गुप्त समेवर - भाग ५


        

    एका नामांकित हॉटेलच्या लॉनवर स्वराची पूलसाइड बर्थडे पार्टी जोरात सुरू होती. केक कापून झाला आणि प्रथेप्रमाणे एकमेकांना केक फासण्याचा कार्यक्रम रंगात आला, काही जोड्या डांस फ्लोर कडे पांगल्या, तर मुग्धा त्या सगळ्यांमधून हळूच काढता पाय घेऊन पूलाच्या बाजूला एका शांत ठिकाणी जाऊन बसली. खर तर पार्टीला येण्याची तिची अजिबात इच्छा नव्हती, पण रियापुढे तिचे काही चालले नाही. साधसा फ्लोरल टॉप, प्लेयटेड स्कर्ट, वार्‍यामुळे मध्येच चेहर्‍यावर येणार्‍या केसांच्या बटांची तमा न बाळगता स्वताच्या विचारात दंग असलेली मुग्धा एखाद्या सुंदर चित्रासारखी भासत होती.

    धडाम्...कुणीतरी पाय घसरून पूलमध्ये पडले आणि त्यामुळे मुग्धाच्या अंगावर सारे पाणी उडाले.पुलात पडून पण तिच्याकडे एकटक पाहणार्‍या मुलाला मुग्धाने पाहिले आणि जरा घुश्यातच तिथून उठून गेली.

“क्या यार...इतका जबरदस्त पोरगा तू, असा कसा पाण्यात पडला?” पूलातून बाहेर येणार्‍या मुलाला पाठीवर थाप मारत त्याचा मित्र म्हणाला. पण तो मित्राला काहीही न बोलता मुग्धाच्या मागे पळाला. इकडे मुग्धाला शोधत असलेल्या रियाने तिलाच येताना पाहून विचारले, 

“कुठे होतीस तू?? किती दंगा घातला आम्ही.. पण तू जरा ओली वाटतेय, काय झालं?

वैतागून मुग्धाने झालेला सारा प्रकार सांगून म्हणाली,

“ किती मंद असतात काही मुल, मस्ती करता करता तो पाण्यात पडल्याने मी ओली झाले आणि साध सॉरी न म्हणता उलट हसत पहात होता तो!”

“सॉरी म्हणायलाच तुझ्या मागे पळत आला आहे हा मंद मुलगा!” मुग्धाच्या मागून एक मिश्किल आवाज आला. तिने वळून पाहिले तर तिच्यासमोर मगाशी पाण्यात पडलेला तोच मुलगा हसत उभा होता.

Hii.. मी आर्यन! पण मला तू मंदन म्हणू शकते!”

    त्याच्या या आगाऊपणावर रिया काही उत्तर देणार इतक्यात तिचा हात पकडून मुग्धा तोंड फिरवून निघून गेली. देखणा, रुबाबदार, खेळकर आणि श्रीमंत देखील असलेल्या आर्यनसाठी हे नवलच होत. सगळ्या मित्र मैत्रिणींमध्ये पॉप्युलर असलेल्या आर्यनशी बर्‍याचदा मुली स्वता:हुन बोलत. पण आज तर अजबच झाल होत, तो स्वता:हुन सॉरी म्हणूनसुद्धा ही मुलगी त्याच्याकडे ढुंकूनही न बघता निघून गेली. खर तर मगाशी तिच्याकडे बघतानाच तो पाण्यात पडला होता. सहजसाध्य गोष्टीपेक्षा अप्राप्य गोष्टीचीच ओढ वाटावी असच काहीसं आर्यनच झाल होत. आजूबाजू इतक्या सार्‍या मुली असून पण तो फक्त मुग्धाच्या एका कटाक्षासाठी तरसत होता. मित्रांमध्ये चौकशी केल्यावर त्याला सालस, शांत मुग्धाची सारी माहिती मिळाली आणि तिच्या मागे लागू नये, ती तुझ्या टाइपची नाही असा सल्ला पण!!!

    अशी सहजासहजी हार मानेल तो आर्यन कसला! मुग्धाशी काहीही करून बोलायचच अस ठरवून पुन्हा एकदा तो तिच्यासमोर उभा ठाकला.

“तू माझ्या सॉरीच उत्तर नाही दिल...” इति आर्यन.

“ तुम्ही एकमेकांना ओळखता का?” अचानक मध्ये येत स्वराने विचारले.

“ अजिबात नाही!” मुग्धा आणि रियाने एकसुरात म्हटले.

 “ आत्ताच अॅक्सिडेंटली भेटलो आम्ही!” जरासं सावरत आर्यन म्हणाला.

“ ओहह... नो प्रॉब्लेम! मी ओळख करून देते. Meet my cousin Aryan…नुकताच UK हून MBA पूर्ण करून आलाय. पार्टी माझी असली तरी चर्चे मात्र हयाचेच आहेत आज, बर्‍याच मैत्रिणी तुझीच चौकशी करताय.” आर्यन च्या खांद्यावर थाप मारत स्वरा म्हणाली.

'पण जिने विचारायला हव ती तर काहीच नाही विचारत.' आर्यन स्वता:शी पुटपटला.

“ काय” स्वराला काही कळाले नाही.

“काही नाही. हिची ओळख नाही करून दिली.” मुग्धाकडे पहात आर्यन म्हणाला.

“ ही मुग्धा, आणि ही रिया! माझ्या शाळेपासूनच्या बेस्ट फ्रेंड्स...या दोघी सध्या पुण्यात एम.ए. करत आहेत.”

स्वराच बोलणं मध्येच तोडत मुग्धा म्हणाली,

“स्वरा, आता निघतो आम्ही खूप उशीर झाला आहे.”

आर्यन या झंझावाती वादळापासून आत्ता पळ काढू पाहणारी मुग्धा पुढे जाऊन त्याच्यासोबत कुठेकुठे  वहात जाणार होती, हे तिलाच माहीत नव्हतं! 

      स्वराच्या बर्थडे पार्टीहून परत येत असतानाच मुग्धाकडून रियाला ती यशोदा-श्रीकांतची दत्तक मुलगी असल्याची धक्कादायक गोष्ट समजली होती. त्याचवेळी स्वता:च खर अस्तित्वच माहीत नसल्याने मुग्धाची होणारी तडफड पाहून रियाने मुग्धाचा भूतकाळ शोधून काढण्यासाठी तिच्यासोबत पुण्याला जायच ठरवलं होत. त्यासाठी सध्या कॉलेजला सुट्टी असली तरी प्रोजेक्टची तयारी करण्यासाठी पुण्याला जावच लागेल, हे तिच्या पोलिस कमिशनर असलेल्या पप्पांना पटवून देताना रियाला खूप जड गेल. खर तर ते कधीच कोणती गोष्ट करताना रियाला अडवत नसत, पण यावेळी मुग्धाच सत्य आत्ता बाबांना सांगणं योग्य न वाटल्याने रियाला त्यांच्याशी खोट बोलावं लागल्याच गिल्ट वाटतं होत. पण मुग्धाच्या मैत्रीखातर इतक तर ती करूच शकत होती!

      इकडे मुग्धा श्रीकांत आणि यशोदाला त्रास होऊ नये म्हणून प्रोजेक्टच कारण सांगुनच  पुण्याला जायला निघाली होती. पण एका क्षणात श्रीकांतने तिची चोरी पकडली आणि पुण्याला जाण्याचं खर कारण तिला विचारलं.

मुग्धा- “तुम्हाला वाईट वाटेल म्हणून मी खर सांगत नव्हते आई बाबा! त्यावेळी अपघातात गेलेली माझी स्मरणशक्ती परत येण्यासाठी डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले होते पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. तुम्ही म्हणाला तस, पोलिस पण अजून काही वेगळी माहिती देऊ शकणार नाहीत. आपण मानसोपचार तज्ञांना पण भेटून आलो, त्यांच्यामते सुद्धा मला १६ वर्ष पूर्वीचा भूतकाळ आठवणअवघड आहे. खर तर गेले कित्येक वर्षे पडणार ते स्वप्न, मध्येच दिसणारे ते भीतीदायक डोळे आणि माझ्या आयुष्यातील विस्मरणात गेलेली ६-७ वर्षे या सगळ्यांमुळे माझ डोक सुन्न होत. माझा भूतकाळच माहीत नसेल तर मी वर्तमान जगू तरी कशी? आणि भविष्य घडवू तरी कस? त्यासाठी मी आणि रियाने पुण्याला जाऊन माझ अस्तित्व शोधून काढायच अस ठरवलं आहे. मला माझ मन सांगतय की पुण्याला जाऊन नक्कीच काही तरी हाती  लागेल माझ्या

      मुग्धाने एका दमात तिची होणारी घुसमट सांगून टाकली. तिची तडफड बघून यशोदाने तिला पोटाशी धरलं आणि तिच्या डोक्यावरुन हात फिरवत श्रीकांतला नजरेनेच परवानगी द्यावी अस विनवल. यशोदेची विनंती मान्य करत श्रीकांत मुग्धाला म्हणाला,

“ तुझ्या मनाचा कौल असेल तसच वाग मिनू, मी नाही अडवणार तुला. पण फक्त मला वचन दे की माझी मिनू मला कधीच दुरावणार नाही.”

“बाबा काहीही वाटलं तर सगळ्यात आधी मी तुंम्हालाच सांगेन आणि तुमच्यापासून दूर जाण्याचा विचार तर मी स्वप्नात पण नाही करू शकत! तुम्ही दोघेच तर माझ जग आहात!”

श्रीकांत आणि यशोदा दोघांना मिठी मारत मुग्धाने वचन दिल.

      (मुग्धाचे मन तिला नक्की कोणत्या दिशेने नेणार? आणि तिचा भूतकाळात दडलेले रहस्य तिला समजणार का? जाणून घेण्यासाठी ब्लॉग subscribe करा आणि पुढील कथा नक्की वाचत रहा.)

क्रमश:


Comments

KiranK said…
Mast��

लोकप्रिय

गुप्त समेवर - भाग १

नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची- १. देवी शैलपुत्री

नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची- २. देवी ब्रम्हचारिणी

गुप्त समेवर- भाग १७

नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची -३. देवी चंद्रघंटा