बाबा ते आबा...

बाबा ते आबा...

        आता आता पर्यन्त ज्यांच्या नुसत्या चाहुलीने पण घरातील प्रत्येक जण दबकून रहायचा, अश्या माझ्या बाबांच हल्ली एका व्यक्तीपुढे काही चालत नाही, ती व्यक्ती म्हणजे त्यांची (बायको नव्हे!) चार वर्षांची चिमूरडी नात, स्पृहा! अगदी तिच्या येण्याची चाहूल लागली तेव्हापासूनच बाबांच्यातील बदल जाणवू लागला. इतक्या वर्षात एकदम बिनधास्तपणे जगाशी भिडायला लावणारे माझे बाबा अचानक आईसारखी माझी काळजी करू लागले. जगासाठी जमदग्नीचा अवतार असले तरी त्यांचा प्रकोप कधी माझ्या वाट्याला आला नाही. उलट त्यांच्या चिडखोर स्वभावामुळे त्यांना कुणी काही बोलल तर माझ्याशी सामना असे त्याचा! जगाला जरी या फणसाचे काटेच दिसत असले तरी मला मात्र नेहमी त्यातील गोड रसाळ गरेच चाखायला मिळाले, आणि आता माझ्या लेकीला!

        आमच्या एकत्र कुटुंबात फक्त बाबांचाच दरारा होता. मोठे असले तरी दादाकाका एकदम कूल, त्यांना सहसा कधी चिडलेल आम्ही पहिलं नाही. मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेवर त्यांचं प्रभुत्व आहे. शाळेतील निबंध, वक्तृत्व स्पर्धेत त्यांच मार्गदर्शन असल्याने तिथे माझी बाजी लागत असे. लहान काका म्हणजे माझ्या आण्णाकाकाचा आम्हा कुणालाच धाक नव्हता, उलट सगळ्या बच्चे कंपनीचा हट्ट त्याच्यापुढेच चाले. बाबा तितका कडक तितका खेळकर आणि स्वच्छंदी अण्णाकाका! ठेविले अनंते तैसेची रहावे, चित्ती असू द्यावे, समाधान’, आहे त्यात आनंद कसा शोधावा हे त्याच्याकडून शिकता येत. या दोघांनी हसत खेळत आम्हाला बागडू दिल तर त्याला शिस्तीच कुंपण बाबांनी घातल!  या तिन तर्‍हेच्या बाप माणसांमुळे आमच बालपण समृद्ध झाल, स्वच्छंदी जगलो तरी आम्हा भावंडांच पाऊल कधी वाकड नाही पडलं.

स्पृहाच्या जन्मासोबत माझ्या बाबांचा जणू तिचे आबा म्हणून पुरजन्म झाला!

एकदम भिन्न असे नवीनच बाबा आम्हाला भेटले.

रात्री नऊच्या ठोक्याला झोपणारे, रात्र रात्र त्या इवल्याश्या परीला घेऊन जागू लागले.

त्यांच्या पांढर्‍याशुभ्र कपड्यांवर एकही डाग खपवून न घेणारे, दिवसभर कपड्यांवर स्पृहाच्या शू शी चे डाग मिरवू लागले.

स्वत:च्या दुखर्‍या गुडघ्याची पर्वा न करता नातीसाठी घोडा झाले.

नेहमी व्यवहार आणि जागतिक घडामोडीशिवाय काही न बोलणारे, तासन्तास नातीसोबत निरर्थक बोबडे बोलू लागले.

त्यांच्या खिशाला हात लावायची अजूनही आमची बिशाद नसली तरी स्पृहा मात्र आबा आबा म्हणत अगदी सहज त्यांच्या खिशात हात घालून हवे ते हट्ट पुरे करू लागली.

ते झोपलेले असताना त्यांचं नाक ओढून पिल्लू पिल्लू  म्हणून त्यांना उठवण्यापर्यन्त या पोरीची हिम्मत होते. आईला बाबांच हे रूप हसू आवरत नाही.

आम्हाला कडक शिस्तीत मोठ करणारे बाबा, नातीच्या सगळ्या खोड्या हसत सहन करतात त्यात कहर म्हणजे तिला मारण्याची तर नव्हेच पण रागावण्याची सुद्धा आम्हाला मुभा नाही. आई बाबांच्या  सगळ्या तक्रारी लगेच या सूप्रीम कोर्टात स्पृहाकडून सादर केल्या जातात आणि त्यावर आमची कान उघडणी केली जाते. हे स्पृहाच्या सगळ्याच आबांना लागू आहे. म्हणजे माझे बाबा, दोन्ही काका, माझे सासरे, सुयोगचे काका-मामा, माझे प्रशांत काका या सगळ्यांसोबत स्पृहाच आबा म्हणून असलेल नातीच आणि आबांच हे विलोभनीय जग खरच अवर्णणीय आहे.

        मध्यंतरी सोशल मीडियावर एक फोटो पाहण्यात आला होता, ज्यात एक नव्याने जन्मलेला बाप आपल्या छोट्याश्या परीला कुशीत घेऊन कौतुकाने न्याहाळत होता तर त्याच्यामागे एक अनुभवी बाप त्याच्या बाळंतमुलीच्या डोक्यावर हात फिरवत होता. हे दोन्ही बापलोक ( बाबा आणि माझा नवरा सुयोग) प्रत्यक्ष माझ्या आयुष्यात अनुभवताना खूप भारी वाटत.

        माझ्या प्रत्येक गोष्टीत माझ्या पाठीशी ठामपणे उभ्या माझ्या बाबांना कोटी कोटी प्रणाम... आणि सगळ्या बापलोकाना Happy Father’s Day Baba... love you a lot बाबा         


Comments

लोकप्रिय

गुप्त समेवर - भाग १

नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची- १. देवी शैलपुत्री

नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची- २. देवी ब्रम्हचारिणी

गुप्त समेवर- भाग १७

नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची -३. देवी चंद्रघंटा