गुप्त समेवर - भाग ८
“इतके दिवस झालेत पुण्यात
येऊन पण विशेष काहीच हाती लागलं नाही, काल इंस्पेक्टर
प्रधान म्हणाले तस आपण वेळ वाया घालवतोय का?”
हॉल
मध्ये फेर्या मारता मारता रीया मुग्धाशी बोलत होती. पुण्यात आल्यानंतर दोघी आधी
शारदाश्रम एनजीओ मध्ये जाऊन आल्या, तिथे यशोदाने आधी
फोन करून ठेवल्याने एनजीओ च्या संचालिका संगीता ताईंनी स्वता मुगधाची भेट घेतली
होती. मुग्धा १६ वर्षांपूर्वी यशोदाला दवाखान्यात कशी भेटली ते तीच एनजीओच्या
शारदाश्रम कडून झालेल तीच दत्तकविधान ही सारी माहिती दिली तसेच अजून माहिती हवी
असल्यास त्यावेळी पोलिस तपास करणारे इंस्पेक्टर प्रधान यांना भेटण्याचा सल्ला पण दिला.
एनजीओ कडून मुग्धाला नवी कसलीच माहिती मिळाली नाही. मग दोन दिवसानी रियाचे पप्पा
कमिशनर देशमुखांच्या ओळखीतून रिटायर्ड
इंस्पेक्टर प्रधानचा पत्ता मिळवून त्या दोघी त्यांना भेटायला गेल्या.. साठीचे असले
तरी इ.प्रधान अजूनही एकदम तडफदार आणि तल्लख बुद्धीचे होते. मुग्धाने त्यांना
भेटण्याच प्रयोजन सांगताच थोडा वेळ विचार करून त्यांनी त्यावेळी घडलेली सारी हकीकत
तिला सांगितली ती यापूर्वी तिने श्रीकांत
आणि यशोदा तसेच एनजीओ च्या संगीता ताईंकडून ऐकलेली होती. फक्त दोनच गोष्टी त्यात
नवीन होत्या, एक म्हणजे त्यावेळी अपघातातून वाचवून मुग्धाला
दवाखान्यात कुणी आणल ते खूप तपास करून सुद्धा पोलिसांना कळलं नव्हत आणि दुसर
म्हणजे मुग्धाच्या अपघातांनंतर ६- ७ महिन्यांनी एक माणूस त्या अपघाताची चौकशी
करायला पोलिस स्टेशनला आला होता. मुग्धा त्यावेळी साठे दांपत्यासोबत मुंबईला शिफ्ट
झाली होती त्यामुळे त्या माणसाला तशी माहिती देऊन हवालदाराने मार्गी लावलेल, त्या माणसाचं नाव मात्र इ. प्रधान विसरले होते,
त्याचा चेहरा मात्र त्यांच्या लक्षात होता.
इतका
तपास करून फारसं काही हाती न लागल्याने मुग्धा आणि रीया आज जरा नाराज होत्या.
रीयाच बोलणं ऐकून मुग्धा हताशपणे म्हणाली,
“ हो नं! एनजीओ आणि पोलिस दोन्ही ठिकाणी नव काही
कळलं नाही, इ.प्रधान खूप हेल्पफुल वाटले, त्यांनी जी माहिती दिली त्याने अजून कन्फ्युज झालेय, तपासची दिशाच सापडत नाहीये. १६ वर्षांपूर्वी
तो अपघात झाला तरी कसा? त्यात मिळालेले दोन मृतदेह पुर्णपणे जळल्याने त्यांची ओळख पटली नाही, ते नक्की माझे जन्मदाते होते की नाही? मला त्या
अपघातातून वाचवल कुणी? पोलिस स्टेशन मध्ये चौकशी करायला
आलेला माणूस कोण? त्याच्याशी माझा किंवा अपघाताचा काय संबंध? नुसतेच प्रश्न आणि प्रश्न! त्याची उत्तरे कुणाकडेच नाहीत...माझा भूतकाळ
म्हणजे एक जिग्सॉ पझल वाटतोय ज्याचे सगळे तुकडे पण नाहीयेत आपल्याकडे... किती
विचित्र आहे माझ आयुष्य, त्याचा उगमच शोधता येत नाही.”
मुग्धाला
काही समजावणार इतक्यात बेल वाजल्याने रीया दार उघडण्यासाठी गेली. दारात अविकाकाना
पाहून रीयाला आनंद तरझालाच पण जरा आश्चर्य वाटल.
“मला अचानक इथे पाहून शॉक झालीस का गं?” रीयाच्या चेहर्यावरचे भाव ओळखून हसत हसत अविकाकाने फ्लॅटमध्ये एंट्री
केली.
“तस नाही काका...आम्ही पुण्यात आलो हे सांगायच राहून गेल.. तरी पण...”
रीया बोलताना अडखळली त्यावर अविनाश काही उत्तर देणारच होता की त्याला हॉल मध्ये डोक्याला हात लावून बसलेली चिंताक्रांत मुग्धा दिसली, तो तडक तिच्या शेजारी जाऊन बसला आणि मुग्धाच्या डोक्यावर मायेने हात फिरवून तिला म्हणाला,
“ काय झाल बाळा?”
श्रीकांतचा
भास होऊन मुग्धाने चमकून अविकाकाकडे पाहिल. अविनाश जोशी हे
एक अफलातून व्यक्तिमत्व होत. वाढलेली दाढी, टक्कल झाकण्यासाठी २४/७ डोक्यावर असणारी टोपी आणि जाड भिंगाचा चश्मा असा
त्याचा अवतार बघून हा एक नामांकित सॉफ्टवेअर कंपनीचा मॅनेजर आहे यावर कुणीही
विश्वास ठेवला नसता. मुग्धा लहान
असल्यापासून अविनाश आणि श्रीकांतची मैत्री होती. मुग्धाला तर अविकाका घरच्या पैकीच
एक वाटे. त्याचे प्रोजेक्टस आणि कामाचे व्याप यामुळे त्याचा पाय एका ठिकाणी कधीच
नसे, सततच्या फिरस्तीमुळे त्याची बायको पण त्याला सोडून गेली
अस श्रीकांत कडून मुग्धाला समजलं होत. स्वता:च अस कुणीच नसल्याने त्याच्या
प्रेमाची उधळण अविनाश लहानश्या मुग्धावर करे. लहानपणापासून मुग्धाला पण
त्याच्याबद्दल माया वाटत असे. आज त्याला तिथे पाहून मुग्धाला जरा आधार
मिळाल्यासारख वाटलं, पण आता अविकाकाला नक्की काय सांगावं
याचा विचार ती करू लागली. तिला अस विचारात पडलेल पाहून अविनाश म्हणाला,
“तुझ्या अविकाकापासून काही लपून नाही रहात बेटा, मी काल भारतात आलो की मुंबई एयरपोर्ट वरून श्रीला भेटायला गेलो होतो. मला
वाटलं तू पण तिथेच असशील, मग श्रीने तू पुण्याला आल्याच खर
कारण सांगितलं.”
मुग्धा आणि रीयाने एकमेकींकडे पाहिल. आता काय
बोलावं हेच त्यांना सुचेना. अविनाशच पुढे बोलू लागला.
“काय गरज आहे मुग्धा गाडलेले मुडदे उखडण्याची?”
नेहमी खेळकर असणार्या अविकाकाच्या अश्या चढया
आवाजामुळे मुग्धाने चमकून त्याच्याकडे पाहिल. आपला आवाज जास्तच वाढल्याच जाणवून
जरासं नरमाईने आविनाश पुढे बोलू लागला.
“मला श्रीने तुझ्या मनाची सारी अस्वस्थता सांगितली, ते मी समजून घेऊ शकतो पण आताच आयुष्य एंजॉय करायच सोडून भूतकाळातील
प्रश्नांचा माग काढण्यात काही अर्थ आहे अस मला नाही वाटत. बघ काय अवस्था करून
घेतली आहे तू स्वता:ची!”
“काका मला तुमची काळजी समजते आहे, पण प्लीज मला शोध घेऊ द्या स्वता:चा. समोर सगळा अंधार असला तरी मला खात्री
आहे मला हव ते नक्की सापडेल. तुम्ही सगळे आहातच माझ्यासोबत”
मुग्धा
तिचा निर्णय बदलणार नाही हे समजल्याने तिला सपोर्ट करत अविनाश म्हणाला,
“कधीही हाक दे हा अविकाका लगेच धावत येईल.”
वातावरणातील ताण संपल्याच पाहून रीया चुटकी वाजवत
म्हणाली,
“इस बात पे एक चाय हो जाये! मी चहा करून आणते.”
“नको नको...मी निघतो आता. बोलण्याच्या नादात हे
तुमच्यासाठी घेतलेलं गिफ्ट द्यायचं राहील. मला मुलींचं काही
कळत नाही, पण वापरत जा पोरींनो.” रीया आणि मुग्धाच्या हातात
गिफ्ट बॉक्स देत अविनाश म्हणाला.
“वॉव...सूपर्ब! हे बघा मी आत्ताच बांधते.” गिफ्ट
रॅप काढून बॉक्स मधील लेटेस्ट स्मार्ट बॅंड मनगटावर चढवत रीया म्हणाली.
“मस्तच आहे काका...थॅंक यू.” मुग्धाने पण तिच गिफ्ट
आवडल्याच काकाला सांगितलं.
“रोज वापरत जा..निघतो मी!”
अविनाश फ्लॅट मधून बाहेर पडला आणि तो सोसायटी
पार्किंग मधील त्याच्या गाडीत बसून सीट बेल्ट बांधत असताना बाजूला एक कार पार्क
झाली. त्यातून उतरलेल्या वसुंधरा नेनेला पाहून अविनाशच्या चेहर्याचा रंग उडाला.
वसुंधरा नेने इथे येण्याचं कारण शोधण्यासाठी अविनाशने गाडी बंद केली आणि तिचा
पाठलाग करण्याचा विचार करू लागला.
क्रमश:

Comments