गुप्त समेवर -भाग १६
गुप्त समेवर -भाग १६

“वसुंधरा मॅमच्या मदतीने
मी माझ्या भूतकाळाचा बंद दरवाजा उघडू शकेन अस वाटत असतानाच मॅमच्या अकस्मात
मृत्यूमुळे आता माझ अस्तित्व शोधणं अशक्य झाल आहे रियू! या फाइलमध्ये काही क्ल्यु
मिळेल अस म्हणत होतीस नं? बघ आता,
त्यात फक्त Rejected खोडून Approved
केल आहे आणि नेहमीसारख फाइल चेक करून साइन केली आहे मॅमने.”
मुग्धा आणि रिया कॉलेजमधून वसुंधरा मॅमने शिपायाकडे दिलेली
मुग्धाची फाइल घेऊन त्यांच्या फ्लॅटवर परत आल्या होत्या. मुग्धाने मोठ्या
उत्साहाने ती फाइल पाहिली, पण त्यात तिला काहीच क्ल्यु मिळाला
नाही. आता मात्र मुग्धाला सगळ्याचा प्रचंड शीण आला होता, रियाकडे
फाइल देऊन ती आत गेली.
आधी वसुंधरा मॅम स्वता:हुन मुग्धाला भेटणं आणि तिच्या भूतकाळाची
माहिती असल्याच दाखवणं, नंतर तिची भेट टाळण, आधी मुग्धाचा प्रोजेक्ट रिजेक्ट करण, थोड्या वेळातच
तो प्रोजेक्ट मंजूर करून ती फाइल तिच्याकडे पाठवण आणि त्यानंतर काही तासातच
त्यांचा अकस्मात मृत्यू होण! या सगळ्याची तर्कसंगती लावली तर रीयाला राहून राहून
अस वाटत होत की, मॅमला मुग्धाला तिचा भूतकाळ सांगण्यापासून
कुणी तरी रोखत आहे. मॅमने मुग्धासाठी या फाइलमध्ये नक्कीच काही तरी क्ल्यु मागे
ठेवला असणार या विचाराने रिया लक्षपूर्वक त्या फाइलमधील एकेक पान पहात होती आणि मधेच
एका कागदावर काही टिपून घेत होती. थोड्याच वेळात रीया हर्षभरल्या आवाजात ओरडली,
“बघ मिनू, माझा अंदाज खरा ठरला...there is a message!”
मुग्धा धावतच आली, तिने अधीरतेने रीयाला विचारलं,
“कसला मेसेज? नीट सांग नं!”
रीया मुग्धाला फाइल दाखवत
म्हणाली,
“हे पहा. हे नुसतं करेक्टच
साइन नाहीये काही, त्यातून मॅमने मेसेज दिला आहे.”
मुग्धा आता उत्सुकतेने
फाइलमध्ये मॅमने करेक्ट केलेले शब्द पहात होती,
“great आणि listings या पानावर तर या दोन शब्दांवर टिक केल
आहे. पुढचं पान बघू!”
“बेटा… पूर्ण शब्द नाही, फक्त पहिलं अक्षर!” मोठ्यांचा आव
आणत रीया समजावू लागली.
“G L , LG… एलजी कंपनीचा काय संबंध? तू काही पण फेकू नकोस हं!
मॅमने रॅन्डमली टिक केल आहे. याला काहीच अर्थ नाहीये.”
“एक्झॅक्टली, रॅन्डम टिक! लास्ट इयर मॅमने फाइल चेक केली होती तेव्हा त्यांनी फक्त
डाव्या बाजूला टिक म्हणजे करेक्टच्या खुणा केल्या होत्या. फाइल चेक करण्याचा
त्यांचा एक फिक्स पॅटर्न होता. पण या फाइलमध्ये पहा पूर्ण पानावर अधेमधे कुठेही
टिक केल आहे. त्यावरूनच मला समजलं की हे जाणीवपूर्वक केलेलं आहे.”
मुग्धाला आता रीयाच म्हणणं पटत होत. तिला रियाच्या चाणाक्षपणाच कौतुक
वाटलं, ती कौतुकमिश्रित आदराने तिने रीयाला विचारलं,
“तुमचं म्हणणं बरोबर आहे
मॅडम...आता याचा अर्थ कसा लावायचा ते या पामराला सांगण्याची कृपा करा!”
मुग्धाच्या डोक्यावर टपली मारत हसत हसत रीया म्हणाली,
“हा नौटंकीचा गुण माझा की
आर्यनचा?”
आर्यनच्या आठवणीने मुग्धा
जरा बेचैन झाली, ते पाहून रीया म्हणाली,
“डोन्ट वरी, येईल तो परत... यूकेला तर गेला आहे!”
“हम्म...तो मेसेज नक्की
काय आहे ते सांग आता.”
“वसुंधरा मॅम सहज समजेल
असा मेसेज देतील का? She was so brilliant! हिस्टरीच्या
प्रोफेसर असल्या तरी त्यांना कोडिंगच ज्ञान होत. मी मागे सुट्ट्यांमध्ये कोडिंगचा
एक कोर्स केला होता म्हणून मला हे लगेच समजलं. मॅमनी इथे At bash cipher या कोडिंगचा वापर केला आहे. तशी ही सोप्पी
पध्दत आहे. यामध्ये शब्द तयार करताना Alphabets
उलट्याक्रमाने वापरलेले असतात म्हणजे A साठी Z, B साठी Y, so on… आता पहिल्या पानावरच्या टिक केलेल्या शब्दातील
पहिली अक्षर घेतली तर G आणि L आहे
आपल्याकडे म्हणजे.”
मुग्धा लहान मुलीसारखी
आनंदाने उसळत म्हणाली,
“TO… भारी आहे हे, चल पुढची पान पाहू म्हणजे नक्की काय
सांगितलं आहे मॅमने ते समजेल.”
“करेक्ट!”
रीयाने मुग्धाला टाळी दिली. पुढील प्रत्येक
पानावरील टिक केलेले शब्द शोधून त्यांनी वसुंधरा मॅमने मुग्धासाठी मागे ठेवलेला
गुप्त संदेश शोधून काढला. रियाने तो मोठयाने वाचला.
“To reveal
history, meet Shantakka!....आता या शांताक्का कोण?”
“अग त्या मॅमकडे घरकाम
करायच्या, आर्यनने एकदा बोलताना त्यांचा उल्लेख केला होता. त्यादिवशी नाही का आपल्याला मॅमच्या
बंगल्याबाहेर भेटल्या होत्या, त्याच असतील शांताक्का!
शारदाश्रम मध्ये जाणार होत्या त्या. चल भेटून येऊ.”
पर्स आणि मोबाइल घेऊन दोघी तडक शारदाश्रमकडे निघाल्या. मुग्धाची
तिथे चांगलीच ओळख असल्याने त्यांना लगेच शांताक्काला भेटायची परवानगी मिळाली. शारदाश्रम संस्थेत एकीकडे लहानमुलांसाठी अनाथालय
तर दुसरीकडे वृद्धाश्रम होते. त्यादोघी आश्रमातील टापटीप आणि अनोखळ्या
व्यक्तींबद्दलचा जिव्हाळा अनुभवत शांताक्काला भेटायला गेल्या. समोरच दृश्य पाहून
दोघी भारावून गेल्या. एका डेरेदार झाडाच्या सावलीत आजींभोवती बसलेले मुलांचे चार
पाच घोळके होते. एक आजी मुलांना गीता शिकवत होत्या, एक गोष्टी सांगत
होत्या, एक भजन म्हणत होत्या. शारदाश्रम म्हणजे
झाडाझुडुपांच्या सानिध्यात वसलेल एक छानस कुटुंबच भासत होत. मुलांना गोष्ट सांगून
झाल्यावर शांताक्काच लक्ष बाजूला उभ्या मुग्धा आणि रियाकडे गेल. मुलांच्या
घोळक्यातून उठून त्या दोघींजवळ आल्या आणि त्यांना विचारलं,
“काय पाहिजे ओ पोरीओ?”
मुगधाने तिची आणि रीयाची
ओळख करून देऊन वसुंधरा मॅमने त्यांना दिलेल्या मेसेजबद्दल सगळं सविस्तर सांगितलं आणि
म्हणाली,
“आजी काही सांगायच होत का
मॅमला? शांताक्का त्या दोघींना घेऊन तिच्या खोलीत गेली आणि म्हणाली,
“लई उशीर केलासा पोरींनो, तुमची वाट पाहून शेवटी मी हिकड निघून आले. ती गेली त्यादिवशी लई बेचैन
व्हती. नेहमी खंबीर असणारी ती तवा मात्र जरा भ्यालेली वाटली. तरास व्हत असल तिला, काळाची चाहूल लागली असल. त्यादिवशी बाहेर जाण्याअगोदर ती काही तरी मोठ्ठं
काम करणार हाय अस म्हनत व्हती, आन तिला कायबी झाल तर मुग्दा नावाच्या
पोरीला एक निरोप द्याया सांगितला व्हता. तूच न्हव ती मुग्दा?”
वसुंधरा मॅडमच्या आठवणीने व्याकूळ
होत मुग्धा म्हणाली,
“होय आजी. काय निरोप ठेवला
होता मॅमने?”
आजी पुढे बोलू लागल्या...
“तुझ्या आईची एक वस्तु वसुंधराने
जिवापाड जपून ठेवली हाय, ती तुला घेऊन जाया सांगितलं व्हत. वसुंधराच्या
खोलीत एका जुन्या फोटोमागे शोधाया सांगितलं व्हत.”
आजी बोलत असताना मध्येच एक
मुलगा खोलीत आला आणि म्हणाला,
“आजी झाली का तयारी? चल पटकन सगळ्या आज्ज्या निघाल्या आहेत.”
शांताक्का तिची बाजूला
ठेवलेली बॅग आणि पिशवी आवरत त्या छोटुकडे पहात म्हणाल्या,
“झाल रे. तू जा
म्होर...म्या आलेच.”
मुग्धा जरा ओशाळत म्हणाली,
“सॉरी आमच्यामुळे उशीर
झाला का तुम्हाला?”
“नाही ग पोरी. अजून यळ हाय.
ही बारकी पोर नस्ती गडबड करत्यात. आज आम्हाला एका बड्या माणसाच्या कृपेने वैष्णवदेवीला
जायला मिळणार हाय. त्याचीच तयारी करतेय. लांबचा प्रवास हाय नं! म्या काय सांगत
बसलेय! आपल बोलणं राहीलच बघ...”
वसुंधरा मॅम आणि आजीच काही
नात असावं आणि आजींना तिच्या भूतकाळाविषयी काही माहिती असावी म्हणून मुग्धाने आजीला
विचारलं,
“१६ वर्षांपूर्वी माझ्या
आयुष्यात काय झाल होत ते माहितीये का तुम्हाला? मॅमला अजून काही सांगायच
होत का?”
“अग पोरी, मीच गेल्या १०-१२ वर्षांपासन माधवगड बंगल्यात कामाला हाय. गावाकडं एकाच
गल्लीत राहायचो मी आन वसू. तिच्या १५व्या वर्षी तिचे आईबाप गेल्यावर पोरबाळ
नसलेल्या मला अनाथ झालेल्या वसूचा भारी लळा लागला व्हता. वसू मोठी कष्टाळू! शिक्षण
पूर्ण करायला शहरात आली. मधल्या वर्षात काय झाल ते मला ठाव नाय. आम्हीबी कामाच्या
शोधात गावातल घर इकून इथ आलो पण बेकारीमुळ नवर्याला दारूच व्यसन लागलं आन सगळं
संपलं. १६ वर्षांपूर्वीच मला काय ठाऊक, तवा मी नवर्यासोबत
आमच्या चाळीतल्या घरी रहायचे. त्याच्या दारूच्या व्यसनापायी सम्द इकाव लागलं मला. माझ
नि वसुच काय बी नात नसताना, नवरा गेल्यावर दारोदार काम शोधत
फिरणार्या मला गावाकडची जुनी ओळख लक्षात ठेऊन वसुन तिच्या घरी ठेऊन घेतलं. पोरीन
कधी कामवालीसारख वागवल नाही मला. त्यादिवशी वसून मला घरी थांबवलं आन सांगून ठेवलं व्हत
की एक पाकीट घेऊन कोणतर येईल ते पाकीट ठेऊन घ्यायचं आन ते फक्त तिच्याकडेच द्यायाच.
पन कुणीच आल नाही पाकीट घेऊन.”
इतक्यात आश्रमाच्या संचालकांनी स्पीकरवर घोषणा केली, सगळ्या आजींना आपापल सामान घेऊन पटांगणात एकत्र जमायला सांगितलं गेल, त्यांना ट्रीपला जाण्याआधी काही सूचना द्यायच्या होत्या. शांताक्का पण त्यांची
बॅग आणि पिशवी घेऊन गेल्या. आजींचा निरोप घेऊन मुग्धा आणि रिया तिथून निघाल्या, त्या फ्लॅटवर आल्या तेव्हा मुग्धाच्या लक्षात आल, की
वसुंधरा मॅमने तिच्या आईची जपून ठेवलेली वस्तु आता मिळवायची तरी कशी? आजी तर ट्रीपला गेल्या आणि माधवगड बंगल्यात सध्या कुणीच नाही!
क्रमश:
पुढील भाग वाचा खालील लिंकवर
Comments