून घेतला आणि गॅलरीत तिच्या खुर्चीत जाऊन बसली. ही तिची घरातील खास जागा होती. उगवतीच्या रम्य रंगछटा न्याहाळत चहाचा आस्वाद घेत तिच्या दिवसाची प्रसन्न सुरुवात होई. पण आज तिचे लक्ष ना बाहेरील निसर्ग सौंदर्यात होते ना हातातील चहात, कारण मनाने ती १६-१७ वर्षांपूर्वीच्या काळात गेली होती. 

   गेली ३ वर्षे पुण्यात श्रीकांत आणि यशोदाचा सुखी संसार सुरू होता. श्रीकांत एक सॉफ्टवेअर इंजीनियर म्हणून नामांकित कंपनीत सीनियर इंजीनियर होता तर समाजसेवेची आवड असल्याने यशोदा एका एनजीओ मध्ये जात होती. नियतीने मातृत्वाचा सुखद अनुभव तिच्या ओटीत घातला खरा पण बाळ जन्मण्यापूर्वीच तो हिरावून घेतला. एनजीओ मध्ये ती स्वतःचे दुःख विसरून इतरांच्या दुःखावर फुंकर घाली. विशेषत: झोपडपट्टीतील मुलांना शिक्षण देणे, जीवनावश्यक वस्तु पुरवणे, आजारी मुलांचे औषधपाणी- दवाखाना सारे ती स्वता: करे. असच एक दिवस एका मुलीला दवाखान्यात घेऊन गेलेली असताना तिथे एकदम पोलिस  दिसले. नक्की काय गडबड सुरू आहे म्हणून तिने एका ओळखीच्या  नर्सकडे चौकशी केली तेव्हा ती म्हणाली,

   “आज सकाळीच कुणीतरी एका जखमी, बेशुद्ध मुलीला पोर्च मध्ये एकट सोडून गेल होत. तिला नक्की काय झाल ते काहीच माहीत नाही. एखाद्या अपघातात तिला जबर मार लागला असून तिची शुद्ध गेली असावी असा डॉक्टरांचा अंदाज आहे. तिच्यावर उपचार सुरू केले आहेत पण तिची अवस्था खूप वाईट आहे. अश्या अपघाताच्या केस मध्ये आम्हाला पोलिस केस करावी लागते.”

   एका अनामिक ओढीने यशोदा त्या मुलीला पहायला गेली. दवाखान्यातील एका बेडवर निपचीत पडलेली ती ६-७ वर्षांची गोंडस मुलगी पाहून यशोदेला भरून आल. कसलीही ओळख नसताना यशोदा त्या मुलीसाठी रोज दवाखान्यात जाऊ लागली, तिच्या अवस्थेत अजून काहीच सुधारणा होत नव्हती, पूर्ण शुद्धीवर पण नव्हती आली ती मुलगी! यशोदाची त्या मुलीबद्दलची ओढ आणि काळजी पाहून एक दिवस श्रीकांत पण तिच्यासोबत आला होता, त्याने डॉक्टरकडे त्या मुलीची चौकशी केली तेव्हा डॉक्टर म्हणाले,

“शारीरिक मार काही जास्त नाही, सगळ्या जखमा पण थोड्या दिवसात भरून जातील. तिच्या सार्‍या टेस्ट पण नॉर्मल आहेत. कदाचित जबर मानसिक धक्का बसल्याने ती अजून शुद्धीवर नाही आली. गेल्या आठवड्यात एक अज्ञात व्यक्ति या जखमी मुलीला इथे सोडून गेला, अजून तरी तिचे कुणी नातेवाईक आले नाहीत. त्यामुळे तिची नक्की काहीच माहिती नाही. त्याच दिवशी घाटात झालेल्या दुर्घटनेची बातमी वाचली असेल तुम्ही! पोलिसांना घाटात एक जळलेली गाडी आणि दोन मृतदेह सापडले. जळून खाक झालेल्या त्या मृतदेहांची ओळख काही पटली नाही. कदाचित त्या भीषण अपघातात ह्या मुलीचे आई वडील मृत झाले आणि ही मुलगी वाचली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे.”

   डॉक्टरांकडुन मिळालेल्या माहितीने श्रीकांत सुन्न झाला. त्या मुलीला पुन्हा एकदा प्रेमाने कुरवाळून श्रीकांत आणि यशोदा घरी जाण्यासाठी निघणार इतक्यात ती मुलगी दचकून उठली आणि तिच्या चिमुकल्या हातांनी काही तरी घट्ट पकडून ठेवायचा प्रयत्न करत जोरात ओरडली,

   “आईSSS…”

   तिची ती आर्त हाक ऐकून यशोदेने धावत जाऊन त्या भेदरलेल्या कोकरला तिच्या कुशीत घेतले. त्या चिमुकलीने पण यशोदेलाच तिची  आई समजून तिच्याभोवतीची मिठी अजून घट्ट केली, जणू ती तिच्या ह्या आईला आता कधीच दूर जाऊ देणार नव्हती!  यशोदाला पण नियतीने आपले हिरावून घेतलेले मातृत्व पुन्हा आपल्या पदरी घातल्याचा आनंद झाला होता. वात्सल्याने भारलेले मायलेकीचे नाते मान्य करत श्रीकांतनेही त्यांच्या जगात त्या चिमुकलीचा बाबा म्हणून प्रवेश केला आणि काही दिवसातच  साठे दांपत्याने  रीतसर पध्दतीने मुग्धाचे पालकत्व स्वीकारले! डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मुग्धाला त्रास होऊ नये म्हणून तिच्या विस्मरणात गेलेल्या भूतकाळाचा  साधा उल्लेख देखील त्यांनी कधी केला नाही. खर तर मुग्धाला आपण दत्तक घेतले आहे याचा त्यांनादेखील विसरच पडला, जन्मांतरीचे नाते असल्यासारखे  ते तिघे एकत्र आनंदाने जगू लागले.

“कोणत्या विचारात हरवली आहेस यशू?” श्रीकांतच्या आवाजाने यशोदा भूतकाळातून बाहेर आली. अचानक समोर उभ्या श्रीकांतला पाहून तिने विचारले

“ अरे तू कधी उठला?”

“झाला एक तास! पण तुला कसं कळणार?, तू तर इथे समाधी अवस्थेत होतीस न!” तिला चिडवत श्रीकांत म्हणाला.

“ओहो... पक्का सूर्यवंशी असूनसुद्धा तू आज इतक्या लवकर उठला का!”  हसत खेळत त्यांच्या दिवसाची सुंदर सुरुवात झाली.

      इकडे मुग्धा मात्र तिच्या खोलीत ते नेहमीच  स्वप्न पडल्याने दचकून उठली होती. मुग्धाने काल बर्‍याच वेळा आग्रह केल्यावर, जास्त विचार करून स्वता:ला त्रास होऊ देणार नाही अस वचन दिल्यावरच श्रीकांतने मुग्धा त्यांना कशी आणि कुठे भेटली हे सांगितलं होत. तिचा तो भूतकाळ कळल्यावर मुग्धाची खात्री पटली होती की हे एक स्वप्न नसून तिच्या आयुष्यात घडून गेलेले एक सत्यच आहे! त्या अपघातात तिचे जन्मदाते आईवडील तर तिला कायमचे सोडून गेलेच, त्यासोबतच तिच्या आयुष्यातील पहिली ६-७ वर्ष पण ती पूर्णपणे पुसून गेली होती अगदी तो अपघात आणि तिचे नाव सुद्धा! त्यानंतर तिचा जणू पूनर्जन्म होऊन ती श्रीकांत - यशोदाची मुलगी-मुग्धा म्हणून त्यापुढील आयुष्य जगू लागली. पण आता स्वता:च्या अस्तित्वाचा शोध घ्यायचा तरी कसा?  ह्याचाच विचार करत मुग्धा किती तरी वेळ बसून राहिली होती.

“ ओये मिनू , किसके खयालोमे  डुबी है ??”  मुग्धाच्या चेहर्‍यासमोर हात हलवत रिया हसत उभी होती.

“ अरे तू ट्रिपहुन परत कधी आली?”

“ आज सकाळीच निघून आले मी एकटी, सगळ्या मोठ्यांमध्ये खूप बोर होत यार! त्यात  लग्नाचा मुलगा असणार्‍या बायका नुसत्या इंटरव्ह्यु घेत होत्या असच वाटायच...सगळ्यांना उत्तर देताना माझ्या नाकी बारा वाजले!” रीयाच्या बोलण्यावर हसत मुग्धाने विचारलं,

“ नाकी नऊ आले, अस म्हणायच आहे का तुला?”

  “तेच ते... भावनाओंको समझो यार!”

   यावर दोघीही हसत सुटल्या. मुग्धाला अस हसताना पाहून आनंदलेली यशोदा त्यांना नाश्ट्याची डिश देत म्हणाली,

“आधी थोड खाऊन घ्या दोघीजणी मग निवांत गप्पा मारा.”

   “ thank you काकू! एकदम माझ्या मनातलं ओळखता तुम्ही, खूप भूक लागली होती मला! Minu is so lucky to have a mom like you!”

   रियाच्या या वाक्याने जराशी गोंधळलेली यशोदा कसबस हसून लगेच जाऊ लागताच, तिचा हात पकडून मुग्धा म्हणाली,

   “आहेच मी खूप lucky! जगातील सर्वात बेस्ट आई बाबा मिळाले आहेत मला!” डोळ्यात आलेल पाणी टिपून मुग्धाला प्रेमाने गोंजारून यशोदा पटकन निघून गेली. यशोदाचा हळवा स्वभाव माहीत असला तरी आजच तीच वागणं रियाला जरा वेगळं वाटलं.

   “ काय झालं मिनू? काकूंच्या डोळ्यात पाणी आणि तू पण एकदम इतकी सेंटी!!! घरात आजी पण दिसत नाहीत, त्या पुन्हा काही बोलल्या तुला?”

   रिया एकदम गडबडून गेली होती.

   “अग बस्स बस्स! किती ते प्रश्न! तुझ्या इवल्याश्या डोक्याला जास्त ताण नको देऊ, all is well! आजी आज पहाटे देवदर्शनाला गेली आहे आणि आईच तर तुला माहिती आहे न किती इमोश्नल आहे ते! सोड ते सगळं, आपण मस्त नाश्ता करू आता.”

   मुग्धाने आत्ता जे सांगितलं त्याने पूर्ण समाधान झाल नसल तरी पण वेळ आली की मुग्धा स्वत:हून सगळं खर सांगेल, अशी खात्री असल्याने रिया शांत बसली.

   “आज त्या स्वराचा बर्थडे आहे, संध्याकाळी पार्टीला जायचं ना आपण?”

   विषय बदलावा म्हणून रियाने विचारलं. हो नाही म्हणत शेवटी मुग्धा स्वराच्या बर्थडे पार्टीला जायला तयार झाली. तिथे मुग्धाच्या आयुष्यात येणारं एक मोठ्ठं वादळ तिची आतूरतेने वाट पाहत होत आणि इथे ती तिच्या भूतकाळातच अडकून पडली होती!

 क्रमश:

 क्रमश:





Comments

Suyog Kulkarni said…
Super. Waiting for next article.
Unknown said…
मनालावाट पहायली लावणारी गूढ कथा
Gauri said…
धन्यवाद,😊
Gauri said…
Thank you..trying to post it soon

लोकप्रिय

गुप्त समेवर - भाग १

नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची- १. देवी शैलपुत्री

नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची- २. देवी ब्रम्हचारिणी

गुप्त समेवर- भाग १७

नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची -३. देवी चंद्रघंटा