गुप्त समेवर - भाग १३
वसुंधराला थांबवण्यासाठी मुग्धा कॉफीशॉप बाहेर आली तोपर्यंत उशीर
झाला होता, ड्रायवरने आणलेल्या कार मध्ये बसून वसुंधरा
निघाली होती. मॅम दिल्लीला जाण्याच्या घाईत असल्याने आता कॉल करून पण काही उपयोग होणार नाही, त्या परत आल्यावर प्रत्यक्ष भेटून बोलावं अस ठरवून मुग्धा गाडी काढून सरळ
तिच्या फ्लॅटकडे निघाली. गाडी चालवत असताना पूर्णवेळ वसुंधराच एकेक वाक्य तिच्या
डोक्यात घुमत होत. ‘अगदी तीच सवय... आईवर गेली आहेस
तू!’ वसुंधरा मॅम आणि यशोदाची एकदाही गाठ पडली
नाही, शिवाय यशोदा नेहमी वेणी घालत असल्याने तिला अशी
केस कानामागे सारायची सवय पण नव्हती! मग नक्की कुणाबद्दल बोलत होत्या मॅम?...ओह गोड! त्यांना माझ्या जन्मदात्या आईची माहिती आहे?
शारदाश्रम पण माहितीये त्यांना... ‘ते ब्रेसलेट म्हणजे
एका रहस्याकडे नेणारा दुवा आहे’ नक्की काय रहस्य आहे
त्या ब्रेसलेटमध्ये?... मला ते शोधवच लागेल! विचारांचा नुसता गुंता झाला होता मुग्धाच्या डोक्यात. मुग्धा फ्लॅटवर आली
तेव्हा रीया पण कॉलेजहून परत आली होती. मुग्धाला पाहून तिला चिडवण्याच्या सुरात
रीया म्हणाली,
“काय मग कशी झाली आजची डेट??”
मुग्धा तिच्या विचारात
असल्याने तिला रियाच्या प्रश्नाचा रोख कळला नाही. ती वसुंधरा आणि तिच्या भेटीबद्दलच
सगळं काही सांगू लागली. ते सगळं ऐकून रियाचा मस्करीचा मूड गायब झाला आणि ती पण
मुग्धाशेजारी बसून ते ब्रेसलेट आज पहिल्यांदाच पाहू लागली. थोड वेगळ्या धाटणीच असल
तरी सर्वसाधारण दिसणार ते ब्रेसलेट पाहून काहीच उमगत नसल्याने रीया म्हणाली,
“मस्तपैकी एक कॉफी करते
यार! त्याशिवाय आपल डोक काही चालणार नाही.”
“हो चालेल...वसुंधरा मॅमचा
कॉल आल्याने आर्यनसोबत कॉफी घ्यायची राहूनच गेल! त्या तर इतक्या घाईघाईत आल्या अन्
गेल्या की धड बोलले पण नाही मी. हे दोघ मायलेकर एकमेकांविषयी कधीच काही बोलत नाहीत, त्यांचं काही नात आहे हेच मी आज विसरले होते. आर्यनला
कॉलेजमध्ये एका मॅमने अर्जंट बोलावलं आहे अस सांगितलं,
त्याच्या आईनेच तर बोलावलं होत!”
“सध्या तू आर्यन आणि
आर्यनमाय मध्ये गुंतली आहेस...”
“काय फलातूपणा आहे हा???
रियाचा आगाऊपणा लक्षात
येऊन मुग्धा तिला ओरडली.
“आत्ता आपण ब्रेसलेटच कोड
सोडवूया, माझी खेचायला तुला अख्खं आयुष्य पडलं आहे.”
दोघी कॉफी संपवून पुन्हा
ब्रेसलेट हातात घेऊन निरखू लागल्या. रीया निरीक्षण करताकरता बोलत होती,
“वेगळीच नक्षी आहे
प्रत्येकावर ... आणि प्रत्येक आकार वेगळाच आहे यार, एखादी
वस्तु तुटल्यावर त्याचे कसे वेगवेगळे तुकडे... ओह यस!”
दोघींनी आनंदाने एकमेकींकडे पाहिल. रियाने पळत जाऊन छोटी कात्री आणली. त्या ब्रेसलेटच्या साखळीत गुंफलेले छोटे छोटे १२ आकार त्यांनी अलगद साखळीतून बाजूला केले. दोघी ते जीगसॉ पझल सोडवण्यासाठी जमिनीवरच मांडी घालून बसल्या. अर्ध्या एक तासात त्यांच्यासमोर साधारण आयताकृती धातूचा एकसंध आकार तयार झाला. एखाद जुन्या काळातील ताम्रपाटा सारखं ते दिसत होत. त्यावर एक चित्र कोरलेले होते. रीयाने मोबाइल वर त्याचा फोटो काढला. बराच वेळ त्या दोघी ते पहात होत्या. इतिहास संशोधनाच्या विद्यार्थिनी असल्या तरी पण नुसतं ते कोरीव चित्र पाहून त्यांना काही उलगडा होईना.
(ब्रेसलेट
मधील आकार जोडून तयार झालेले चित्र!)
मुग्धा- “एखाद्या पुरातन वास्तूमधील शिल्प असावं हे! खाली असलेल्या मूर्तीला एकापेक्षा जास्त तोंड आहेत. आणि हात पण अनेक आहेत!”
रीया- “त्याच्या हाताने तो
वरती असलेली जागा तोलून धरत आहे. त्यावर मध्यभागी एक स्त्री आणि एक पुरुष असून आजूबाजू
अनेक आकृत्या आहेत. खाली असलेली आकृती त्यांना आधार देत आहे की,…
मुग्धा- “…वरची जागा हलवण्याचा प्रयत्न करत आहे? हे चित्र इतक स्पष्ट
नाहीये गूगल करून काही माहिती मिळणार नाही. आपण शास्त्री सरांना विचारूया? त्यांना जुन्या शिल्पकलेची खूप माहिती आहे.”
रीयाने लगेच शास्त्री सर आणि मुग्धाला ती इमेज व्हाट्सअप केली आणि
शास्त्री सरांना कॉल करून हया शिल्पाविषयी माहिती असेल तर सांगावी अशी विनंती केली, गुप्तता राखावी म्हणून इंटरनेट वर
कुठल्याच्या प्रश्नमंजुशेत तिला ही इमेज मिळाली असल्याच सांगितलं. सर नक्की मदत करतील
अशी त्यांना अशा होती. त्या दोघी पण इंटरनेट आणि त्यांच्याजवळ असलेल्या संदर्भग्रंथा
मध्ये अश्या प्रकारच्या शिल्पांचा काही उल्लेख आहे का ते शोधू लागल्या. पुस्तकांमध्ये
डोक घालून बसलेल्या मुग्धाच्या डोक्यात अचानक एक विचार आला, तिने
उत्साहाने रीयाला आवाज दिला
“रीयाsss…”
“ओये!!! इतक्या जोरात काय ओरडते...सापडलं का तुला काही??”
“नाही ग! ते ब्रेसलेटचे तुकडे
जोडताना तुझ्या एक लक्षात आल का?”
“काय?” रीयाने डोक खाजवत विचारलं.
“अग ते तुकडे बर्यापैकी जाड
होते आणि त्याच्या दोन्ही बाजूंना कोरलेले होते.”
“म्हणजे...”
“यस... आपण एक बाजू पाहिली, दुसर्या बाजूला पण नक्कीच काही तरी असेल!”
तयार झालेल एकसंध आकार तोडून पुन्हा दुसर्या बाजूने जोडावा असा विचार करून
मुग्धा त्याला हात लावणार इतक्यात मुग्धाने तिचा हात मागे खेचला,
“पुन्हा तोडायची गरज नाही मिनू...
आपल डोक सॉलिड आहे... बघ तू माझी कमाल!”
आता ही नक्की काय करतेय ते मुग्धा उत्सुकतेने पाहू लागली. रीयाने एक
पेपर आणला आणि तो आयताकृती एकसंध तुकडा अलगद त्यापेपरवर सरकवला आणि एक रायटींग पॅड
त्या चित्रावर ठेवलं. मोठ्या शिताफीने पेपर आणि पॅड एकत्र पकडून त्यांच्या जागा बदलल्या.
आता ते रायटींग पॅड खाली तर पेपर होता आणि मध्ये तो आयताकृती एकसंध तुकडा तसाच जोडलेला
राहिला. एखाद्या जादूगराचा आव रीयाने त्यावरील पेपर बाजूला केला. आता त्यांच्यासमोर
चित्राच्या मागची बाजू होती, त्या वर एक संस्कृत श्लोक कोरलेला होता. मुग्धाने तो श्लोक कागदावर टिपून घेतला आणि त्याचा अर्थ लावू लागली. बर्यापैकी
संस्कृत येत असल्याने तिला त्या श्लोकाचा अर्थ काढता येईल याची रीयाला खात्री होती.
क्रमश:



Comments