नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची - ६.देवी कात्यायनी

 

मागील भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 

नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची -५. देवी स्कंदमाता


६. देवी कात्यायनी

सुप्रभात मंडळी!!!

 मी आरजे  चंद्रिका , आपण  ऐकत आहात  मॉर्निंग  मंत्रा शो  आपल्या आवडत्या माय मराठी एफएम वर...नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप  शुभेच्छा, माय  माऊलीची  कृपा  आपणा सर्वांवर राहो . चला तर मग  सुरू करूया  नवरात्री स्पेशल सेग्मेंट- 'नवदुर्गा'!!! आज  नवरात्रीचा सहावा दिवस, आज देवी कात्यायनीची उपासना केली जाते .कत ऋषींच्या कुळात जन्मलेले महर्षि कात्यायन यांनी देवी पराम्बाची कठोर उपासना केली आणि देवीने त्यांच्या घरी पुत्री म्हणून जन्म घ्यावा असा वर मिळवला. महिषासुराचा वध करण्यासाठी जेव्हा ब्रम्हा-विष्णु-महेश यांच्या तेजातून उत्पन्न झालेल्या मातेचे पूजन सर्वात प्रथम महर्षि कात्यायन यांनी केले म्हणून देवीला कात्यायनी असे नाव मिळाले. अशी पण एक आख्यायिका आहे की आश्विन चतुर्थीला देवीने कात्यायन महर्षींची पुत्री म्हणून जन्म घेतला म्हणून कात्यायनी या नावाने प्रसिद्ध झाली, नवमीपर्यंत ऋषींनी देवीचे पूजन केले आणि देवीने दशमीला महिषासुरचा वध केला. गोपिकांनी कृष्णप्राप्तीसाठी देवी कात्यायनीची उपासना केली होती.

      देवीच्या सर्व रूपांमध्ये सर्वात तेजस्वी आणि मोहित करणारे हे रूप आहे. हे तेज द्रष्टेपणा देते. डोळ्यांना दिसते ते दृश्य, आणि त्यामागील खरा अर्थ जाणून घेणे म्हणजे द्रष्टेपणा! ज्ञांनेंद्रियांच्या जाणिवे पलीकडील जाणीव, तर्कशास्त्रापलीकडील ज्ञान प्राप्त करण्यासाठी अत:प्रेरणा जागृत करण्याचा संदेश देवीचे हे रूप देते.”

        काल अजय साठेशी बोलताना कमिशनर साहेबांचा फोन आल्याने इंस्पेक्टर सिद्धिला तिथून तडक कमिशनर सरांना भेटायला जावे लागले होते.सिद्धिच्या कर्तृत्वावर पूर्ण विश्वास असला तरी दुर्गा साठे यांच्या केस मध्ये अजून काहीच प्रगती न झाल्याने कमिशनर सर नाराज  होते. दुर्गा साठे यांचे कर्तृत्व- सामाजिक कार्य यांची माहिती सगळ्या वृत्त वाहिन्यांवर दाखवली जात होती, आणि महान व्यक्तीचे अचानक बेपत्ता होणे आणि त्यांचा काहीच तपास न लागणे यांमुळे प्रसार माध्यमांकडून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. इंस्पेक्टर सिद्धिने हवे ते रिसोर्सेस वापरुन लवकरात लवकर याचा छडा लावण्याचे आदेश तिला दिले गेले. संधीचा फायदा घेत सिद्धिने कमिशनर सरांना तिच्या तपासाची इत्तंभूत माहिती दिली आणि या केस मध्ये बरेच प्रतिष्ठित राजकारणी गुंतले असल्याची शक्यता असून पुढील तपासासाठी या खास व्यक्तींच्या चौकशीची परवानगी मागितली.

काही कायदेशीर बाबींची पूर्तता करून तिला परवानगी देण्यात येईल अशी हमी मिळाल्यावर इंस्पेक्टर सिद्धि कमिशनर ऑफिस मधून बाहेर पडली. या गोष्टीला चोवीस तास झाले तरी अजून कमिशनर सरांची परवानगी मिळाली नव्हती. पुढे काय करावे हा विचार करत असतानाच सबइंस्पेक्टर भावे इंस्पेक्टर सिद्धिच्या केबिन मध्ये आले.

“बोला भावे काही updates??”

“नाही मॅडम, आता पुढे काय करायच हेच विचारयला आलो आहे. सगळ्या न्यूज चॅनलवर   दुर्गा साठे यांच्या अपहरणामागे व्यावसायिक शत्रुत्व आणि प्रसिद्ध राजकारण्यांचा एचटी असण्याची शक्यता, अशी ठळक बातमी दाखवली जात आहे.”

“क्काय...यांना अश्या बातम्या मिळतात कश्या??? अजून मला चौकशीची परवानगी मिळाली नाही अन हे रीपोर्टर...”

“हो ना..म्हणून तर तुम्हाला सांगायला आलो हे. इतक्या कष्टाने जेकेज फूड आणि साठे उद्योग यांचे वैर शोधले. माननीय खासदार अजिंक्य राठोड हे खर तर खासदार राघवेंद्र  राठोड यांचे दत्तकपुत्र. जेकेज फूडचे मालक केस हरल्यानंतर त्या धक्क्याने मरण पावले आणि त्यांचा एकुलता एक मुलगा अजिंक्य याला त्याच्या आत्याने दत्तक घेतले.  दोन वर्षांपूर्वी खासदारकी मिळाल्यावर सर्वात प्रथम अजिंक्यने यूनियन करवी साठे उद्योग समूहाला आतून पोखरायला सुरुवात केली आणि मार्केट मध्ये साठे समुहाच्या पदार्थांना ऑर्डर मिळणार नाहीत याची सोय केली. दुर्गा साठे यांच्या सामाजिक संस्थेची उत्पादने पण बाजारात विकली जाणार नाहीत याची दक्षता त्याने घेतली. अश्याप्रकारे साठे उद्योग समूह आणि त्यांची सामाजिक संस्था यांची आर्थिक परिस्थिति दयनीय करून अजिंक्य राठोड त्याचा सुड घेत होता हे सगळ आपण पुराव्यानिशी सिद्ध करू शकतो मॅडम.”

“होय. खूप खोलवर तपास केल्यावर आपल्याला या सगळ्या गोष्टींचा खुलासा झाला. परंतु दुर्गा साठे यांचे अपहरण केल्याचे कोणतेच ठोस पुरावे आपल्याकडे नाहीत. त्यामुळे या संदर्भात अजिंक्य राठोड याची चौकशी आपल्याला परवानगी मिळाल्याशिवाय करता येणार नाही.”

“सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला परवानग्या घ्याव्या लागतात, हे न्यूज चॅनल वले सगळ्या बातम्या लिक करतात आणि अपराधी आपल्या हातातून निसटून जाते. आपली सगळी मेहनत पाण्यात, साले बें***...”

शेवटचा शब्द तोंडातून निघताच भावेने स्वत:ची जीभ चावली आणि वरमून मान खाली घातली, मॅडम अजून काहीच कस बोलल्या नाहीत म्हणून त्याने वर पाहिल, पण इंस्पेक्टर सिद्धीच त्याच्याकडे किंवा त्याच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नव्हतं. तीच हे रूप पाहिल्यावर केस लवकर सोडवली जाणार याची खात्री पटल्याने सबइंस्पेक्टर भावेने अधीरतेने थोड्याश्या मोठ्या आवाजात  विचारले,

“मॅडम कसला विचार करत आहात, काही नवीन हाती लागले का?”

“असच वाटतय, आपण आत्तापर्यन्त आपल्याला जे दाखवलं गेल तेच बघत होतो, पण आता मला खि गोष्टींचा उलगडा होतो आहे.”

“म्हणजे??”

“म्हणजे...आपण संस्थेतील सदस्यांपैकी सध्या तिथे कोण गैरहजर आहेत त्या सर्वांना जिथे असतील तिथून परत बोलावण्यास सांगितले होते, तसेच दुर्गा साठे बेपत्ता झाल्या त्यादिवशी संस्थेतून कोण कोण बाहेर पडलं होत याची यादी मागवली होती. त्याच काय झाल?

“ती सगळी माहिती असलेला मेल कालच संस्थेतील ऑफिस मधून आला आहेत.”

गुड...त्या सार्‍या व्यक्तींची इत्तंभूत माहिती काढून आणा, आणि संस्थेत फोन करून त्या सगळ्या व्यक्तींना चौकशीसाठी बोलवून घ्या.”

क्रमश:

पूढील भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 

Comments

Gauri said…
धन्यवाद
Sayali Mulay said…
खूप छान 👌👌
Gauri said…
धन्यवाद सायली😊

लोकप्रिय

गुप्त समेवर - भाग १

नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची- १. देवी शैलपुत्री

नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची- २. देवी ब्रम्हचारिणी

गुप्त समेवर- भाग १७

नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची -३. देवी चंद्रघंटा