द मिस्टरी वुमन
सत्य घटनेवर
आधारित कथा
(सदर कथा वाचकांनी स्वत:च्या जबाबदारीवर वाचावी. तुमच्या मनावर होणार्या परिणामांसाठी लेखक जबाबदार नाही!)
सकाळपासून कोसळणार्या श्रावणसरींमुळे वातावरणात एक सुखद गारवा होता. आज प्रोजेक्ट प्रेझेंटेशन बॉसला दाखवून झाल्यावर लॅपटॉप स्विच ऑफ करताना बॉसच्या लॅपटॉप वरील स्क्रीनसेवर वरती त्याची नजर खिळली,
Women. They Are A Complete Mystery!
हे वाक्य होत त्या स्क्रीनवर. काही तरीच काय? ते वाचून सुजय ला हसू आल आणि लगेचच मृणाल चा निरागस चेहरा त्याच्या डोळ्यासमोर तरळला. तिचा विचार करतच त्याने बॅग पॅक केली आणि ऑफिस मधून बाहेर पडून, गाडी काढून निघाला. इतके दिवस प्रोजेक्ट वेळेत पूर्ण करायच्या प्रेशरमुळे नव्या नवरीकडे, मृणालकडे दुर्लक्ष करून त्याला ऑफिस मध्ये मान मोडेस्तोवर काम कराव लागायच! त्यामुळे लग्नानंतरचा पहिलावहिला रोमॅंटिक पावसाळा अजून त्याने अनुभवलाच नव्हता. आज प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर मात्र त्याला मृणालची तीव्र आठवण झाली. छोट्या गावातून आली असल्याने या मोठ्या शहरात तिला रूळण जरा जड जात होत, शिवाय त्याचे आईवडील पण गावीच त्यामुळे दिवसभर घरी बिचारी एकटीच असे. तस आता तीने पण जॉब शोधणं सुरू केल होत, पण अजून मनासारखा जॉब काही तिला मिळाला नव्हता. मृणालच्या भोळ्या आणि लाघवी स्वभावाने तिने सुजय आणि त्याच्या घरच्यांच मन कधीच जिंकल होत. आपल्या कामात तिच्याकडे कित्येक दिवस नीट पाहिल पण नाही, याची जाणीव होऊन सुजयला स्वता:चाच राग आला. वाटेत गाडी थांबवून त्याने मृणालसाठी छानसे गिफ्ट घेतले आणि पुढचे चार दिवस सुट्टी घेऊन तिच्यासोबत हा चिंब पाऊस अनुभवायचा, अस बरच काही ठरवत सुजयने पुन्हा गाडी सुरू केली. भणाणता वारा अंगावर घेत तो वायुवेगाने त्याच्या घरी पोचला. आज अचानक लवकर आलेल पाहून मृणाल खूप आनंदी होईल या विचारात तो घरापर्यंत पोहोचला. स्वता:च्या धुंदीत शिळ घालत फ्लॅटचे लॅच उघडून घरात शिरताना मनातील धुंद भावनांनी त्याच्या अंगावर एक गोड शिरशिरी आली!
परंतु नियतीच्या मनात मात्र वेगळेच काही
होते. घरात पाऊल टाकताच सुजयला एक भयाण शांतता जाणवली. बाहेर सगळ अंधारून आल तरी
पण घरातील एकही लाइट सुरू नव्हता, की मृणालचा वावर पण
जाणवत नव्हता. एरव्ही लॅचचा आवाज ऐकून
हसतमुख मृणाल हातातील सारी कामे टाकून त्याच्यासमोर यायची. तिच्या पैंजणाच्या
झुमझुम स्वर आणि त्यासोबत तिची अखंड बडबड यामुळे सुजयला घरात आल की प्रसन्न
वाटायच. पण आज अख्खं घरच अंधार्या गर्द छायेत भकास वाटत होत. मृणालच्या काळजीने त्याच्या काळजात धस्स झाल. मृणालला आवाज देत सुजय
वेड्यासारखा घरभर फिरू लागला. बेडरूम मध्ये एका कोपर्यात सुन्नपणे बसलेली मृणाल पाहिल्यावर त्याचा जीव
भांड्यात पडला. हातातील सामान बेडवर टाकून सुजय तिच्याजवळ
जाऊन बसला आणि म्हणाला,
“काय झालं मनू?? अशी का बसली आहेस? बर वाटत नाही का?”
सुजयला पाहताच
इतकावेळ थोपवून धरलेले अश्रु मृणालच्या डोळ्यातून घळाघळा वाहू लागले. सुजय प्रचंड
अस्वस्थ झाला. लग्नानंतर रडणार्या बायकोला सामोरं जाण्याचा त्याच्या आयुष्यातील
हा पहिलाच प्रसंग होता. दोघांचे अरेंज मॅरेज होऊन दोनच महीने झाले होते, दोघांची अजून पुरती ओळख पण झाली नव्हती. त्यामुळे मृणालच रडू पाहून तो
पुरा भांबवून गेला, त्यामागच कारण पण तर त्याला माहीत
नव्हतं! तिला सावरायचा प्रयत्न करत सुजय म्हणाला,
“काय झाल मनू?? घरी सगळे ठीक आहेत न?”
“हम्म...”
“तुला काही त्रास
होतोय??”
“नाही...”
“कुणी काही बोलल
का तुला? माझ काही चुकल का?”
मृणालने मानेनेच
सगळ्याला नकार दिला, तीच रडू काही थांबलं
नाही. आता मात्र सुजयला काय कराव ते काही समजेना. तिच्या पाठीवर थोपटत शेवटचा
प्रयत्न म्हणून त्याने विचारलं,
“आधी मला सांग बर
काय झाल ते? माझ्यावर विश्वास आहे न? मी सगळं ठीक करेन...सांग पाहू.”
“मी मारून टाकल
त्याला...”
मृणालच्या तोंडून
हे ऐकताच तिच्या पाठीवरून फिरणारा सुजयचा हात विजेचा झटका लागावा तसा झटक्यात
बाजूला झाला आणि आवंढा गिळत तो म्हणाला,
“क्काय??”
हुंदके आवरत
मृणाल म्हणाली,
“धक्का बसला नं
तुम्हाला पण... मला पण खूप अपराधी वाटतय...अस कस मी त्याचा जीव घेतला??? एका निष्पाप जिवाच्या हत्येच पाप माझ्या माथी लागलं...
सुजय अजून पण
धक्क्यातून सावरला नव्हता. त्याचा त्याच्या कानांवर विश्वास बसेना! मृणाल अस काही
करू शकते याचा विचार तो स्वप्नात पण करू शकत नव्हता. मृणाल अजून काय सांगते, ते कानात प्राण आणून तो फक्त ऐकत होता,
“पण मी तरी काय
करणार? माझा नवा कोरा संसार उध्वस्त केला असता त्याने…
घराबाहेर होता तेव्हा मोठ्या कुतुहलाने मी त्याच्याकडे पहायचे. त्याच्यामुळेच माझा
एकटेपणा जरा कमी झाला होता...पण त्याची मजल वाढू लागली, गेले
चार दिवस झाले त्याने माझ्या घरात घुसखोरी करून...आधी मी शांत होते, आला तसा जाईल अस वाटलं होत मला... नंतर जरा धमकावून, हुस्काऊन मी त्याला घराबाहेर
काढलं... पण काहीच उपयोग झाला नाही...माझी नजर चुकवून त्याने पुन्हा...आपल्या
संसाराचा विध्वंस होण्याआधी त्याला दूर करण गरजेचे होत हो...म्हणून मी...”
“अग इतक सगळ झाल
तरी मला एका शब्दाने तू काही बोलली नाही. अस कस तू मारून टाकल??
“तुम्हाला वेळ
होता का? एकदा दोनदा मी सांगायचा प्रयत्न केला पण...शेवटी माझी मी एकटीने सगळ
निस्तरल!”
मृणालच बोलणं
ऐकून सुजयच्या अंगावर काटा आला. जिला तो भोळी भाबडी समजत होता ती अशी असेल यावर
त्याचा विश्वास बसेना. ती आपल्या विश्वासास पात्र नाही, लवकरात लवकर या लग्नातून मोकळ व्हावं असे विचार त्याच्या मनात आले. पण ही
कोल्ड ब्लडेड बाई आपल्याला पण...नको नको ते विचार त्याच्या डोक्यात आले, हिने आपल्याला ह्या प्रकरणात गुंतवू नये म्हणून तो तिथून पळ काढायचा
विचार करत होता. त्याच्या मनातील ओळखल्यासारख मृणाल म्हणाली,
“अहो घाबरू
नकात...माझ्या या पापात मी तुम्हाला अजिबात भागीदार व्हा म्हणत नाही की, त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायला सांगत नाही. वाल्याकोळ्याची गोष्ट
मला महित्येय! आपल्या कर्माची जबाबदारी आपण स्वता:च घ्यायची असते. मी त्याच्या
बॉडीची विल्हेवाट लावली आहे, अगदी नाकाला फडक बांधून! खूप
किळसवाण होत ते सार!”
आता मात्र सुजयची
भीतीने गाळण उडाली होती. जीच्यावर काही वेळापूर्वी आपण जीव ओवाळून टाकत होतो, ती नक्की हीच का? अशी शंका त्याच्या मनात येत होती.
मृणालविषयीच्या प्रेमाची जागा आता घृणेने घेतली होती. इतका गंभीर गुन्हा करून ही
त्याच्यासमोर सगळं कबूल करतेय याच त्याला आश्चर्य वाटत होत. काहीच प्रतिक्रिया न
देता सुजय आता नक्की करायच काय? या विचारात होता. तो काहीच
बोलत नाही ,हे पाहून मृणाल जोरजोरात हुंदके देऊन रडू लागली,
“मला वाटलच होत, तुम्हाला पण हे सहन नाही होणार. आईच्या सल्ल्यानेच तर आज मी त्याचा
खात्मा केला. मी आईला म्हणाले होते, यांना सांगून मी त्याचा
बंदोबस्त करते. पण आई म्हणाली की जावईबापु समजून घेतील तुला,
तू मनाला लावून घेऊ नकोस. संसारात बाईला हे करावच लागत. आई तर म्हणे तिने तर
अनेकदा...”
हे ऐकून तर सुजय
उडलाच! हीच अख्खं खानदानच खूनी आहे तर...आईबाबा तर तिच्या घरण्याच किती कौतुक करत
होते, वास्तव तर एकदम भयंकर आहे. पुढचं ऐकायची हिम्मत नव्हती आता
त्याच्यात...त्याच डोक गरगरू लागलं, म्हणून त्याने दोन्ही
हातांनी डोक गच्च पकडल, ते पाहून मृणाल लगबगीने उठत म्हणाली,
“काय बाई मी, आल्या आल्या तुम्हाला काय सांगत बसलेय...चहा पाणी पण विचारलं नाही!!!
माझच उंदराच रड गात राहिले...थांबा, तुम्ही फ्रेश व्हा, मी चहा करून आणते.”
“क्काय??? कसल रड??”
तिच्या बोलण्याचा
अर्थ न लागल्याने सुजयने सुन्नपणे विचारलं. खर तर आता काही बोलायचे किंवा ऐकायचे
कसलेच त्राण त्याच्या अंगात नव्हते, पण तरी
त्याच्या तोंडून ते प्रश्न बाहेर पडले होते. त्यावर डोळ्यातील पाणी पुसत मृणाल
म्हणाली,
“उंदराच!!!
इतकावेळ तेच तर सांगत होते मी!”
डोक्याला आठ्या
पडून सुजय वैतागाने म्हणाला,
“आता यात उंदीर
कुठून आला???”
“अस काय करता हो??? आल्यापासून त्या उंदराला मारल्याच तर सांगत होते मी!!!”
डेलिसोप पेक्षा
जबरदस्त ट्विस्ट आणि ड्रामा अनुभवलेला सुजय म्हणाला,
“आधी घराबाहेर, नंतर संसार उद्ध्वस्त, मारून टाकल, बॉडीची विल्हेवाट... हे सगळ त्या उंदरासाठी!!”
स्वता:शी पुटपुटल्यासारख
सुजय म्हणाला आणि मृणालच्या मागे किचनमध्ये गेला. चहाच आधण ठेवत मुसमुसत मृणाल
म्हणाली,
“आपण लग्न करून
इथ आलो नं, तेव्हा तो पीटुकला उंदीर खिडकीच्या
काचांवर टकटक करत, आत टुकुरटुकुर आत डोकवायचा. त्याची भारी
गम्मत वाटायची मला! एकटीच असल्याने तिची छान सोबत झाली होती. पण चुकून खिडकी उघडी
राहिल्याने तो आत आला वाटत. एकदा मी कुंचयाने हुस्कावून लावायचा प्रयत्न केला पण त्याने
काही मला दाद दिली नाही, शेवटी काल रात्री आईने सांगितलं तस दोनतीन
ठिकाणी ते रॅटकिल ठेऊन दिल. आज तुम्ही ऑफिसला गेल्यावर त्याचा निश्चल देह
बाल्कनीमध्ये पडलेला दिसला, तो सुपलीत घेऊन टाकून
देताना....”
नाकातून टपकू
पाहणारे द्रव सुजयने दिलेल्या रुमालाला पुसत मृणाल जोरजोरात हुंदके देऊन रडू
लागली. एका उंदराला मारण्याने इतकी व्यथित होणारी बायको पाहून सुजयला हसावे की
रडावे हेच कळेना!!!

Comments