गुप्त समेवर - भाग ९
अविनाश मुग्धाच्या फ्लॅट मधून बाहेर पडला आणि तो सोसायटी पार्किंग मधील त्याच्या गाडीत बसून सीट बेल्ट बांधत असताना शेजारी एक कार पार्क झाली. त्यातून उतरलेल्या वसुंधरा नेनेला पाहून अविनाशच्या चेहर्याचा रंग उडाला. वसुंधरा नेने इथे येण्याचं कारण शोधण्यासाठी अविनाशने गाडी बंद केली आणि तो लपून त्यांचा पाठलाग करू लागला.
वसुंधरा स्वराला म्हणाली,
“फ्लॅट नंबर काय आहे मुग्धाचा?”
“थर्ड फ्लोर, फ्लॅट नंबर 305”
मोबाइल मध्ये अड्रेस पहात स्वराने संगितले. त्या दोघींना लिफ्ट मध्ये जाताजाता मुग्धाविषयी बोलत असल्याच अविनाशने ऐकलं आणि त्या इथे मुग्धाकडेच आल्या असल्याची त्याची खात्री पटली. मुग्धा तिच्या भूतकाळाचा शोध घेत असताना वसुंधराने तिला भेटणं अविनाशला रुचल नाही. त्या दोघींना लांब ठेवावं अस ठरवून तो परत त्याच्या गाडीकडे निघाला आणि वसुंधरा स्वरासोबत दारात उभी पाहून रीया तंतरली. तिने जरा बिचकतच दोघींना घरात घेतलं आणि पाणी आणायला आत पळाली.
मुग्धाला पण वसुंधराला अस अचानक घरी आलेल पाहून आश्चर्य वाटलं. स्वता:ला सावरत तिने दोघींच हसून स्वागत करत म्हणाली,
“छान वाटलं तुम्ही इथे आलात ते! बसा न..”
मुग्धाचा गोंधळ उडालेला पाहून वसुंधरा म्हणाली,
“आम्ही शॉपिंग करून आता मूव्हीला जात होतो तेवढ्यात स्वराला आठवल की तुम्ही याच एरियात रहातात. तुम्हाला घेऊन जाव म्हणून आलो इथे.”
इतक्यात रीया पाणी देत स्वराला म्हणाली,
“तुला अड्रेस कसा मिळाला हा?”
“तूच दिला होता नं आपण पुण्याला आलो तेव्हा!”
“अरे होss”
वरवर हसून रीया म्हणाली पण मनातल्या मनात रीयाला पत्ता उगाच दिला म्हणून स्वता:ला शिव्या देऊ लागली. बेडरूम मध्ये मुग्धाचा फोन वाजू लागल्याने मुग्धा फोन घेण्यासाठी मॅमला सांगून आत गेली. तोफेच्या तोंडी एकटीच राहिल्याने रिया अजून डिस्टर्ब झाली,
“फ्लॅटच्या नेमप्लेट वर मुग्धाच्या बाबांच नाव कस? खाली पण फ्लॅट ओनरच्या नावांच्या बोर्डवर त्यांचच नाव दिसलं?”
स्वरा मावशीसोबतच आली असली तरी तिच्या लक्षात ही गोष्ट आली नव्हती, स्वराला मावशीच्या निरीक्षण शक्तीच कौतुक वाटलं! वसुंधराच्या प्रश्नावर रीया पटकन बोलून गेली,
“मुग्धाच्या बाबांचा फ्लॅट आहे हा. १६ वर्षांपूर्वी इथेच रहात होते ते....” रीया बोलता बोलता थांबली. त्या गोष्टींचा उल्लेख सगळ्यांसमोर करण्याची चूक सावरत रीयाने विषय बदलला आणि ती स्वराला म्हणाली,
“काय काय शॉपिंग केल तू...दाखव मला.”
बेडरूम मध्ये मुग्धाने फोन स्क्रीनवर अविकाकाच नाव बघून लगेच तो रिसिव्ह केला,
अविनाश-“ हॅलो मुग्धा! अग माझी कॅप वर राहिली आहे का? गाडीत बसल्यावर माझ्या लक्षात आल.”
मुग्धा- “इथे तर नाही दिसली, तू जाताना तुझ्या डोक्यावरच होती कॅप!”
अविनाश-“मागून खूप आवाज येतोय, कुणी आल आहे का?”
मुग्धा-“हो… माझी फ्रेंड स्वरा आणि तिची मावशी, म्हणजे आमच्या प्रोफेसर वसुंधरा मॅम आल्या आहेत.”
अविनाश-“तुझ्या प्रोफेसर? काही काम आहे का त्यांचं? तुझी आणि त्यांची चांगलीच ओळख दिसतेय?”
मुग्धा- “वसुंधरा मॅमशी फारशी काही ओळख नाही पण स्वरा स्कूल फ्रेंड आहे माझी.”
अविनाश- “स्वराला तुझ्याबद्दल सगळी माहितीये का? म्हणजे...”
मुग्धा-“नाही काका! फक्त रीयाला माझी सगळी माहिती आहे”
अविनाश जरा रीलॅक्स झाल्याचं मुग्धाला फोनवर पण जाणवलं. पण लगेच अधिकार वाणीत प्रत्येक शब्दावर जोर देत अविनाश बोलू लागला,
अविनाश- “स्वराला किंवा तिच्या मावशीला तुझ्या दत्तक असल्याच आणि इथे भूतकाळ शोधायला आल्याच कधीच सांगू नको. अजून कुणा अनोळखी किंवा नव्याने ओळख झालेल्या व्यक्तींना तुमच्याबद्दल माहिती देत बसू नका. नाही तर हे सगळं थांबवून आजच मुंबईला परत जा.”
मुग्धा- “कुणाला काहीच सांगणार नाही काका. तू काळजी नको करू. मी नंतर बोलू का?”
अविनाश- “ओके बाय..बट बी केअरफूल आणि मी सांगितलेलं विसरू नको.”
मुग्धा- “हो काका..बाय!”
फोन ठेऊन मुग्धा हॉलमध्ये आली. रीया आणि स्वराच मूव्हीला जाण्याचा प्लान सुरू होता. अविनाश काकाच्या फोनमुळे जरा डिस्टर्ब झालेल्या मुग्धाने त्यांच्यासोबत जायला नकार दिला. वसुंधरा मॅमनी रीयाला स्वरासोबत जा म्हणून सांगितल्याने नाइलाजाने रीया मुग्धाला सोडून स्वरासोबत गेली. आता वसुंधरा मॅडम आणि मुग्धा दोघीच असल्याने काय बोलावं हे मुग्धाला कळेना, वसुंधराच बोलू लागली,
“छान आहे घर तुझ! पुण्यात असताना कोणत्या शाळेत होती तू?"
मॅमच्या या अनपेक्षित प्रश्नावर काय उत्तर द्यावं हे काही मुग्धाला सुचेना. खर तर अपघाता आधी नक्की ती पुण्यातच रहात होती की अजून कुठे?, इतकच काय तीच खर नाव पण तिला आठवत नव्हतं तर शाळेच नाव काय आठवणार? मुग्धाची अस्वस्थता पाहून वसुंधरा म्हणाली,
“तुला बर वाटत नसेल तर आराम कर, मी पण निघते. मागे भेटल्यापासून पाहतेय मी, काही तरी आहे जे तुला सतत अस्वस्थ करत आहे. तू मला स्वरासारखीच आहेस, काही मदत हवी असेल तर मावशी समजून नक्की सांग. येते मी.”
मॅमला इतक प्रेमाने बोलताना पाहून मुग्धाला पण त्यांच्याबद्दल आपुलकी वाटू लागली. अविकाकाने दम दिला नसता तर तिने तिचा भूतकाळ शोधण्यासाठी मॅमची मदत नक्की घेतली असती. वसुंधराला मुग्धाबद्दल वाटत असलेली ओढ आणि आपुलकीच तिलाच आश्चर्य होत. गाडी काढत असताना रीयाने १६ वर्षांपूर्वी मुग्धा इथे रहात होती हे सांगितल्याच आठवलं आणि पुण्यातील शाळेची चौकशी केल्यावर मुग्धाच अस्वस्थ होण यांमुळे वसुंधराच्या मनात शंकेची पाल पुन्हा चुकचुकली! वसुंधराने गाडी घराकडे न नेता कॉलेजकडे वळवली. कॉलेज मध्ये सध्या स्टाफला पण १५ दिवस सुट्ट्या होत्या तरी पण आलेल्या वसुंधरा नेनेंना पाहून डुलक्या घेणारा शिपाई गडबडला. वसुंधरा सरळ तिच्या केबिनमध्ये जाऊन बसली. एक दोन फोन फिरवल्यावर तिला समजले की रजिस्ट्रार बाहेरगावी गेल्याने आत्ता तिला मुग्धाची अॅडमिशन फाइल काही मिळणार नाही. मुग्धाची इत्तंभूत माहिती मिळवण्यासाठी वसुंधराला सुट्ट्या संपेपर्यंत वाट पहावी लागणार होती.
रीया स्वरासोबत मूव्हीला गेल्याने मुग्धा फ्लॅटवर एकटीच होती. डोक्यात सुरू असणार विचारचक्र थांबव म्हणून तिने एफएम ऑन करून गाणी ऐकू लागली, इतक्यात तिचा फोन वाजला. मुग्धाने गाणी बंद करून फोन घेतला, पलिकडून शारदाश्रम च्या संगीताताई बोलू लागल्या,
“तू येऊन गेल्यावर मी सगळ्या जुन्या गोष्टी चेक केल्या, त्यावेळी माझ्या लक्षात आल की तुला दवाखान्यात आणल होत तेव्हा तुझ्याहातात एक ब्रेसलेट होत जे तुझ्यावर उपचार सुरू असताना नर्सने बाजूला काढून ठेवलं पण तेव्हा ते गहाळ झाल. तुला दत्तक घेऊन साठे मुंबईला शिफ्ट झाल्यावर ती नर्स शारदाश्रमला आली आणि तिने ते इथे जमा केल होत. पण त्यावेळी ते तुझ्यापर्यंत पोचवायच राहून गेल. आत्ता ते मी शोधून काढलं, तुला वेळ झाला की येऊन घेऊन जा.”
“थॅंक यू संगीताताई...मी लगेच येते.”
तिच्या भूतकाळाला जोडणारी पहिली कडी सापडल्याचा मुग्धाला प्रचंड आनंद झाला, फ्लॅट लॉक करून ती तडक शारदाश्रमला जायला निघाली.
क्रमश:

Comments